_202406101506472584_H@@IGHT_350_W@@IDTH_807.png)
क्रिकेटने मला काय शिकवले..
४. The Comeback should be greater than a Setback.
(काळे स्वप्न)
तारीख होती २४ ऑक्टोबर २०२१. भारतीय संघाला आपल्या विश्वचषकाचा श्रीगणेश करायचा होता. समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान टक्कर द्यायला उभा होता. याआधी विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारत कधीच हारला नव्हता. या सामन्याकडूनदेखील भारतीय समर्थकांना हीच आशा होती. पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मॅच सुरू झाली आणि चौथ्या बॉलवरच शाहीन आफ्रिदीने भारतीय फलंदाजी क्रमाच्या एका महत्त्वपूर्ण स्तंभाला म्हणजेच रोहित शर्माला बाद केले. यानंतर अनुक्रमे के एल राहूल आणि सूर्यकुमार यादव हेदेखील बाद झाले. विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्यात संथ गतीने ५० धावांची भागीदारी झाली. यानंतर रिषभ पंत ३९ च्या संख्येवर बाद झाला. विराट एका बाजूने लढत होता पण त्याला साथीदार मिळत नव्हता. १३ धावांची भर घालून जडेजाही परतला. दुसरीकडे कर्णधार विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण ५७ च्या संख्येवर विराटदेखील आउट झाला. भारतीय संघाने २० षटकांमध्ये मध्ये १५१ धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ३ बळी घेतले.
१५१ हा स्कोर T-20च्या दृष्टीने कमी होता तरी अजून कुणीही आशा सोडलेली नव्हती. दुसरी इनिंग्स सुरू झाली. पाकिस्तानचे सगळ्यात महत्त्वाचे दोन खेळाडू फलंदाजीसाठी आले. बाबर आणि रिजवान. दोघांनी नीट सुरुवात केली. पहिल्या ६ ओवर्समध्ये एकही बाद न होता त्यांनी ४३ धावा केल्या. भारताच्या गोलंदाजी विभागात भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बूमराह, वरुण चक्रवर्ती, रवींद्र जडेजा असे नामांकित तारे होते; पण त्या दिवशी बाबर आणि रिजवानपुढे यांच्यातील एकालाही विकेट घेता आली नाही. १३ चेंडू उरलेले असताना पाकिस्तानने मॅच जिंकली. रिजवानने नाबाद ७९ धावा केल्या तर बाबर ६८ धावांवर नाबाद राहिला. भारताने मॅच गमावली. भारताची टॉप ऑर्डर ध्वस्त करणाऱ्या शाहीन आफ्रिदीला Man of the match चा पुरस्कार मिळाला. निश्चितच भारतीय संघासाठी हा लाजिरवाना पराभव होता. संघातील जवळजवळ प्रत्येक खेळाडूला त्यावेळी विरोध सहन करावा लागला. खासकरून कर्णधार विराट कोहलीला. भारतीय संघ आणि समर्थकांसाठी हे एक काळे स्वप्नच होते. या विश्वचषकात भारतीय संघाला सेमीफायनलमध्येदेखील जाता आले नाही. विरोध अजून वाढला. विराटने नंतर आपले कर्णधारपद सोडले; पण पाकिस्तानविरुद्धचा पराभव तो विसरला नाही. त्याला महित होतं की रात्र जितकी अंधारमय असते, त्यानंतची प्रभात तेवढीच प्रखर आणि तेजस्वी असते!
- देवव्रत वाघ
(लेख दोन भागांमध्ये विभाजित केलेला आहे.)