क्रिकेटने मला काय शिकवले..४(२)

17 Jun 2024 16:00:00

 
क्रिकेटनी मला काय शिकवले.. ४

 
क्रिकेटने मला काय शिकवले..
४. The Comeback should be greater than a Setback.
(पलटवार)
 
रात्र अजूनही अंधारमयच होत गेली. याच्या पुढच्याच सामन्यात भारताला New-Zealand विरुद्धपण पराभवाचा सामना करावा लागला. जो भारतीय संघ विजेतेपद मिळवेल असे वाटत होते तो भारतीय संघ उपांत्य फेरीतदेखील पोहचू शकला नाही. भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी सर्व खेळाडूंना बरेवाईट बोलून घेतले. पुढील काही महिन्यात विराटने तिन्ही प्रारूपांमधील कर्णधारपद सोडले. एके काळी शतकंवर शतके मारणाऱ्या किंग विराटच्या दारी शतकांचाच काय तर चांगल्या लयीचादेखील दुष्काळ पडला होता. त्याची टीममधील जागादेखील धोक्यात येईल अश्या बातम्या कानावर येऊ लागल्या.

 

अश्या वेळी २० ओवर्सच्या विश्वचषकात दिनांक २३ ऑक्टोबर २०२२ रोजी म्हणजेच बरोब्बर 364 दिवसांनी भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांसमोर उभे होते. मागच्या वेळी याच पाकिस्तानी संघाने भारतीय संघाचा धुव्वा उडविला होता. पलटवार करणे आवश्यक होते. हा सामना ऑस्ट्रेलियामधल्या मेलबर्नच्या मैदानात होणार होता. हे मैदान मोठे असल्यामुळे इथे सहज षटकार मारता येत नाहीत. सिंगल आणि डबल यांच्यावर खेळ पुढेपुढे न्यावा लागतो. या मैदानावर टॉस जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय केला.

 

मागील सामन्यात ज्या दोन पाकिस्तानी फलंदाजांनी भारतीय समर्थकांना रडकुंडीस आणले होते त्या बाबर आणि रिजवान या दोघांना अर्शदीप सिंगने फक्त १५ च्या स्कोरवर माघारी पाठविले. पण अहमद आणि मसूद यांच्यात नंतर एक चांगली भागेदारी झाली. अक्षर पटेलच्या एक ओवर मध्ये यांनी २१ धावा लुटल्या. त्यानंतर शमीने अहमदला बाद केले. यानंतर हार्दिक पंड्याने ३ विकेट्स घेतल्या. शेवटी मसूद आणि शाहीनने थोडी फटकेबाजी करून पाकिस्तानला १५९ धावांपर्यंत पोहोचविले. मेलबर्नच्या मोठ्या मैदानावर नक्कीच हा एक सन्मानजनक स्कोर होता. आता भारताला मागील वर्षीचे उसने फेडण्यासाठी १६० धावा करायच्या होत्या. पण दिसताना हे लक्ष्य जेवढं सहज दिसत होतं तेवढं सहज नक्कीच नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानकडे सर्वोत्तममध्ये गणला जाणार गोलंदाजी मारा होता.

 

दुसऱ्या इनिंग्सची सुरुवात झाली. राहूल आणि कर्णधार रोहितकडे ही एक सुवर्णसंधी होती. दुर्दैवाने दोघांनाही या संधीचा लाभ घेता आला नाही. दुसऱ्या ओवरमध्ये राहूल नसीमच्या बॉलवर बोल्ड झाला तर रोहित चौथ्या ओवरमध्ये बाद झाला. सूर्यकुमार यादवलाही चमकता आले नाही. पहिल्या ६ ओवर्समध्ये भारताने फक्त ३१ धावा करून ३ बहुमूल्य विकेट्स गमावल्या. यानंतरच्या ओवरमध्ये फलंदाजी क्रमात वर आलेला अक्षर पटेलसुद्धा धावबाद झाला. यानंतर मात्र हार्दिक पंड्यासोबत विराट कोहलीने एक चांगली partnership केली. १० ओवर्सनंतर भारताच्या खात्यात ४५ धावा होत्या. जिंकायला पुढील १० ओवर्समध्ये ११५ धावा हव्या होत्या. पाकिस्तान २०२१ ची पुनरावृत्ती करण्यास आतुर होता; तर विराट आणि हार्दिकला लिहायचा होता एक नवीन इतिहास!

