
क्रिकेटने मला काय शिकवले..
५. जिंदगी – लंबी नही, बडी..!
“बाबूमोशाय, जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये” हा आनंद चित्रपटातील संवाद आपल्या सर्वांच्या लक्षात असेलच. आनंदने ‘जिंदगी बडी होनी चाहिये’ हे जे सांगितलंय ते क्रिकेटमध्येसुद्धा लागू होतं. खेळाडूने खेळलेली एखादी इंनिंग भले मोठी नसेलही पण जर ती प्रभावी असेल तर ती छोटी पण प्रभावी इंनिंग सामन्याचा निकाल बदलू शकते. याचेच उदाहरण म्हणजे IPL २०२३ चा अंतिम सामना. चेन्नई विरुद्ध गुजरात..!
या सामन्याची पार्श्वभूमी अशी होती की याच्या आधी चेन्नई आणि गुजरातचे संघ ४ वेळा एकमेकांच्या विरुद्ध खेळले होते. त्यातील ३ सामन्यांमध्ये गुजरातच्या संघांनी बाजी मारली होती. नक्कीच आकड्यांमध्ये गुजरातचा संघ पुढे होता. नाणेफेक झाली आणि चेन्नईच्या कर्णधाराने म्हणजेच महेंद्रसिंग धोनीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यावेळी गुजरातचा उभरता तारा म्हणजेच शुभमन गिल हा सुसाट लयीत होता. त्याने आणि वृद्धिमान साहाने गुजरातला एक जबरदस्त सलामी भागीदारी दिली. धोनीच्या एका अद्भूत stumping मुळे गिल बाद झाला. परंतु धावांचा वेग काही कमी झाला नाही. नंतर आलेल्या साई सुदर्शनने जबरदस्त फटकेबाजी केली. गुजरातचा एकूण स्कोर २० ओवर्समध्ये २१४ पर्यंत जाऊन पोहोचला.
IPL सारख्या मोठ्या लीगच्या अंतिम सामन्यात दबावाखाली २१५ या लक्ष्याचा पाठलाग करणं हे जवळपास असंभव होतं. याआधी तसं कधी घडलंही नव्हतं. चेन्नईची फलंदाजी सुरु झाली. दोन्ही सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि Devon Conway हे पूर्ण स्पर्धेत चांगल्या लयीत होते. डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर ऋतुराजने एक दर्शनीय चौकार मारला. आणि इतक्यात जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना बघण्यासाठी स्वतः इंद्रदेव मैदानावर आले. मैदानात इतका जोरदार पाऊस पडू लागला की पुढे सामना परत सुरु होईल का नाही हीदेखील शंका सर्वांच्या मनात डोकावू लागली. शेवटी रात्री १२च्या सुमारास पाऊस थांबला आणि सामना पुन्हा सुरु झाला. पावसामुळे DLS Method वापरून चेन्नई संघाचे लक्ष्य घटवून १५ ओवर्स मध्ये १७१ धावांचे नवे लक्ष्य त्यांच्यासमोर ठेवण्यात आले.
आता आरामात खेळून चालणार नव्हते. फटकेबाजी करावी लागणार होती. दोन्ही सलामीवीरांच्या डोक्यातसुद्धा हेच होतं. दोघांनी आपल्या खेळाचे स्वरूप आक्रमक केले. पहिल्या ४ ओवर्समध्ये चेन्नईचा स्कोर ५२ होता तो ही एकही बळी जाऊ न देता. गुजरातच्या अनुभवी गोलंदाजांवर चेन्नईचे दोन सलामीवीर भारी पडत होते. अश्या वेळेस १७ वर्षाच्या नूर अहमदने सातव्या षटकात चेन्नईच्या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. ऋतुराजने १६ चेंडूंमध्ये २६ तर Conwayने २५ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यावर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे हे दोघे मैदानावर आले. रहाणे त्याच्या 2.0 version मध्ये होता. त्याने आल्या आल्या लिटीलला दोन उत्तुंग आणि देखणे षटकार मारून चेन्नईवर आलेले दडपण घालविले. गुजरातच्या संघाचा हुकमाचा एक्का म्हणजेच रशीद खानलासुद्धा रहाणेने २ चेंडूंमध्ये २ चौकार मारले.
