थंडीची चाहूल..

युवा विवेक    23-Nov-2024
Total Views |


थंडीची चाहूल..

निसर्गाशी सारी सजीव सृष्टी जोडलेली आहे. पण या सजीव सृष्टीतही पशुपक्ष्यांची निसर्गाशी खास अशी मैत्री आहे. सहा ऋतूंचे स्वागत पशुपक्षी मोठ्या उत्साहाने करतात. त्यातल्या त्यात कार्तिक संपताना लागणारी थंडीची चाहूल आपल्यापेक्षा या पशुपक्ष्यांना अधिक लवकर लागते. निरनिराळे पक्षी पर्यटनाला जातात. निसर्गाच्या ऋतू नावाच्या नाटकाचा एक अंक संपून दुसरा अंक सुरु होतो. या कथानकाची आपल्याला आधीच माहिती असली तरी दरवर्षी काहीतरी नवं जाणवतंच, हीच निसर्गाची खासीयत! एखाद्या टेकडीवरची गवते पिवळा रंग धारण करीत हळूहळू विरळ होतात. तर काही गवते हिरवेपण घट्ट धरुन ठेवू पाहत असतात. या हिरव्या नि पिवळ्याच्या पाठशिवणीचा खेळ पाहताना टेकडी अगदी रमून जात असावी. ही दोन पोरे हळूहळू टेकडीच्या मागच्या बाजूला जाऊ लागली की टेकडीचा चढ स्पष्ट होऊ लागतो. कार्तिकाच्या उत्तरार्धात एखाद्या सकाळी ह्या टेकडीकडे पाहताना किती वेळ गेला ते कळत नाही. पण जसजसा वेळ जाईल तशी थंडी बोचरी जाणवू लागते तेव्हा पिवळाधम्मक सूर्य त्याच्या किरणांनी थंडीचं बोचरेपण किंचित कमी करु लागतो. हळूहळू शरीराचा समतोल राखला गेला की पुन्हा आपल्याला बरं वाटू लागतं. त्या टेकडीच्या भोवताली हिंडावं आणि मजेत गाणी गावीत असं वाटायला लागतं. थोड्याशा अंतरावर कुत्र्या-मांजराची काही पिल्ले आपल्या आईला बिलगून झोपलेली असतात. जरा आवाज झाला किंवा एखादे पाखरु डोक्यावरून उडाले म्हणजे केवळ ती पिले कान टवकारतात पण आईला मारलेली मिठी काही सोडत नाहीत.. हे दृश्य पाहिलं म्हणजे त्या पिलांना मिळणारी ऊब आपल्या डोळ्यातून हळूच मनात शिरते. थंडीच्या चाहूलीनं टेकडी आणि त्याभोवतालचं सारं जगच वेगळं रुप धारण करु लागतं..

हे सारं पाहत असताना ऑफिसात जाण्याची एखाद्या क्षणी आठवण होते आणि लहान मुलाच्या हातून खेळणं काढून घेत पटकन कुणीतरी त्याला धम्मक लाडू द्यावा तशी आपल्या मनाची स्थिती होते. आपण परतीच्या मार्गाने जाऊ लागतो. त्या मार्गावर 'अमृततुल्य ' (चहाची टपरी किंवा दुकान) दिसलं की जागा मिळेल तिथे गाडी लावून दुकानात शिरतो. चहा हे थंडीतलं रामबाण औषध आहे. बाकी थंडीत काॅफी पिणाऱ्याविषयी माझ्या मनात जरा रागच आहे. काॅफी हे सकाळी घेण्याचं पेयच नव्हे. थंडीची चाहूल लागण्याच्या प्रक्रियेत सरबत, काॅफी वगैरे पेयांना स्थान नाही. चहा हा तेव्हा पेयांचा राजा आहे. चहा संपवून घरी जाऊन कसेबसे आवरत आपण ऑफिसला जातो. तिथून संध्याकाळी परत येताना थोडी थंडी जाणवते. पण त्याबरोबरच सकाळच्या आणि संध्याकाळच्या थंडीतला फरकही आपल्याला जाणवतो. पहाटे, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी थंडीची वेगवेगळी रुपे आपल्याला जाणवतात. आपल्याला जेव्हा थंडीची चाहूल लागते तेव्हा निसर्ग आपली स्वतःची रुपे खुलवण्यासाठी खास 'मेकअप' करीत असतो. हा साजश्रृंगार वगैरे मार्गशीर्षातल्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत सुरु असतो. म्हणूनच हा श्रृंगार ही देखील थंडीची एक प्रकारची चाहूलच आहे. धुकं हा निसर्गाचा मोठा अविष्कार आहे. रात्र लवकर होते नि दिवसही सावकाश उजाडतो. आपण साखरझोपेत असलो की या धुक्याची 'ड्युटी' सुरु होते. दिवस उजाडेल तसं पानापानावरुन दवबिंदूंचं रुप घेत धुकं आपल्या नकळत नाहीसं होतं. डोंगरावरच्या घरात दवबिंदूंचा टपटप आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. नुसत्या चाहूलीनेच इतके सारे बदल होतात ती थंडी बहरली म्हणजे अजून कितीतरी होतील याची आपल्याला कल्पना येते. प्रेमाच्या प्रांतात थंडीच्या चाहूलीनं तर खासच बदल होतात. प्रेमाचा रंग गुलाबी आहे हे थंडीत आपल्याला जाणवतं. थंडीची चाहूल लागताच उबदार मिठीची स्वप्ने पडू लागतात. मनातल्या मनात प्रणयाची चित्रे रेखाटू लागतात. त्यात बहरणारी थंडी त्या चित्रातली एकेक चौकट हळूवार रंगवीत असते. अशावेळी कुणी कवी शब्दांत दवबिंदू शोधत असतो.

रात्रीच्या वेळी कार्तिक पौर्णिमेला थंडीची पहिली चाहूल जाणवते. त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी थंडी दुडूदुडू धावू लागते. प्रत्येक रात्रीत नवा बदल घडतो. मावळत्या ऋतूला निसर्ग निरोप देऊ लागतो आणि नव्या ऋतूचं स्वागतही करतो. या निरोप आणि स्वागतात निसर्ग समतोल साधतो... खरंतर या गुलाबी ऋतूची चाहूल हा समतोल निसर्गाकडून आपल्याला शिकण्यासाठीच असते.. जुन्या नि नव्याचा मेळ या चाहूलीत कुठेतरी दडलेला असतो. तोच आपल्याला साधता यायला हवा. म्हणूनच आपल्या आयुष्यात 'चाहूल' या गोष्टीला खास महत्व आहे. थंडीची चाहूल लागताच जुनं हळूहळू विसरुन नव्या ऋतूचं स्वागत करत त्याच्या गुलाबी रंगात, धुक्यात, दवबिंदूत अगदी मनापासून रमता आलं म्हणजे थंडीची चाहूल देखील सत्कारणी लागेल..

-
गौरव भिडे