आश्रयदाता..

युवा विवेक    25-Nov-2024
Total Views |

 
आश्रयदाता..

 
 

माझे आवडते ठिकाण
आश्रयदाता.. (राजगड)

 

सह्याद्रीवरच्या या काळ्या कातळांची केवढी पुण्याई. राजा देखीला, स्पर्शीला अन् जाणीला. राजांची पायधूळ याच्या पायरीला लागली, तसं उभ्या देहाचं सोनंच झालं. हिरव्या गवतात अन् धुक्यात हरवलेल्या वाटा जणू जीवंतपणी स्वर्ग पाहण्यासाठीच आहेत असं वाटतं. कुणासाठी हा दुर्ग प्राचीन इतिहासाचं साधन असेल. कुणासाठी सह्याद्रीवरील निसर्ग पर्यटन स्थळ तर कुणासाठी फक्त कातळ पण काहींसाठी हाच दुर्ग 'मंदिर' आहे. माझा राजा कसा होता? याचं उत्तर फक्त हाच देवू शकतो.आणि तो देतोय सुद्धा. याच्या कड्यावरून फेसाळत गर्जत वाहणारे पाणी सांगत असते की, माझा राजा असाच या सह्याद्रीत गर्जला होता. जेव्हा पांढऱ्या शुभ्र ढगाचं छत्र गड धारण करतो तेव्हा तो इतकीच निखळ साद घालतो की माझ्या राजाचं मन असंच स्फटिकासारखे निर्मळ होते. माझी अभ्यद्यता, अजस्त्रता आणि आवाका राजियांसारखाच आहे. गडावरचा आल्हाददायक गार वारा राजियांच्या मुखातून कैक रांजल्या गांजल्या मनावर फुंकर घालतोय. स्वराज्य हे स्वतंत्र राज्य आहे म्हणूनच या गडाचं नाव शिवरायांनी राजगड ठेवलं. राजगड राजियांचा गड. शिवराय म्हणायचे रायगड अदमासे ४ लाख जीवांना आश्रय देतो. आणि हा देवदुर्लभ दुर्गराज राजगड या ४ लाख जीवांच्या पोशिंदयाचं आश्रयस्थान होता. 'आपण आमची फिकीर न करता आपल्या रांगणाऱ्या स्वराज्याला मोठे करावं.' अशा शिव सईच्या प्रेमाची साक्ष होता राजगड. 'या राजगडाला अखेरचा माथा टेकल्या बिगर म्या वरचा रस्ता धरायचो नाय.' त्या तान्हा,बाजी, मुरारबाजींचा होता हा राजगड. बारा कोसांचा घेर, तीन बुलंद माच्या आणि त्याच्या मधोमध ऐटीत ठाण मांडून असलेला बालेकिल्ला. कधी डुब्यावरून जर शांत एकटक धुक्यात लपलेल्या बालेकिल्ल्याकडे पाहत बसला तर त्याचा मोह स्वर्गा पेक्षाही अधिक ठरेल. "या डोंगराच्या दऱ्याखोऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. इथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते." असे औरंगजेबचा अधिकारी साकी मुस्तैदखान म्हणायाचा. खणखणणाऱ्या समशेरी, हर हर महादेवच्या गर्जना, कैक दिग्विजयाच्या नौबती आणि त्या महापुरुषाच्या ओठांवरचं जगदंब जगदंबचे बोल याच काळ्या कातळांनी आपल्या कानी साठवून ठेवलेत. इथल्या पाण्यावरती आजही जो तवंग उठतो तो या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा आहे. याच्या छातीचे कातळ कोट आजही त्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत ज्याचा आम्हाला कधीच विसर पडला...

 
"राजं, आयुष्यात जर हा पोटा-पाण्याचा प्रपंच नसता तर याच सह्याद्रीत भटकत राहिलो असतो. अगदी कायमचा..!

 

- प्रज्योत काटकर
स प महाविद्यालय, पुणे
तृतीय वर्ष कला शाखा