‘You Only Live Twice’

युवा विवेक    15-Nov-2024
Total Views |


‘You Only Live Twice’

 

ज्येष्ठ क्रिकेट समालोचक हर्षा भोगले एका कार्यक्रमात म्हणलेले की आयुष्य हे टेस्ट क्रिकेटसारखं असतं. ते नेहमी तुम्हाला दुसरी संधी देतं. भारतीय संघाकडेही अशीच एक दुसरी संधी मेलबर्नच्या सामन्यात होती. पहिल्या सामन्यात ३६ धावांवर बाद होऊन भारतीय संघाला एक लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभावासोबतच विराट मायदेशी परतला होता. भारतीय संघ अजून कमकुवत वाटत होता. भारताला मेलबर्नच्या सामन्यात जुने घाव विसरून पलटवार करायचा होता.

 

भारतासाठी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणे महत्त्वाचे होते. पण टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकून भारताला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. एडीलेडच्या पतनाचा प्रभाव या सामन्यातील संघनिवडीवर पडला. शुभमन गिल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना नव्याने संघात स्थान देण्यात आले. सिराज आणि गिल यांच्यासाठी हा त्यांचा पहिला सामना होता. याच मैदानातील २०१८-१९ मधील कामगिरीमुळे जसप्रीत बुमराह हा एक जगविख्यात गोलंदाज म्हणून ओळखू लागला होता. त्यानेच ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ १० धावांवर असताना पहिली विकेट घेतली. खेळपट्टी थोडी संथ गतीची वाटत होती तेव्हा कर्णधार अजिंक्य रहाणेने त्याचा ‘क्रिकेटिंग IQ’ वापरत अश्विनला लवकर गोलंदाजीसाठी आणले. या प्रयोगाने संघाचा फायदा झाला आणि ३५ धावा असताना भारताला दुसरी विकेट मिळाली. तीन धावांच्या फरकाने ऑस्ट्रेलियाची तिसरी विकेट पडली. अश्विनने स्टीव स्मिथला माघारी पाठवले. पुढे बुमराहने हेडला बाद करत ८६ धावांची भागीदारी मोडली. ऑस्ट्रेलियाचा स्कोर १३४ असताना सिराजने त्याच्या टेस्ट करियरची पहिली विकेट लाबुशेनला माघारी पाठवून घेतली. मागील सामन्यात टीम पेन अश्याच वळणावर मैदानात आला होता. पण यावेळी तो मागीलप्रमाणे प्रभाव पडू शकला नाही. एकामागे एक विकेट गमावत ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्याच दिवशी १९५ धावांवर पूर्ण बाद झाला. पहिला दिवस संपेपर्यंत भारताने एक विकेट गमावली. संयोगाने दिवसाअखेर भारताची धावसंख्या ३६ होती. पुजारा आणि गिल मैदानावर पाय रोवून खेळत होते.

 

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. काहीच वेळात गिल आणि पुजारा दोघेही बाद झाले. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी ६४ धावा असताना मैदानात आले. पहिल्या दिवशी रहाणेने कर्णधार म्हणून खेळ चांगल्या प्रकारे नियंत्रित केला होता. आता हीच कामगिरी फलंदाज रहाणेला करायची होती. दोघांमध्ये चांगली भागीदारी सुरु झाली. ११६ धावा असताना विहारी बाद झाला. विकेटकीपर रिषभ पंत मैदानात आला. ही सिरीज संपेपर्यंत त्याच्यासाठी बरंच काही बदलणार होतं. त्याची सुरुवात याचं इंनिंगपासून झाली. पंत आल्यानंतर धावा वेगाने बनू लागल्या. पंत त्याच्या अंदाजाने ऑस्ट्रेलियावर दबाव टाकत होता त्यामुळे रहाणेला त्याच्या वेगाने खेळता आले. १७३ धावा असताना पंत २९ वर बाद झाला. आता जडेजा आणि रहाणे यांवर भिस्त टिकलेली होती. ते दोघे त्याचप्रमाणे खेळले. रहाणेने अर्धशतक पूर्ण केले. जडेजाही त्याच्या अंदाजाने मारत होता आणि रहाणेचाही आता चांगला जम बसला होता. काहीच वेळाने चौकार मारून रहाणेने शतक पूर्ण केले. तो क्षण रहाणेसोबतच सगळ्या भारतीय चाहत्यांसाठी खास होता. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर कुणीच अशी आशा ठेवली नव्हती. पण अजिंक्यने ते करून दाखवले. दुसरा दिवस संपेपर्यंत अजिंक्य आणि जडेजाने भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवले होते. शेवटी पाऊस पडल्यामुळे ऑस्ट्रेलियाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

 

