नातं जपणारी नाती..

युवा लेख

युवा विवेक    09-Sep-2023   
Total Views |

नातं जपणारी नाती..

नातं हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. माणूस एकटा जगू शकत नाही. दिवसभर त्याला जशी कुठल्या ना कुठल्या वस्तूची गरज असते, तशीच माणसाचीही गरज असते. माणसा-माणसात असलेला एकमेकांविषयीचा जिव्हाळा म्हणजे नातं. या जिव्हाळ्याच्या आधारावरच नात्याची भिंत भक्कम उभी असते. नात्याची सुरुवात कशी व्हावी याचं काही गणित ठरलेलं नसतं. रक्ताची नाती जन्माला आल्याक्षणी निर्माण होतात; पण रक्तापलीकडची नाती ही व्यक्तीचे आचार-विचार, वर्तन, स्वभाव यावर अवलंबून असतात. या रक्तापलीकडच्या नात्यांनाच खऱ्या अर्थाने नाती जुळणं म्हणावं.

नातं हा व्यक्तीच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असला तरी ती नाती जुळणं त्याच्या हातात नाही. विशिष्ट अशी शक्ती आणि रचना त्यामागे निश्चितच असतात. अर्थात, या शक्तीला कुणी भगवंत म्हणेल, कुणी निसर्ग म्हणेल; पण ती शक्ती निश्चितपणे अस्तित्वात असते. बालपणी आपल्याला मामा, काका, आत्या, मावशी वगैरे रक्ताची नाती अधिक जवळची वाटतात. पुढे हळूहळू शाळेत प्रवेश घेतल्यावर, वेगवेगळ्या शिकवणी वर्गांच्या निमित्ताने, पुढे नोकरी-व्यवसायानिमित्त रक्तापलीकडच्या नात्यांची आपल्याशी नव्याने ओळख होते. डबा खाताना नाही का आपण एकमेकांना आपली भाजी शेअर करत! या लहान-सहान गोष्टींच्या शेअरिंगच्या आधारावर ही नाती दृढ होतात. काळजात कायमचं घर करुन राहतात. रक्ताची नाती आपल्या समवेत कायम असतातच; पण आपल्याला हवी ती व्यक्ती त्याक्षणी उपलब्ध होईलच, असं सांगता येत नाही. अशावेळी ही जोडलेली नाती एकमेकांच्या गरजांना धावून जातात, अगदी काळ्यारात्रीसुद्धा!

या नात्यांना काही नावं असतात. मित्र, मैत्रीण, मानलेला भाऊ किंवा बहिण किंवा अगदी फॅमिली फ्रेंडसुद्धा! पण काहीवेळा या नात्यांना नाव नसतं. एखाद्या दिवशी आपल्याला उशीर झाला म्हणजे लोकल सुटता सुटता आपण स्टेशनवर पोहोचतो, तेव्हा आपल्या डब्यातला रोज प्रवास करणारा सहप्रवासी आपल्याला हात देतो आणि आपण लोकलमध्ये सुखरुप चढतो. या हात पुढे करण्याच्या क्षणभरसुद्धा नातं निर्माण होतं. एसटीत किंवा लांबच्या प्रवासात बसमध्ये एखाद्या माणसाला खोकला येत असेल किंवा उलटी होत असेल तर आपण पटकन आल्याची गोळी देतो. यातूनही नातं निर्माण होतं. पुढे कधी तो माणूस आपल्याला दिसला म्हणजे आपण त्याला हात उंचावून ओळख दाखवतो. तो माणूस कुठल्या जाती-धर्माचा आहे किंवा कुठे राहतो वगैरे काही माहिती आपल्याला नसते. अशा नात्यांचा सन्मान करण्यासाठी एखादं स्मितहास्य देखील पुरतं. म्हणूनच ही नाती ओळख ठेवणारी नि नातं जपणारी नाती असतात. अनोळखी असण्यातच त्यांचं अस्तित्व असतं. स्मितहास्य देखील या नात्यांच्या भिंतीला आधार देतं. यावरुनच नात्यातली सहजता आणि जपणूक किती निर्भेळ असेल याची आपल्याला कल्पना येते.

नातं जपणारी नाती ही रक्तापलीकडचीच असतात, असं ठामपणे मात्र म्हणता येणार नाही. कारण, काही वेळा रक्ताची नाती आपल्या अडलेल्या वेळी धावून येतात; पण या नात्यात संवाद मात्र हवा. तसं रक्तापलीकडच्या नात्यात संवाद हवाच असं काही नाही. म्हणूनच, 'संवाद' हीच नात्याची एकमेव गरज आहे, हे वाक्य मला तितकंसं पटत नाही. कारण नातं म्हणजे एकमेकांना जाणून घेणं. या जाणून घेण्यातूनच समजून घेणं. त्यामुळे, संवाद हा नात्याचा एक महत्त्वाचा भाग असला तरी मुळात 'स्वीकार' ही नात्याची खरी गरज आहे. एकमेकांशी संवाद साधलाच गेला नाही तरी पाच-पाच वर्षांनंतर दोन परिचयातील माणसे मनात किंतु-परंतु न ठेवता आनंदाने एकमेकांना हस्तांदोलन करताना मी कितीतरी वेळा पाहिली आहेत. त्यामुळे नातं जपणाऱ्या नात्यांना खास असा 'नातं' म्हणून अर्थ असतो. जिथे स्पष्टीकरण द्यावं लागतं, वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं तिथे 'नातं' म्हणून नात्याला काही अर्थ असत नाही.

नातं जपणारी नाती ही समवयस्कच असतात, असं नाही. नात्याला वयाचं, जाती-धर्माचं, प्रांताचं मुळी बंधनच नसतं. एकमेकांविषयी एकमेकांच्या मनात चांगला भाव असणं इथे महत्त्वाचं असतं. म्हणूनच हे नातं सांभाळणारं, संगोपन करणारं आणि मुख्य म्हणजे पवित्र असतं. एकमेकांविषयी असणारी ओढ हेच या नात्याचं मुख्य तत्व आहे. समाजात वावरताना रिक्षावाले, कंडक्टर, ड्राइव्हर, सफाई कामगार, दुकानदार, वाॅचमन यांच्याशी आपली अशी नाती असतातच. काही जणांशी तर पूर्वजन्मीचा संबंध असावा असं दृढ नातं असतं. यातूनच आपल्या आयुष्याला खरा आधार मिळतो. गायक-श्रोते, सादरकर्ते-प्रेक्षक किंवा अगदी लेखक-वाचक या नात्यांचाही यात उल्लेख करता येईल. लेखकाने लिहिलेले मनापासून वाचणारे वाचक असतात. त्या अक्षरांमधून, शब्दांच्या वाटणाऱ्या माधुर्यातून हे नातं जपलं जातं आणि दृढ होतं. अशी अनेक नाती तुमच्या-माझ्या आयुष्यात नक्कीच आहेत. हा लेख त्या नात्यांनाच अर्पण...

लेखाचा समारोप करत असताना म्हणावंसं वाटतं, ‘नातं ही माणसाला लाभलेली देणगी आहे. म्हणूनच, नात्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी व्यवहार्य गोष्टीचा आधार न घेता नात्यात केवळ भक्ती करावी ती अर्पणभावाची नि समर्पणाची...'

- गौरव भिडे