नुकतंच मनसमझावन वाचलं… संग्राम गायकवाडांची ही दुसरी कादंबरी. दखनी भाषेला अर्पण केलेली… पुढच्याच पानावर संत कबीर, समर्थ रामदास, शाह तुराब यांच्या ओळी… नेमका अर्थ समजायला थोड्याशा अवघड वाटल्या पण हे प्रकरण काहीतरी वेगळं, छान वाटतंय म्हणून वाचायला सुरुवात केली. सुरूवातीलाच लालबाबाचा दर्गा बोलू लागतो आपल्याशी… मग चिन्मय, मंजिरी अशी कादंबरीतली पात्रं निवेदकाची त्यांची त्यांची भूमिका पार पाडतातच पण या शैलीतही गंमत आहे…या कथनाचा कुणी एक निवेदक नाही चिन्मय स्वतः तर आहेच पण व्हॉट्सअॅप, म्हसोबा, चिन्मयचं ट्विटरचं अकाउंट, एवढंच काय तर बाभूळगावाहून अयोध्येच्या राममंदिरासाठी, कारसेवेतून गेलेली वीट, दखनी भाषा अशी कितीतरी पात्रं ही गोष्ट त्यांच्या त्यांच्या दृष्टिकोनातून सांगतात.
या कादंबरीतली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे चिन्मय लेले… हिंदुत्ववादी तरुण… इतका की ट्विटरवर संघी चिन्मय अशी ओळख सांगणारा, डाव्या विचारसरणीच्या लोकांवर, लिबरल माणसांवर कडकडून टीका करणारा… तो दत्तक घेतला गेलेला मुलगा आणि ही गोष्ट त्याच्या दत्तक आईने त्याला योग्य वेळी सांगितलेली… पण आपली जन्मदाती आई कोण या प्रश्नाने त्याला झपाटलेलं… ती कोण असेल, कुठे असेल, आपल्याला अनाथाश्रमात का सोडून गेली असेल असे कितीतरी प्रश्न आणि या सगळ्याचा शोध घ्यायची इच्छा त्याला स्वस्थ बसू देईना… चिन्मयचा जन्मदात्या आईचा शोध सुरु होतो आणि ही गोष्टही… कट्टर हिंदू असणाऱ्या चिन्मयला त्याची आई मुसलमान असल्याचं कळतं आणि मग कादंबरी वेग आणि वाचणाऱ्यावर पकडही घेते… शिवाय गोष्ट घडते कोरोनाच्या काळात... अजूनही अगदी ताजा असणारा आणि आपण सगळ्यांनीच अनुभवलेला हा काळ. त्यामुळे पार्श्वभूमी माहितीची, ओळखीची. एकूणच सगळी गोष्टच आपला वर्तमान सांगता सांगता चिन्मयच्या आयुष्यात 'पुढे काय? ' हा प्रश्नही कायम ठेवते.
ही सगळी गोष्ट केवळ चिन्मयच्या वैयक्तिक शोधाची उरत नाही… ती सगळ्या समाजाची होते. वेगवेगळया व्यक्ती आणि त्यांच्या विचारधारा आपल्यासमोर येत राहतात. हिंदू-मुस्लीम ही भारतातली मिश्र संस्कृती, ऐतिहासिक संदर्भ आणि काळाबरोबर बदलत गेलेली परिस्थिती अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर उलगडत जातात. गोष्ट फक्त चिन्मय, त्याची मुसलमान आई, तिचं मूळ गाव बाभूळगाव, तिथला लालबाबाचा दर्गा, म्हसोबाचं ठाणं आणि तिथली परिस्थिती एवढ्यापुरतीच राहत नाही. हिंदू-मुस्लिम सहजीवन, त्यापलीकडेही असणारं भारतीयत्व अशा मुद्द्यांवर चर्चा होते. कादंबरी खऱ्या अथनि आजच्या काळाची गोष्ट वाटते. आजच्या समाजात आपल्या आजूबाजूला असणारी वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं आपल्याला कादंबरीत भेटत राहतात. त्यामुळे सारं कथन जास्त खरं वाटत राहतं. सामाजिक, धार्मिक मुद्यांवर लिहिणं आणि तेही प्रत्येक विचारधारा (ती लेखकाला पटत असो वा नसो) विचारात घेऊन, नक्कीच सोपं काम नाही.पण हे सारं लेखकाने उत्तम साधलंय, संयमाने लिहिलंय. काय चूक, काय बरोबर हे सांगायच्या भानगडीत न पडता जे जसं आहे तसं लिहिलंय आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून वाचणाऱ्याला विचार करायला भाग पाडलंय. आपल्या समजुती, मूल्यं, विचारधारा काहीही असो ती पुन्हा एकदा तपासून पाहायला हवीयत की काय असं वाटायला लागतं. आणि सध्याच्या धार्मिक कट्टरतेच्या काळात हे लेखन म्हणूनच जास्त महत्त्वाचं वाटतं.