तिसऱ्या दिवशीही या जोडीने तसाच खेळ सुरु ठेवला. पण काही वेळाने १०० धावांची बढत असताना अजिंक्य ११२ च्या स्कोअरवर धावबाद झाला. जवळपास सगळ्यांनाच हा विश्वास होता की भारत पहिल्या सामन्यानंतर वापसी करू शकणार नाही. पण कर्णधाराने सगळ्यांना चुकीचे ठरवीत शतक करून भारताला मजबूत स्थितीत आणून ठेवले. जडेजानेही त्याचे अर्धशतक पूर्ण केले. स्टार्कने जडेजाला बाद केले. जडेजाच्या मागे २० धावांच्या आत भारतीय संघ बाद झाला. पण भारताकडे मजबूत अशी १३१ धावांची बढत होती. आता स्थिती अशी होती की जर ऑस्ट्रेलियाने फलंदाजीत चांगली कामगिरी केली नाही तर भारत सामना सहज जिंकेल.

 

तिसरी इंनिंग सुरु झाली. सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाच्या ४ धावा असताना पहिली विकेट उमेश यादवने घेतली. पण उमेशची ही स्पेल भारतासाठी चांगलीच नुकसानदायक ठरली कारण आठवी ओवर सुरु असताना त्याला दुखापत झाली. काही वेळाने ड्रेसिंग रूममधून निरोप आला की उमेशला जमिनीवर पाय ठेवता येत नाहीये; तो हा सामनाच नव्हे तर पूर्ण शृंखलेला मुकणार होता. आता गोलंदाजीसाठी बुमराह, सिराज, अश्विन आणि जडेजा हे चारच पर्याय राहिले होते. तरी या चौघांनी गोलंदाजीचा कडवट मारा सुरु ठेवला. ४२ धावा असताना अश्विनने लाबुशेनला माघारी पाठवले. एक बॉलर कमी असतानाही ज्याप्रमाणे भारतीय संघ मारा करीत होता ते प्रशंसनीय होते. ७१ धावा असताना स्मिथ बाद झाला. जडेजा ज्याचे गोलंदाजी करताना मुख्य काम धावा रोखून धरण्याचे असते त्याने वेडची विकेट घेतली. लगेच सिराजने हेडला माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियाची इंनिंग डगमगत होती. स्कोर होता ९८ धावा आणि ५ विकेट्स.

 

टीम पेनवर पुन्हा एकदा जवाबदारी आली पण यावेळी दबाव जास्त होता. त्याच दबावात केवळ एका धावेची भर टाकून तो माघारी आला. आता मात्र ऑस्ट्रलियाचा संघ चांगलाच फसला होता. ६ विकेट्स पडल्या होत्या आणि बढतही मिळाली नव्हती. एडिलेडच्या आठवणी आता हळूहळू विसरल्या जात होत्या. तिसऱ्या दिवसाच्या अखेरी ऑस्ट्रेलियाकडे २ धावांची बढत होती. चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला आणि आता किती धावांच्या आता ऑस्ट्रेलिया संघ बाद होईल एवढंच बघायचं होतं कारण आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यापर्यंत आली होती. ग्रीन आणि कमिन्स यांनी चांगली पार्टनरशिप केली पण आता सगळ्यांना कळत होतं की सामना कोणत्या बाजूला झुकतोय. बुमराहने कमिन्सला माघारी पाठवत ही भागीदारी मोडली. २०० धावा असताना ऑस्ट्रेलियाचा संघ ६९ धावांची बढत घेऊन बाद झाला. आता भारतीय संघाने पूर्णपणे वापसी केली होती.

 

७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९ धावांवर भारताने दोन विकेट्स गमावल्या. पण रहाणे आणि गिल positive attitude ने खेळत होते. रहाणेनी विजयी धाव काढत भारताला मेलबर्नमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला. विराट कोहली, मोहम्मद शमी, उमेश यादव असे प्रमुख खेळाडू नसताना भारताने मेलबर्नचा जिंकलेला सामना हा भारतीय टेस्ट क्रिकेट इतिहासातील सगळ्यात मोठ्या विजयांपैकी एक होता. जबरदस्त शतकामुळे अजिंक्य रहाणे ‘Player of the Match’ ठरला.

 

अर्थात २ सामने अजून बाकी होते. शृंखला १-१ च्या बरोबरीवर उभी होती. तिसरा सामना सिडनीत तर चौथा सामना ब्रिस्बेन गाबामध्ये होणार होता. ‘गाबा’च्या मैदानात ऑस्ट्रेलियाने त्याआधी ३२ वर्षांपासून एकही सामना हरला नव्हता त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सिरीज जिंकण्याच्या विश्वास होता; पण आता भारतीय संघही मागे नव्हता. दोन्ही संघ आता पुन्हा एकमेकांसमोर येणार होते सिडनीमध्ये..!

   

- देवव्रत वाघ