सामना चेन्नईकडे झुकेल असे वाटत होते तेव्हा समोरून गुजरातचा त्या वेळचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणजेच मोहित शर्मा गोलंदाजीसाठी आला. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात चांगल्या लयीत असणाऱ्या रहाणेला माघारी धाडले. रहाणेने १३ चेंडूंमध्ये बहुमुल्य २७ धावा केल्या. शिवम दुबे त्याच्या लयीत दिसत नव्हता. आता सामना चेन्नईच्या हातातून जाईल असेल वाटत होते कारण जिंकण्यासाठी हव्या होत्या ५० धावा आणि चेंडू उरले होते फक्त २०. स्ट्राईकवर शिवम दुबे खेळत होता आणि समोरून रशीद खान गोलंदाजी करत होता. शिवमने या महत्त्वाच्या वेळी त्याची ताकद वापरून रशिदला दोन उत्तुंग षटकार मारेल.
आता समीकरण १८ चेंडू आणि ३८ धावा असे उरले. गोलंदाजीला होता मोहित शर्मा आणि त्याच्यासमोर होता अंबाती रायडू. रायडू त्याचा IPL मधील शेवटचा सामना खेळत होता. आणि तो खेळलाही तसाच! ज्या दिवशी मोहित शर्माला मारणे सर्वात जड जात होते त्या दिवशी रायडूने मोहित शर्माला अश्या वेळी दोन षटकार आणि एक चौकार मारला. आता जिंकण्यासाठी २२ धावा हव्या होत्या आणि चेंडू उरलेले १५. आता तरी चेन्नई हा सामना नक्की काढेल असे सर्वांना वाटले. पण क्रिकेटदेवाच्या मनात काही वेगळेच होते. पुढच्याच चेंडूवर रायडू बाद झाला. रायडूने सर्वात महत्त्वपूर्ण ८ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या. यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. पण दुर्दैवाने तोही पुढील चेंडूवर बाद झाला. गुजरातने सामन्यात पूर्णपणे वापसी केली होती. पुढची ओवर टाकताना शमीने जास्त धावा खर्च केल्या नाहीत.
चेन्नईला जिंकायला शेवटच्या ओवरमध्ये १३ धावा हव्या होत्या. शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा मैदानावर होते. समोर होता त्या दिवशीचा सर्वोत्तम गोलंदाज मोहित शर्मा. त्याने पहिला बॉल शिवम दुबेच्या पायात टाकला. दुबेला तो नीट खेळता आला नाही त्यामुळे त्या बॉलवर एकही धाव आली नाही. यापुढचे ३ बॉलसुद्धा मोहित शर्माने अचूक टाकले.या तीनही चेंडूंवर केवळ तीनच धावा आल्या. आता हवे होते १० रन आणि बॉल होते फक्त २. समोर होता रवींद्र जडेजा.
जवळजवळ ९० टक्के लोकांना वाटलं की आता हा सामना चेन्नईच्या हातातून गेला आहे. पण जडेजाच्या मनात दृढनिश्चय होता, दबावाला परतवून लावण्याची क्षमता होती. मोहित शर्माने पुन्हा एकदा पायात बॉल टाकायचा प्रयत्न केला. यावेळी मात्र जडेजाने तो बॉल सरळ हवेतून मारला आणि तो बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. बरोब्बर हवा असताना चेन्नईचा स्कोर ६ धावांनी वाढला. आता दबाव गोलंदाजावरपण आला. आता उरला होता १ बॉल आणि हवे होते ४ रन.
मोहित शर्मा बॉल टाकायला धावला; आणि तो बॉल जडेजाच्या पायावर पडला. जडेजाने फाईन लेग वर चौकार मारून चेन्नईला एक अभूतपूर्व विजय मिळवून दिला. जडेजाने सामना जिंकवून दिल्यानंतर मैदानात एक फार दुर्मिळ असे दृश्य दिसले ते म्हणजे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी भावूक झाला होता. त्याने जडेजाची प्रशंसा करत त्याला कडेवर उचलून घेतले.
सामन्यांती शिवम दुबे २१ चेंडूंमध्ये ३३ तर रवींद्र जडेजा ६ चेंडूंमध्ये १५ धावांवर नाबाद राहिले. एवढ्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने हे सिद्ध केले की, “बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिये; लंबी नही..!”
- देवव्रत वाघ