वेगळं काहीतरी हवं आहे..

युवा विवेक    14-Dec-2024
Total Views |


वेगळं काहीतरी हवं आहे..

 

माणसाला आपल्याजवळ जे आहे त्यापेक्षा नेहमीच काहीतरी वेगळे हवे असते. हे वेगळे काहीतरी हवे असणे, हे प्रत्येकाच्या स्वभावात कमी -अधिक का होईना पण असतेच. वेगळे हा शब्द काही व्याख्येत बांधता येणार नाही. कुणाला वेगळे म्हणजे काय हवे हे आपण कसे सांगणार! हे वेगळे जाणून घेण्याची ज्याला तीव्र इच्छा असेल, तो कदाचित शास्त्रज्ञ किंवा संशोधक होत असावा. या वेगळं काहीतरी हवं असण्यामुळेच नवेनवे शोध लागतात. अगदी रोजच्या जेवणातील त्याच त्याच पदार्थांचा आपल्याला काहीवेळा कंटाळा येतो. कदाचित यातूनच आमटीसारख्या साध्या पदार्थातही कितीतरी प्रकार असतात. चिंच गुळाची आमटी, मसाल्याची आमटी, बाजार आमटी आणि आमटीच्या जवळ पोहोचणारे फोडणीचे वरणही या वेगळे खाण्याच्या इच्छेतूनच जेवणाच्या पानात आले असावेत. परवा माझी एक भाची आपल्या आईला सांगत होती, " रोज रोज काय गं सारखी पौष्टिक भाजी करतेस! आज काहीतरी हटके भाजी कर न.. तेव्हा हल्ली वेगळे ह्या शब्दाकरिता 'हटके' असा शब्द रूढ झाला आहे, हे माझ्या लक्षात आले. हे असं हटके वागणाऱ्या मंडळींनाच हल्ली लवकर प्रसिद्धी मिळते.

वेगळं काहीतरी हवं असण्यामागे धावणं अगदीच काही वेडेपणाचं नाही. हल्ली धकाधकीच्या जीवनात रोजचा दिवस काहीवेळा ताणाच्या छायेतच जातो. पण आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे या कल्पनेच्या आधारावरच आपण तग धरुन असतो. आपल्या कल्पनेतल्या त्या वेगळेपणाशी आपली भेट झाली की आपला ताण कमी होतो. भोवताली असलेल्या माणसांचा तोच तो पणा आपल्याला काहीवेळा नकोसा होतो. म्हणूनच वेगळेपणाच्या कल्पनेतून नव्या ओळखी होतात. नवी नाती जुळतात. वाचन हा अनेकांचा छंद असतो. काही जणांना कादंबरी, काही जणांना कथा, तर काही जणांना प्रवासवर्णने वाचायला आवडतात. पुस्तक बदलण्यासाठी आपण वाचनालयात जातो. तिथे वेगळे काहीतरी शोधताना चटकन एखादे पुस्तक आपल्याला आवडते. यातूनच कथासंग्रह आवडणाऱ्याला कादंबरीदेखील आवडू लागते. प्रवासवर्णने वाचायला आवडणाऱ्या वाचकाला एखाद्या कवीच्या जीवनाचा प्रवास काव्यसंग्रहातून जाणून घ्यायला आवडेल.. या वेगळेपणातूनच वाचनासारख्या छंदातही प्रगल्भता येते. माणसाला वेगळं काहीतरी हवं असतं हे खरं असलं तरी काहीजणांना हवं असणारं वेगळेपण कडीकुलूपात बंद असतं. त्याची किल्ली काही केल्या सापडत नाही. तेव्हा माणूस थोडासा निराश होतो. एखाद्या जखमेची वेदना मधेच जाणवावी तशी ती निराशा सलत राहते. तेव्हा वाटतं हे 'वेगळं काहीतरी ' आपल्या आवाक्यातलंच असावं..

माणसाला काहीतरी वेगळं हवं असतं तसंच निसर्गालाही काहीतरी वेगळं हवं असतं. सहा ऋतू आणि सजीव सृष्टी यांची सांगड घालण्याचे कार्य निसर्ग अखंड करीत असतो. पण काहीवेळा उन्हाळ्यात अचानक भरुन येतं आणि पावसाला सुरुवात होते. हिवाळ्यात एखाद्या दिवशी कडक ऊन पडतं. तेव्हा मात्र आपल्याला निसर्गाचा राग येतो. पण थोडासा वेगळा विचार आपण करायला हवा. निसर्गाचं कधीतरी हे असं वेगळं वागणं आपण स्वीकारायला हवं. आपल्याप्रमाणेच साऱ्या सजीव आणि निर्जीव सृष्टीलाही वेगळं काहीतरी हवं आहे.. अशोक सराफ यांची प्रमुख भूमिका असलेला 'एक उनाड दिवस ' हा चित्रपट हे छान उदाहरण आहे. काटेकोर, शिस्तप्रिय असणाऱ्या अशोक मामांचा वाढदिवस असतो. पण तरीही ते नेहमीच्या पद्धतीने कामे करत असतात. जवळचे लोक व कुटुंबिय त्यांना सांगू पाहतात, " एखादा दिवस तरी वेगळं जगावं माणसाने.. आयुष्य पाच वर्षांनी वाढतं!" हळूहळू तसंच होऊ लागतं आणि एक उनाड, एक वेगळा दिवस ते जगतात... असा एखादा उनाड दिवस आपण जगून बघायलाच हवा. 'वेगळं काहीतरी हवं आहे म्हणणाऱ्या मनाचं आपण कधीतरी ऐकायला हवं. पैसा आणि इतर भौतिक गोष्टींपेक्षा वेगळं जगणं तुम्हाला खरा आनंद देईल. जगाकडे आणि स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. धूसर झालेलं आयुष्य स्वच्छ होईल.

कविवर्य विंदा करंदीकरांची एक बोलकी कविता आहे. विंदा म्हणतात, " सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते नि तेच ते.." आपलं आयुष्य असंच तेच ते नि तेच ते असतं. तेच ते जगताना मन आपल्याला साद घालतं, ' वेगळं काहीतरी हवं आहे ' तेव्हा त्या मनाचं आपण ऐकायला हवं. वेगळेपणाचा आनंद घेतला की मन फुलासारखं टवटवीत होतं. दुसऱ्या दिवशी नव्या जोमाने काम करु लागतं. हल्लीचा 'हटके' शब्द आपण जगून बघायलाच हवा..

- गौरव भिडे