तुजविण शीण होतो..

युवा विवेक    16-May-2024
Total Views |


तुजविण शीण होतो...


वैराग्याची तप:पूत मूर्ती असलेल्या समर्थ रामदास स्वामींनी करुणाष्टकांतून श्रीरामाची करुणा भाकली ती जणू जनसामान्यांसाठीच. रोजच्या जगण्यात माणूस धडपडतो, थकतो, दमतो, तेव्हा पूर्वकर्माच्या ज्वाळा पोळत राहतात. सबाह्य, अखंड लागत राहते सोसण्याची धग. या अवस्थेत फोल ठरत जातात आपणच नेमाने तयार केलेले खोट्या अभिमानाचे निरर्थक भ्रम. तेव्हा शोधत जातो माणूस दैवी आधार, असा आधार जिथे त्याला मिळेल हायसं करणारं आश्वासन, असा आधार जिथे नसेल उपकारांची जाणीव, जो दाखवून देणार नाही खोल आतली उणीव.. असा आधार असू शकतो तो केवळ त्याचा, लाभेवीण प्रीती करणार्‍या, करत राहणार्‍या श्रीरामाचा. तेव्हा मारली जाते 'त्या'ला अंत:करणातून हाक. कदाचित तेव्हा उमटत नाहीत शब्द, डोळेच बोलून जातात खूप काही तसे भावनांचे भार उतरतात त्याच्या चरणांवर. मात्र आपण हलकं होणं ही त्याचीच कृपा, लाभेवीण प्रीती असते. हा भाव शब्दांत व्यक्त कसा होईल असा विचार केला तर डोळ्यांसमोर येतात ती समर्थांची करुणाष्टके... त्यांमधे सौंदर्य आहे, अर्थ आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उत्कट भाव आहे.

अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।

परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥

अचपळ मन माझें नावरे आवरीता ।

तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥सुरुवातीला जणू तो भक्त म्हणतो की रोजच्या पश्चातापाने किंवा रोजच्या जगण्यामधे होणार्‍या पश्चातापाने मी तापलो आहे. ही पश्चात्बुद्धी माणसाला शांत राहू देत नाही. ती तापवत राहते माणसाला, आतून तशी बाहेरूनही. असं म्हणतात की पश्चातापाने पापाचं निरसन होतं कदाचित म्हणुनच तो पापाला जळणारा अदृष्य अग्नी इतका दाहक असावा. तो शमविण्यासाठी हाक मारावी लागते ती अर्थात रामाला, तोच एकमेव त्राता असल्याने मांडावं लागतं हृद्गान ते आपला वाटणार्‍या आणि असणार्‍या रामरायापाशी. त्याला हाक मारली आहे ती दीनांविषयी परम दया असणारा म्हणुन... या हाकेतूनच नकळत प्रार्थना केली जाते.

करुणाष्टकातल्या या ओळींचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की अनुतापाने तापल्याचं निवेदन सुरुवातीला असलं तरी प्रार्थना आहे ती केवळ त्या तापाच्या निवारणाची नाही तर मोह मायेचं निरसन करण्याची. कदाचित भौतिक दु:खामुळे भौतिक सुखांच्या क्षणिकतेची जाणिव आहे, मोहमायेच्या पल्याड असणार्‍या शाश्वताची आस आहे. कदाचित म्हणून मर्यादित दु:खाच्या कारणाने केलेली व्यापक होत गेलेली ही प्रार्थना आहे. इथे मनाच्या अचपळतेची, त्यासमोर असमर्थ ठरणाऱ्या स्वत:ची लख्ख जाणिव आहे, खोट्या अहंकाराला जराही वाव नसल्याने प्रार्थनेत निखळता आहे. मन कितीही आवरायला गेलं तरी आवरत नाही याचं नम्र निवेदन आहे आणि पुढे तुझ्याशिवाय शीण येतो, जणू तुझ्याशिवाय जगणंच शीण होतं हा स्वानुभव सांगत श्रीरामाला धावत येण्याची व्याकुळ हाक मारली आहे. हाक मारली आहे ती धावत येण्यासाठी, इथे आपण हाक मारल्यावर 'तो' येतोच हा दृढ विश्वास आहे आणि त्याचबरोबर धावत येण्याचं सांगण्यात भक्ताचा देवावरचा प्रेमाचा अधिकार आहे.

त्याला हाक मारली आहे त्याने येण्यासाठी, त्याच्या अस्तित्वाचा चैतन्यस्पर्श होऊन जीवन उजळणण्यासाठी, पैलाची जन्मतहान शमविण्यासाठी...

~ अनीश जोशी.