
क्रिकेटने मला काय शिकवले..
२. कर्तव्य प्रथम..!
आपल्या देशासाठी क्रिकेट खेळणे हे एक राष्ट्रीय कर्तव्यच आहे. आजचे किस्से ज्या दोन खेळाडूंचे आहेत त्यांनी त्या त्या वेळी आपल्या कृतीतून हे सिद्ध केले आहे.
पहिला किस्सा आहे भारताच्या सगळ्यात यशस्वी कर्णधारचा. महेंद्रसिंग धोनीचा! गोष्ट आहे २०१५ च्या विश्वचषकाची. यावेळीही भारताचा कर्णधार धोनीच होता. या विश्वचषकाचा यजमान संघ होता ऑस्ट्रेलिया. पहिली मॅच होती १४ फेब्रुवारीला. याच्या ८ दिवस आधी म्हणजेच ६ फेब्रुवारीला धोनीच्या घरून एक अतिशय मोठी आनंदवार्ता आली. त्याला कन्यारत्न प्राप्त झाले होते. एखाद्या माणसाच्या आयुष्यात सन्तानप्राप्तीपेक्षा कोणता मोठा आनंदाचा क्षण असू शकत नाही. धोनीने स्वतः ही वार्ता एक पत्रकार परिषदेतून सर्वांना सांगितली. त्याने सांगितले की, मुलगी आणि मुलीची आई दोघीही नीट आहेत. मला बऱ्याच जणांनी विचारलं की मी परत जाणार आहे का नाही पण सध्या मी नॅशनल ड्यूटि वर आहे. आणि माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी हा वर्ल्ड कप सोडून जाणार नाही.
यानंतर भारताने ग्रुप स्टेज मधले सगळे सामने धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकले. पण सेमीफायनल मधे ऑस्ट्रेलिया कडून भारताला शिकस्त मिळाली. आणि आपल्या मुलीच्या जन्मानंतर तब्बल दीड महिन्यानी धोनी तिला भेटला. मला लिहिताना किंवा तुम्हाला वाचतानादेखील अंगावर काटा येतो. तर तेव्हा काय झालं असेल? सेमीफायनल हारल्यामुळे आधीच चाहते संतापले होते. त्यात धोनीनी आपल्या दीड महिन्याआधी जन्मलेल्या मुलीच्या डोक्यावरून अजून हातही फिरवला नव्हता. हा एक किस्सा मला बरंच काही शिकवून जातो.
दूसरा किस्सा आहे साल २००६ चा. भारताच्या सध्याच्या तेजस्वी ताऱ्याचा म्हणजेच विराट कोहलीचा. त्यावेळी विराट १७ वर्षांचा होता. रणजी ट्रॉफी मधे तो दिल्ली संघाकडून खेळत होता. दिल्ली विरुद्ध कर्नाटकचा सामना चालू होता. कर्नाटकने पहिल्यांदा बॅटिंग करून ४४० धावांचा विशाल स्कोर बनवला होता. आणि त्याचे प्रत्युत्तर देताना दिल्लीचे १४ धावांवर ४ गडी बाद झाले होते. त्यावेळी विराट बॅटिंगसाठी आला. त्या दिवसाअखेर विराट ४० धावांवर खेळत होता. रात्री विराट घरी झोपायला गेला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्री अचानक हार्ट अटॅक येऊन त्याच्या वडिलांचे निधन झाले. पुढच्या सकाळी ही बातमी दिल्ली संघाच्या ड्रेसिंग रूम मधे जाऊन पोहोचली. सगळ्यांना वाटले की आता विराट खेळायला येणार नाही. पुढचे दोन बॅट्समन बॅटिंगसाठी जाण्यास तयार झाले होते. त्यावेळी विराट आला. सर्वांना आश्चर्य वाटले. एकीकडे वडिलांचे शव पडलेले असताना विराटने आपल्या टीमसाठी ९० धावा बनवून आपल्या वडिलांना श्रद्धांजली दिली.
नंतर विराटने एकीकडे सांगितले की जर त्यादिवशी मी माझ्या दिवशी माझ्या टीमला संकटातून बाहेर काढण्यास असफल ठरलो असतो तर माझ्या वडिलांनी मला कधीच माफ केलं नसतं. टीमप्रति आपले कर्तव्य निभावल्यानंतर विराटने आपल्या वडिलांचे अंतिम संस्कार केले.
हे दोन्ही किस्से लिहिताना मला गहिवरून आले होते. शेवटी महेंद्रसिंग धोनी काय किंवा विराट कोहली काय हे दोघं मोठे आहेत ते याच्याचमुळे! या वरील दोन्ही किस्से आपल्याला हेच सांगतात की वैयक्तिक जीवनात कितीही आनंदाची किंवा कितीही दु:खाची गोष्ट घडली तरीही कर्तव्य प्रथम ठेवावे.
- देवव्रत वाघ