भ्रांत फिटली जीवाची..

युवा विवेक    30-May-2024
Total Views |


भ्रांत फिटली जीवाची..

 
संत जनाबाईंच्या अभंगांमधून सहज एक दृष्टी मिळत जाते, कधी विठ्ठलकृपेचं, सद्गुरुकृपेचं माहात्म्य वाचून कृतार्थ व्हायला होतं तर कधी त्यांचं देवाशी असलेलं विलोभनीय सख्य मनाला भुरळ घालत राहतं. अशा कितीतरी गोष्टी समजत-उमजत राहतात संत जनाबईंचे अभंग वाचताना मात्र त्यामधे एक गोष्ट कायम राहते ती म्हणजे त्यांच्या शब्दांतला मोहक साधेपणा...जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची ॥१॥एखादं अभिजात गाणं अनेकदा नकळत आपलं लक्ष वेधून घेतं आणि शक्यतो गाण्याच्या शेवटच्या भागात एक क्षण असा येतो की जो गाण्याला फार फार वर घेऊन जातो आणि नकळत आपल्यालाही. हा अभंग वाचताना कदाचित ही स्थिती अगदी सुरुवातीला, सुरुवातीच्या शब्दांत अनुभवायला मिळते. ज्याप्रमाणे दिवसभर प्रकाश, ऊर्जा देणारा सूर्य कितीही महत्त्वाचा आणि गरजेचा असला तरी उगवता सूर्यच अधिक मोहक वाटतो, आपलं रूपदर्शन देणारा ठरतो त्याप्रमाणे हा अभंग जणू आपलं सार सुरुवातीलाच प्रगट करतो. हे सार आहे ते 'शिवाशी जोडलं गेल्याचं...'. परमेश्वराशी जोडलं जाणं हेच भारतीय संस्कृतीने मानव जन्माचं ध्येय मानलं आहे, साध्य मानलं आहे मात्र असं असतानासुद्धा मार्गांचं स्वातंत्र्यही कायम ठेवलेलं आहे. ह्याच संदर्भात 'योग' ह्या शब्दाचा संदर्भ देता येतो. 'योग' हा संस्कृत शब्द तयार होतो तोच मुळी 'युज' धातुपासून. 'युज' म्हणजे 'जोडले जाणे' आणि म्हणून जो जोडतो तो 'योग'. अर्थात इथे अपेक्षित अर्थ आहे तो जीवाने परमेश्वराशी जोडलं जाण्याचा. म्हणूनच श्रीमद्भवद्गीतेमधे भक्तीयोग, ज्ञानयोग, सांख्यायोग, असे मानवी जीवनाचं सार्थक करणारे 'योग' येतात. जणू हाच अर्थ प्रतिपदित करत संत जनाबाई अभंगाच्या अगदी सुरुवातीलाच 'जोड झाली रे शिवासी...' असे कृतार्थ उद्गार व्यक्त करतात. ज्याप्रमाणे पहिल्यांदाच आपल्या गावाला जाणाऱ्या (तेही एकट्याने) एखाद्या व्यक्तीला आपलं घर सापडल्यावर त्याची अवघी काळजीच आपोआप मिटून जाते त्याप्रमाणे जणू शिवाशी 'जोडलं' गेल्यावर प्रत्येक जीवाची भ्रांत ही सहजी गळूनच पडणार असते... जो हरी तो हर आणि तोच हरिहर असल्याने विठ्ठलाची भक्ती करणाऱ्या संत जनाबाईंनी शिवाचा उल्लेख अभंगात का केला ? असा प्रश्न विचारणं म्हणजे स्वतःच्या अतिसंकुचितपणाचं प्रदर्शन करण्यासारखं झालं...
आनंदची आनंदाला । आनंद बोधचि बोधला ॥२॥

आनंदाची लहरी उठी । ब्रम्हानंद गिळिला पोटीं ॥३॥ही अभूतपूर्व स्थिती आनंदरूप, सच्चिदानंदरूप असल्याचं आपल्याकडे म्हटलं जातं. संत जनाबाई किती सुंदर वर्णन करतात या आनंदाचं. अशी स्थिती की जिथे आनंदच आनंदून जातो. अशी स्थिती जिथे 'त्या' शाश्वत आंनदस्वरुपाचा, आंनदाचाच बोध केला जातो जणू तेव्हा आनंदाच्या बोधातून आनंदाच्या स्थितीच्या सोहळा रंगत जातो. असा सोहळा जिथे दु:खाचा लवलेशही उरत नाही, असतो तो केवळ आनंद. सबाह्य उठून येतात आनंदाच्या लहरी... ब्रम्हानंद पोटात गिळला जातो... किती बोलके वाटतात हे शब्द, जी गोष्ट आपण खातो ती किती सहजतेने आपलीच होऊन जाते तास ब्रम्हानंद गिळल्यावर ज्या व्यक्तीने तो गिळला ती व्यक्ती आणि ज्याला गिळलं तो ब्रम्हानंद यांत भेद तो काय राहणार ? अर्थात तो गिळायला गिळणाराही अतुलनीय सामर्थ्य असणारच हवा. हे सामर्थ्य कसं प्राप्त होतं हे संत जनाबाई पुढे विशद करतातच.एक पण जेथें पाहीं । तेथें विज्ञप्ति उरली नाहीं ॥४॥

ऐसी सद्रुरुची करणी । दासी जनी विठ्ठल चरणीं ॥५॥ही स्थिती एकपणाची आहे, जिथे अवघ्या अस्तित्वाचं एकत्व आहे, केवळ एकत्व असल्याने तिथे ज्याला जाणायचं तो, जाणणारा आणि जाणीव असा भेद उद्भवण्याचं कारणच उरत नाही, तिथे विज्ञाप्ति उरत नाही. मगाशी बघितलं त्याप्रमाणे ब्रम्हानंद गिळण्याचं सामर्थ्य कोणामुळे प्राप्त होतं ? जिथे आनंदच आनंदून जातो अशी स्थिती कोणामुळे प्राप्त होते ? तर सद्गुरूंमुळे. ही करणी आहे ती केवळ सद्गुरूंची... जणू दास्यभावाने परमेश्वररूप असलेल्या सद्गुरुंच्या सेवेत रममाण होणारा शिष्य त्यांच्याच अकारण कृपेने त्यांच्या, परमेश्वराच्या चरणी 'त्या'च्याच रूपात, सदानंदरूपात नित्यासाठी एक होतो...

 
- अनीश जोशी