क्रिकेटने मला काय शिकवले..(3)

03 Jun 2024 13:50:00

 
क्रिकेटने मला काय शिकवले?

 
क्रिकेटने मला काय शिकवले..
3. शेवटपर्यंत प्रयत्न करत रहा.

 

गोष्ट आहे २०१६ मधली. T-20 चा विश्वचषक भारतात चालू होता. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियममधे भारतासाठी बांग्लादेश विरुद्ध ‘करो या मरो’ चा मुकाबला होणार होता. जर भारत हा सामना हरला असता तर यजमान विश्वचषकातून बाहेर पडले असते.

 

बांग्लादेशनी पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय केला. भारताने लढत झगडत १४६ धावा केल्या. भारताकडून सर्वाधिक ३० धावा सुरेश रैनाने केल्या. त्या खालोखाल विराट कोहली आणि शिखर धवनने अनुक्रमे २४ आणि २३ धावा केल्या. आधीच T-20 मधे १४७ धावांचे लक्ष्य १० पैकी एखाद्याच वेळेस वाचवता येते. त्यात चिन्नास्वामी स्टेडियम हे भारतातील छोटे स्टेडियम आहे. त्यामुळे हा सामना बांग्लादेशच जिंकणार आणि भारत विश्वचषकाच्या बाहेर जाणार अशी जवळपास खात्री होती.

 

दुसऱ्या इनिंगची सुरुवातही भारताकडून निराशाजनक झाली. पहिल्याच बॉलला बूमराहकडून खराब क्षेत्ररक्षण झाले आणि बांगलादेशचे खाते चौकाराने उघडले. त्यानंतर चौथ्या ओवर मधे बुमराहनेच एक कॅचदेखील सोडला. पुढे २ भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी भारताची वापसी करण्याचा प्रयत्न केला. सामन्याअंती दोघांच्याही खात्यात 2-2 विकेट्स होत्या. यानंतर सामन्यात एक अत्यंत आश्चर्यजनक stumping एम एस धोनीने केली. झालं असं की चांगल्या फॉर्म मधे असलेला शब्बीर रहमान धुमधडाक्यात खेळत होता. रैनाने त्याला एक वाइड बॉल टाकला. त्यावेळी बॅट्समनचा पाय जेमतेम अर्ध्या सेकंदासाठी क्रीजच्या वर उठला आणि नेमक्या त्याच वेळेत धोनीने स्टंप्स उडवून दिले.

 

काहीवेळेस भारतीय गोलंदाज अग्रस्थानी तर काहीवेळेस बांग्लादेशी फलंदाज अग्रस्थानी असे करता करता शेवटच्या ओवर मधे ११ धावा उरल्या. यावेळी गोलंदाजी करत होता संघात नव्याने आलेला हार्दिक पंड्या. समोर खेळत होते बांग्लादेशचे कॅप्टन महमदुल्लाह आणि विकेटकीपर मुशफिकुर रहीम. बांग्लादेशला पहिल्या बॉल वर १ च रन घेत आला. पण पुढच्या बॉलवर रहीमने कव्हर्सला एक चौकार मारला. यानंतर बांग्लादेशला ४ बॉलमधे ६ रन पाहिजे होते. यानंतरच्या बॉलवर रहीमने विकेटकीपरच्या मागे आणखी एक चौकार मारून सामना पूर्णपणे बांग्लादेशच्या हातात आणला.

 

आता 3 बॉलमधे केवळ 2 रन पाहिजे होते. रहीमने तर हा शॉट मारल्या मारल्या सेलिब्रेशनलादेखील सुरुवात केली. पण पुढच्या बॉलवर रहीम जोशात मिडविकेट वर शिखर धवन कडे झेल देऊन आउट झाला. याच्या पुढच्याच बॉलवर कॅप्टन महमदुल्लाहदेखील फूलटॉस बॉल वर त्याच क्षेत्रात रवींद्र जडेजाकडे झेल देऊन आउट झाला. आता 1 बॉल 2 रन असे समीकरण झाले होते. बांगलादेशचे दोन्ही फलंदाज मैदानावर नवीन होते. भारताचा कॅप्टन धोनी हार्दिकला पुढील बॉलसाठी की सजेशन देत होता. बॉल टाकण्याआधीच धोनीने यष्टिरक्षणाचे gloves काढून ठेवले. शेवटचा चेंडू हार्दिकने मुद्दाम फलंदाजाला खेळत येणार नाही असाच टाकला. बॉल सरळ धोनीच्या हातात गेला. दोन्हीही बॅट्समन रन पळू लागले. Non-striker जेवढे अंतर पळून येतो त्याहून जास्त अंतर धोनी त्याच्यापेक्षा कमी वेळात गाठले आणि स्टंप्स उडवून टाकले. भारत एका रनने मॅच जिंकला! हार्दिक पंड्याची शेवटच्या ओवरमधली गोलंदाजी, धोनीचे नेतृत्व आणि पूर्ण संघाचा पराभवाला विजयात परिवर्तीत करण्याचा दृढनिश्चय यावर भारतीय संघाने पराभवाच्या जबड्यात हात घालून हा विजयाचा मणी काढला होता.

 

थोडक्यात शेवटपर्यंत विजयाची आस ठेवा, विजय नक्की मिळेल..!

 

- देवव्रत वाघ
Powered By Sangraha 9.0