सूर्य माथ्यावर आला होता. दुपारचं उन रणरणत होतं. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे अहमदनगरच्या मुलखातून आपल्या सैन्यासह घोडदौड करत होते. सोबत होते त्यांच्या जिवाभावाचे सहकारी सरदार मल्हारराव होळकर.
सायंकाळ झाली. उन्ह कलू लागली. मराठी सेनेने चौंडी गावाच्या हद्दीत प्रवेश केला. सीना नदीच्या काठावर सैन्याचा तळ पडला. स्वत: पेशवे मल्हाररावांना घेऊन नदीपात्राकडे जात होते. आणि अचानक एका दृश्याने त्यांच लक्ष खिळवून ठेवलं.
पश्चिमेची सूर्यकिरणे नदीपात्रात चमकत होती आणि त्या शांत समयी एक चिमुरडी पोर नदीकाठच्या वाळूचे सुंदर शिवलिंग साकारून, त्यावर फुलांचा अभिषेक करून, हात जोडून ध्यानस्थ बसली होती. आजूबाजूला चाललेल्या कोलाहलामुळे तिची एकाग्रता तीळमात्रही भंगली नव्हती. मावळतीच्या संधीप्रकाशात तिचं सात्विक रूप उजळून निघालं होतं.
बाजीराव पेशवे तिच्याजवळ गेले. त्यांची चाहूल लागताच तिने डोळे उघडले. एवढे दोन बलदंड वीर समोर उभे असतानाही ती किंचितही बावरली नाही. पेशव्यांनी तिची चौकशी केली, तेव्हा कळले की ही मुलगी म्हणजे चौंडी गावचे चौगुले, माणकोजी शिंदे यांची कन्या!
त्या मुलीचे सोज्वळ, पण तेजस्वी रूप पाहून बाजीराव पेशव्यांच्या मनात एक विचार आला आणि मल्हारराव होळकरांकडे वळून ते म्हणाले, "मल्हारराव! मुलगी मोठी गुणी दिसते. घेता का होळकरांची सून करून ?"
मल्हाररावांनाही ही कल्पना एकदम पसंत पडली. मुलीच्या घरी जाऊन त्यांनी तिला सून म्हणून मागणी घातली. होळकरांसारख्या मातब्बर सरदारांच्या घरी आपली लेक जाणार या कल्पनेने माणकोजी शिंद्यांचा आनंद गगनात मावेना!
अशा प्रकारे चौंडी गावची सुशील कन्या अहिल्याबाई होळकरांची सून होऊन इंदोरच्या भव्य राजवाड्यात प्रवेशली. मल्हाररावांचा एकुलता एक पुत्र खंडेराव याच्याशी तिचा विवाह संपन्न झाला.
गौतमीबाई आणि मल्हारराव या सासू सासऱ्यांकडून तिला आईवडिलांसारखे प्रेम मिळाले.
अहिल्याबाईंच्या संसाराला सुरुवात झाली. खंडेराव पराक्रमी होते, पण स्वभावाने तापट. चैनी आणि विलासी होते. त्यांना योग्य मार्गावर कसे आणावे ही मल्हाररावांसमोर मोठीच समस्या होती. अहिल्याबाईंनी हे आव्हान स्वीकारले. त्या प्रामाणिकपणे पतीची सेवा करत होत्या, पण त्याच वेळेस शहाणपणाच्या चार गोष्टी सांगून पतीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्तही करत होत्या. हळुहळू खंडेरावांनाही अहिल्येचे महत्त्व पटू लागले. त्याच्या वर्तनात बदल जाणवू लागला. ते राज्यकारभारात लक्ष घालू लागले.
थोड्याच काळात होळकरांच्या राजवाड्यातून एक आनंदवार्ता चहूकडे पसरली. खंडेराव अहिल्येच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आले. त्याचे नाव ठेवले मालेराव! नातवाच्या आगमनाने मल्हाररावांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तीन वर्षांनंतर जन्माला आलेल्या कन्येचे नाव मुक्ताबाई ठेवण्यात आले.
अहिल्याबाईंचा संसार फुलून आला होता. मल्हारराव व खंडेराव पितापुत्र आपल्या तळपत्या समशेरीनं रणांगण गाजवत होते. होळकरांच्या प्रजाहितदक्ष कारभाराने रयत सुखी होत होती.
सारं काही सुरळीत चालू होतं. पण त्याच वेळी अशुभाच्या काळ्या सावल्या अहिल्याबाईच्या संसाराकडे दबक्या पावलांनी पुढे सरकत होत्या.