'मनसमझावन' हा शाह तुराब या सुफी संताने रचलेला ग्रंथ… समर्थ रामदासांच्या 'मनाचे श्लोक'ला प्रतिसाद म्हणून… लालबाबांनी त्यांची दीक्षा घेतलेली. पुढे बाभूळगावात आल्यावर तिथल्या म्हसोबाचं गुरवपण या सूफी संताने स्वीकारलं आणि नंतर म्हसोबाच्या देवळाशेजारी लालबाबाचा दर्गा बांधला गेला. पुढे धार्मिक तेढ निर्माण झाली आणि सगळंच वातावरण बिघडलं पण या सगळ्या काळातही 'मनसमझावन' या ग्रंथासारखा किंवा पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांचा, लोकधर्माचा सांस्कृतिक वारसा कुठेतरी शिल्लक उरतोच. या कट्टर धार्मिकतेच्या काळात हिंदू-मुस्लिम सहजीवन किंवा भारतीयत्वाच्या आधारावर उभी राहिलेली मिश्र संस्कृती जपायची तर हे आधुनिक संविधान मूल्यांच्या माध्यमातून शक्य आहे की सांस्कृतिक वारशातून, लोकधर्मातून हा प्रश्न आणि उत्तराच्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या दृष्टीने असणाऱ्या शक्यता आपल्यासमोर येतात आणि अर्थातच आपल्यालाही विचार करायला लावतात. एकीकडे चिन्मयचा त्याच्या आईचा शोध सुरूच राहतो, शेवटी पूर्णही होतो पण त्याचसोबत वेगवेगळ्या निवेदकांच्या माध्यमातून वर्तमान आणि ऐतिहासिक सामाजिक, धार्मिक गोष्टी आपसूकच समोर येत असतात. चिन्मयचा शोध या सगळ्या गोष्टींना एकत्र सांधत जातो… आपल्याला गुंतवून ठेवतो.
कादंबरी वाचता वाचता शीर्षकही समजू लागतं. मुखपृष्ठही नेमकं झालंय हेही लक्षात येतं... शेवटच्या काही ओळी इथे सांगते - "मनसमझावनचा अर्थ होतो मनाची समजावणी. हिंदू असोत की मुसलमान असोत, सगळ्यांचा ईश्वर एकच आहे ह्याची जाणीव व्हावी, धर्म, संप्रदाय आणि जातपात यांच्या सीमा ओलांडून सद्धर्म आणि सदाचाराचा मार्ग चोखाळावा, चराचरात ईश्वराचा वास आहे ह्या सत्याचा साक्षात्कार व्हावा यासाठी केलेली ही मनाची समजावणी आहे."
'मनसमझावन हे शीर्षक आणि एकूणच कादंबरीही आपल्याला हीच गोष्ट सांगू पाहते. धार्मिक कट्टरतेतून काहीच साध्य होणार नाही… हिंदू-मुस्लिम अशा धर्माच्या कप्प्यात स्वतःला बंद करून घेण्यापेक्षा आपली संस्कृती, परंपरा समजून घेऊन लोकधर्म आचरला पाहिजे. विवेकाने वागलं पाहिजे. विशिष्ट जातीधर्माबाबत टोकाची मतं असतील तर ती पुन्हा तपासून पाहण्याची गरज ही कादंबरी अधोरेखित करते. आजचं सामाजिक, धार्मिक वास्तव मांडताना सद्सद्विवेकाने विचार करण्याची गरज आणि दिशाही आपल्यासमोर आपल्यापुरती स्पष्ट होते. 'मनसमझावन' आजच्या काळात आवर्जून वाचावी अशी कादंबरी आहे हे नक्की!
- चैताली चौकेकर