कला आणि अहंकार

10 Dec 2024 14:49:53


कला आणि अहंकार

 

'कलेला अहंकाराचा शाप असतो' असं म्हणतात. पण खरंतर असं म्हणणं म्हणजे कलेच्या शुद्ध स्वरूपाला आपणच डागाळण्यासारखं आहे. कलेला नाही, कलाकराला अहंकाराचा शाप आहे, असतो! मुळात कला ही विद्येसारखी सर्वसुलभ नसते. साधनेने काहीच दुर्लभ नाही असं आपली संस्कृती सांगत असली, तरी कला आत्मसात करणं तुलनेने कठीणच. 'विद्या ही बाहेरुन आत जाते, आणि कला ही आतून बाहेर येते' हा कट्यार काळजात घुसली मधील संवाद कलेचं गूज हेरणारा आहे. ते अगदी खरंय. म्हणूनच अस्सल कलाकार मोठ्या प्रमाणत नसतात. स्वतःतील स्वत्वच मागणारी कला आणि आयुष्याची ओंजळ तिच्यासाठी आतून-बाहेरुन रिती करणारा कलाकार..! साधनेची पराकाष्ठा केल्यावर कुठे तरी दिसणारा कलेचा आतला प्रकाश आणि तो साधताना मिळणारा थोडाफार लौकिक. इतकं सगळं करुन क्षणाक्षणाला स्वतःला तावून सुलाखून घेताना आणि उजळण्याची स्वप्न पाहून ती सत्याच्या गर्भात कष्टाने रुजवताना, प्रत्येक क्षणाला नव्या यातना सहन करुन आयुष्याचंच तप करणारा असतो खरा कलाकार.

जे तापतं, जे तापवतं ते तप! या तपाची आग कदाचित प्रकट होते ती अहंकाराच्या जाळातून. हा जाळ वरवर श्रेष्ठ वाटत असला तरी ते जाळं असतं. याचं भान सुटलं तर संपलंच! कारण या जाळात वरवर कलाकाराला त्याची श्रेष्ठता वाटत असली, तरी त्यालाच जाळणारा असतो अहंकार. अहंकाराच्या वाऱ्याने सुद्धा कलेचं कमळ सुकून जातं. मागे काही काळ सुगंध उरतो खरा, पण तोही निरोपाचा. निरोपाच्या सुगंधाची वेदना त्याच्या आवाहनाने व्याकूळ होण्याहून अधिक जहरी असते. अहंकाराच्या धुंदीत जाणवणारा सुगंध हा असा निरोपाचाच तर असतो! पण ते कदाचित तेव्हा जाणवतही नाही. जाणतो तो फक्त सुगंध. त्याचं 'आपलं' असणं. ज्या कलेसाठी आयुष्याची माती आतून आतून कसून काढली त्या मातीचा चिखल होतो आणि अहंकाराची धुंदी माणसाचा विवेकच कैद करते! कला त्याक्षणी निरोप घेते. ही कला कुठलीही प्रथितयश कला असेलही, पण जगण्याची कला सुद्धा असतेच. जगणारा प्रत्येक जण कलाकार असतो आणि कलाकाराला अहंकाराचा शाप असतो. शापाचं भान ठेवणं नि त्यानुसार वागणं हाच तर एकमेव उःशाप!

'मरणाचे स्मरण असावे' असं तुकोबांनी म्हटलंय. अहंकार हेच मरण. मरणाहून घातक मरण. त्याचं स्मरण ठेवलं तरी आपली उंची न सोडताही माती आपलीशी करता येईल. तेव्हाच मुळं घट्ट होतात आणि मुळं जितकी घट्ट, जेवढी खोल, तेवढीच उंची मोठी.

रोजचा सूर्यास्त कानामनात हेच तर सांगून जातो. सूर्याला कुठलाच शाप नसतो. तो अखंड प्रकाशमान असतोच. पण आपल्यासाठी मावळतो. तशी कला सुद्धा शापरहितच. पण अहंकार दिसताच मावळून जाणारी. ती एकदा मावळून गेली की मग पुन्हा तिचं आवाहन करणं हे किती किती दुरापास्त असेल! कलेच्या स्वरुपावर कुठलाच डाग नाही, मात्र कलाकाराला अहंकाराचा शाप असतो!

म्हणा.. शापाशिवाय काही गोष्टी आपल्याला समजतच नाहीत आपल्याला. याला काळ साक्षी आहे.

 

~ पार्थ जोशी
Powered By Sangraha 9.0