मल्हारराव खंडेरावांना घेऊन मोहिमेवर गेले होते. सुरजमल जाटाकडून चौथाई घेण्यासाठी संघर्ष चालू होता. २४ मार्च १७५४ चा दिवस! खंडेराव कुंभेरच्या किल्ल्याला घातलेल्या वेढ्यातून फिरत होते. तोच किल्ल्यावरून एक बंदुकीची गोळी सूं सूं करत आली आणि खंडेरावांच्या वर्मी बसली. खंडेराव जागीच कोसळले. अवघा हलकल्लोळ उसळला. पुत्र निधनाच्या धक्क्याने मल्हारराव हादरले. त्यांच्या आक्रोशाने साऱ्यांची मने गहिवरली. अहिल्याबाईंच्या मस्तकावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्यांनी पतीसह सती जाण्याचा निर्णय घेतला.
आपली सून सती जाणार या कल्पनेने मल्हारराव वेडेपिसे झाले. ते अहिल्याबाईंसमोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, "आता तूच माझा मुलगा हो. पण मला सोडून जाऊ नकोस "
अखेर सासरेबुवांची विनंती मान्य करून अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्णय मागे घेतला.
मात्र आता त्या एका साध्वीचे विरक्त जीवन जगू लागल्या. शुभ्रवस्त्र परिधान करून ईश्वर पूजेत रममाण होऊ लागल्या.
तो काळ मोठा विलक्षण होता. श्रीमंत थोरले बाजीराव आणि त्यांच्यानंतर आलेले श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची स्वप्न फार मोठी होती. साऱ्या भारतवर्षात हिंदवी साम्राज्याचा विस्तार करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. म्हणून तर इंदोरला होळकर, ग्वाल्हेरला शिंदे, धारला पवार, बडोद्याला गायकवाड असे अनेक मराठी सरदार उत्तर भारतात पाय रोवून उभे होते.
मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे मराठी दौलतीचे दोन आधारस्तंभच होते. मल्हारराव तर सदैव घोड्यावर मांड ठोकून समरभूमी गाजवत असत. अशा वेळी त्यांच्या दौलतीचा कारभार कोण पाहाणार? सैन्याला लढण्यासाठी तर धनाची आवश्यकता असते मग शिस्तबद्ध रितीने करवसुली करून सेनेमागे आर्थिक ताकद कोण उभी करणार?
आणि अहिल्याबाई कंबर कसून उभ्या राहिल्या. त्या राज्यकारभारात लक्ष घालू लागल्या. आर्थिक व्यवहारात बेशिस्त, त्या अजिबात खपवून घेत नसत. अत्यंत निग्रहाने कर वसुली करून घेत. मात्र हे सारं करताना रयतेची आईच्या मायेने त्या काळजीही घेत असत.
एखाद्या पर्वत शिखरावर सागराच्या लाटांमागून लाटा आदळाव्यात आणि तरीही ते पर्वत शिखर निश्चल, अविचल ताठ मानेने उभेच राहावे त्याच प्रमाणे संकटांचे अनेक आघात सहन करूनही अहिल्याबाई अत्यंत धीरोदात्तपणे आपला कर्मयोग आचरतच होत्या. त्यांचे पती, सासरे, सासू, मुलगा, जावई, मुलगी, नातू अशा अनेकांच्या निधनाचे हलाहल पचवून त्या इतरांसाठी मात्र अमृतकण शिंपित राहिल्या.
एकदा तर त्यांच्या दरबारात जंगलातून जाणाऱ्या प्रवाशांची लुटमार करणाऱ्या दरोडेखोरांना कैद करून आणले होते. खरं तर त्यांना जबर शिक्षा करणे सहज शक्य होते. पण अहिल्याबाईंनी ते दरोडेखोरी का करतात या प्रश्नावर चिंतन केले आणि त्यांना जंगलातून जाणाऱ्यांकडून सरकारच्या वतीने कर गोळा करण्याचे काम देऊन दरोडेखोरीपासून परावृत्त केले.
अहिल्याबाईंचे सर्वांत मोठे काम म्हणजे हिंदूस्थानच्या कानाकोपऱ्यात त्यांनी उभारलेली पवित्र कार्ये. यवन आक्रमणात हिंदू मंदिरांचा विध्वंस झाला होता. अहिल्याबाईंनी पुढाकार घेऊन हजारो मंदिरे, घाट, जलकुंड, तलाव, बागा, धर्मशाळा, अन्नछत्रे, विहिरी यांचे बांधकाम केले. कोटी कोटी भक्तांचे धन्यवाद मिळवले. गझनीच्या महंमदामुळे सोमनाथाचा आणि औरंगजेबामुळे काशी विश्वेश्वराचा विध्वंस झाला होता. तेथे अहिल्याबाईंनी पुढाकार घेऊन जिर्णोद्धार केला. त्यांच्या या धर्म कृत्यांमुळे आजही संपूर्ण भारतात त्यांना 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी' म्हणून ओळखले जाते.
अशा या राजतपस्विनीला त्यांच्या तिनशेव्या जयंती वर्षानिमित्त सादर प्रणाम.
राजयोगीनी सती अहिल्या
होळकरांची राणी ||
अजून नर्मदा जळी लहरती
तिच्या यशाची गाणी ||
- मोहन शेटे