 

हार्दिक आणि विराट यांनी नवाजच्या एका ओवरमध्ये 3 षटकार लगावले. हार्दिकने दोन षटकार मारले होते तरी तो त्याच्या लयीत दिसत नव्हता. सगळ्यांना फक्त आणि फक्त विराटकडूनच आशा होती. विराट त्या दिवशी स्वतःच्या हातांनी भारतीय क्रिकेटचा आणखी एक सुवर्णअध्याय लिहीत होता. शेवटच्या ५ ओवर्समध्ये जिंकायला ६० धावांची गरज होती. आणि यावेळेस पाकिस्तानी गोलंदाजांनी वापसी केली. त्यांनी पुढच्या दोन ओवर्समध्ये केवळ १२ धावा देऊन मॅचला आपल्या पक्षात झुकवले. आता समीकरण ३ ओवर्स आणि ४८ धावा असे राहिले होते. समोर होता मागील सामन्याचा सामनावीर शाहीनशाह आफ्रीदी. विराट निडर होऊन खेळत होता. त्याने शाहीनच्या ओवरमध्ये १७ धावा केल्या. याच ओवरमध्ये विराटने आपले अर्धशतकदेखील पूर्ण केले. आता जिंकायला पुढील २ ओवर्समध्ये ३१ धावांची आवश्यकता होती. त्यादिवशीचा पाकिस्तानचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणजेच हॅरिस रौफ बॉलिंग करायला आला. रौफने आपल्या पहिल्या ४ चेंडूंमध्ये फक्त ३ धावा दिल्या. दबाव पूर्णपणे स्ट्राइकवर असलेल्या विराटवर होता. पुढील ८ चेंडूंमध्ये जिंकायला 28 धावांची आवश्यकता होती. जर या 2 balls मध्ये एकही चौकार किंवा षटकार आला नसता तर पूर्ण मॅच भारताच्या हातातून गेली असती.

 

रौफच्या पुढच्या दोन बॉलवर जे झालं ते अविश्वसनीय होतं, अकल्पनिय होतं! विराटने दोन्ही चेंडूंवर दोन उत्तुंग षटकार लगावले. असे दोन षटकार जे पाहून पूर्ण विश्व स्तब्ध झालं, इतिहासही आश्चर्यात पडला! पाकिस्तानच्या पूर्ण बॉलिंग अटॅक समोर भारताचा एक सिंह दहाडत होता. आता शेवटच्या ओवरमध्ये जिंकायला १६ धावा हव्या होत्या. पहिल्याच बॉलवर मोठा शॉट मारायला गेलेला हार्दिक पंड्या आउट झाला. दिनेश कार्तिकने पुढच्या बॉलवर सिंगल घेऊन स्ट्राइक विराटकडे दिली. तिसऱ्या बॉलवर विराटने पळून दोन धावा घेतल्या. आता पुढील ३ बॉलवर १३ धावांची गरज असताना चौथ्या बॉलवर विराटने अजून एक उत्तुंग षटकार मारला. कंबरेच्या वर असल्यामुळे हा बॉल नो-बॉल घोषित करण्यात आला. आता ३ बॉलमध्ये ६ धावा हव्या होत्या. नवाजने वाइड टाकून ६ ची संख्या ५ वर आणली. पुढील बॉल विराट खेळायला गेला पण बॉल जाऊन स्टंप्सवर धडकला. फ्री-हिट असल्यामुळे त्या बॉलवर 3 धावा पळून घेतल्या. भारतीय संघात आता उत्साहाचे वातावरण होते. कारण 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा हव्या होत्या. आणि यावेळी दिनेश कार्तिक आउट झाला. आता १ बॉल आणि २ धावा असे समीकरण उरले. बॅटिंगसाठी रविचंद्रन आश्विन मैदानात उतरला. नवाजने बॉल टाकला आणि अश्विनने अंदाज घेऊन तो बॉल सोडून दिला. वाइड! आता एक बॉलमध्ये एक रन हवा होता. पुढचा बॉल अश्विनने सहज उचलून मारला. भारत जिंकला!

 

एका खेळाडूने त्यादिवशी स्वतःच्या जोरावर मैदान मारून नेलं होतं. आपल्या सर्व आलोचकांचे रूपांतर त्याने समर्थकांमध्ये करून घेतले. जगानी त्यादिवशी एक सर्वोत्तम Comeback बघितला. खरंय, The Comeback should be greater than a Setback.

 

- देवव्रत वाघ
Powered By Sangraha 9.0