सुगीचे दिस..! भाग - ११

पाटील सांगावा सांगून गेले, अन् मायने बिगी बिगी आवरून पहाटेची न्याहारी करायला म्हणून मला आवाज दिला.

युवा विवेक    21-Feb-2024   
Total Views |
 
सुगीचे दिस..! भाग - ९
सुगीचे दिस..! भाग - ११
पाटील सांगावा सांगून गेले, अन् मायने बिगी बिगी आवरून पहाटेची न्याहारी करायला म्हणून मला आवाज दिला. मी तुळसा नानीच्या टपरीवर बसून गप्पा झोडीत बसलो होतो. आजाच्याला नारळी सप्त्याची समाप्ती होणार होती. मग साऱ्या गावात रांगोळ्या काढून झाल्या होत्या, पालखी निघायची तयारी सुरू होती. सावता माळ्याच्या देवळात स्वयंपाक चालू होता. काल वावधन आल्यानं सगळ्यांची भंबेरी उडाली होती मात्र वेळीच पाऊस न पडल्याने सगळ्यांचा जीवात जीव आला होता. आता मात्र सप्त्याची सांगता कुठलेही विघ्न न येता होणार होती.
सप्त्याची सांगता असूनही आम्हाला आज घरी थांबता येणार नव्हतं, कारण पाटलांनी धाडलेला सांगावा अन् सध्या उक्त्यात सुरू असलेली कामाची रेलचेल त्यामुळं गावात आज धामधूम असूनही आम्ही निवांत होतो. मायना आवाज दिला तसा मी पहाटेच्या न्याहारीसाठी आमच्या झोपडीवजा घराकडे निघालो. मायची बीगीनेच कामाची आवराआवर सुरू होती,वमी एका थाटलीत उलीसं कोड्यास घेऊन भाकरीचा तुकडा मोडून तिच्यात बुडवून खात बसलो होतो. माय परसदारी असलेल्या चुल्हीतून राखुंडा घेऊन बासनं करत बसली होती.
तितक्यात इस्माईल आणि त्याची माय अन् शांता आक्का आमच्या घराच्या दिशेनं मला बोडक्या बाभळीच्या पल्ल्याड दिसल्या. मी ही पटकन भाकर खाऊन, मायना घासलेली बासनं घरात ठेवली अन् मायने बांधलेल्या भाकरीच्या पेंडक्याला घमिल्यात ठेऊन दाराला कडीकोंड्यात अडकवून निघालो. मायना डोक्यावर पदर घेतला अन् माय, शांता मामी इस्माईलची माय यांच्या संगतीने वाटेला लागली.
इस्माईलने सावता माळ्याच्या देवळात सुरू असलेल्या सप्त्याच्या स्वयंपाकातून दोन गिल्लासात भरून बुंदी आणली. त्यातील एक गिल्लास मला देऊन तो ही एका गिल्लासातील बुंदी खाऊ लागला. आज पहाटेच लवकर जाऊन सांजेच्या चारच्या पारापर्यंत कांदे काढायचं काम पूर्ण होण्याचा अंदाज होता. काम पूर्ण झालं की मग तिकडून येताना पाटील घरी खायला काही म्हणून काही दुभळके, डोंगळे कांदे आम्हाला निवडून देणार होता.
काही नसल्यापेक्षा बरं म्हणून आम्ही आज खुश होतो. कामाचा उरक बघून काम पटकन करून चारच्या पारगाला घरी यायचं. जमलं तर सप्त्याची सांगता पण हाती लागल, म्हणून आम्ही वाटेनं जरा पाय उचलूनच घेतले आणि पाटलांच्या वावराला जवळ करायला लागलो. पहाटच सगळ्या गावात सप्त्याची सुरू असलेली लगबग आणि आमचं कामाला जाण्याची लगबग बघून गावातल्या घरी असलेल्या बायका इस्माईलच्या मायला अन् शांता मामीला प्रश्न करू लागली.
डोक्यावरील पाटी सांभाळत तिघी एकमेकांना बघून गावातल्या बायकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ लागली . मी अन् इस्माईल बुंदी खात चालत असल्यानं गावातली पारावर बसलेली माणसं आमची फजिती होईल आम्ही चिडू म्हणून आमची मजाक उडवू लागले. आम्हाला म्हणू लागले छोट्या कामदार पोरांना रोज गावची उखीडे हिंडणारे तुम्ही आज तरी घरी राहून गावच्या कार्यात वाढूसवरू लागायला रहायचं होतं. पण; आमचं काम आमच्या गरिबीच्या अठरा विश्व दारिद्य्र असलेल्या परिस्थितीमध्ये किती महत्त्वाचं अन् उद्याचे येणारे दिवस त्यावरच आमचं घर चालणार होतं हे त्याना कळणार नव्हतं.
कारण आता उन्हाळ्याचे दिवस काही पंधरादी सरली की लागणार होती अन् एकदाका कडक उन्हाळा सुरू झाला का मग मात्र लोकांच्या शेतातील कामे आवरती होतील. अन् मग भर उन्हात रोजीरोटी न भेटल्याने खायची वानवा होणार होती. हे भविष्य पारावर गप्पा हाणत असलेल्या लोकांना दिवस नव्हतं. आम्ही हातात असलेल्या गिल्लासातील बुंदी खात तापलेल्या भुईवर फुफाट्यात पाय रोवत चालत होतो.
क्रमशः
भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!