
क्रिकेटने मला काय शिकवले..?
६. जोपर्यंत शेवट गोड होत नाही तोपर्यंत तो शेवट नसतो.
नुकताच २९ तारखेला T-20 विश्वचषकाचा अंतिम सामना झाला. भारताने एकावेळी असंभव वाटत असताना विजायला गवसणी घातली. भारताने शेवटचा विश्वचषक २०११ मध्ये जिंकला होता तर T-20 चा विश्वचषक २००७ मध्ये जिंकला होता. २०१३ च्या Champions Trophy नंतर भारतीय संघाने एकही आयसीसीची कप जिंकला नव्हता. अनेक वेळेस भारतीय संघाच्या डोळ्यासामोरून बाकीचे संघ कप घेऊन गेले होते.
२०१४ T-20 विश्वचषकामध्ये भारत अंतिम सामन्यामध्ये पोहोचला होता पण तिथे श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागलेला. विराट कोहलीने या सामन्यात योद्ध्यासारखा ७७ धावा केल्या होत्या पण त्या विजयी बाजूने येऊ शकल्या नाहीत. यानंतर २०१५ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. २०१६ मध्ये T-20 विश्वचषक भारतात झाला होता. तो जिंकण्यासाठी भारतीय संघ अग्रगण्य होता; पण उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारतीय संघासमोर एक विशाल लक्ष्याचा पाठलाग करून भारताचे स्वप्न मोडले होते. २०१७ च्या Champions Trophy मध्ये संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. समोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघ होता. या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला.
२०१९ मधल्या विश्वचषकात भारतीय संघ चांगला खेळ करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. रोहित शर्माने या स्पर्धेत वैयक्तिक ५ शतके झळकाविली होती; पण उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडविरूद्ध अनपेक्षित पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यातील महेंद्रसिंग धोनीचा रनआऊट अजूनही भारतीय समर्थकांच्या मनाला दु:ख देऊन जातो. यानंतर २०२१ च्या T-20 विश्वचषकात भारताला विराट कोहलीच्या कर्णधारपदाखाली ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडावे लागले. यावेळी भारतीय संघाला बऱ्याच आलोचनांचा सामना करावा लागलेला. २०२२ च्या T-20 विश्वचषकात भारत उपांत्य फेरीत तर पोहोचला; पण इंग्लंडविरुद्ध भारताला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. २०२३ चा विश्वचषक भारतात होता. पुन्हा एकदा भारतीय संघ चषकासाठी अग्रगण्य होता. भारतीय संघ खेळलाही तसाच! पण दुर्दैवाने अंतिम फेरीत भारतीय संघाला सलग १० विजयांनंतर पराभवाचा सामना करावा लागला.
अश्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ २०२४ च्या T-20 विश्वचषकात उतरला. जवळपास १७ वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय संघ विजेतेपदासाठी अग्रगण्य नव्हता. तरी कर्णधार रोहित शर्माचा संघावरील विश्वास, सर्व खेळाडूंची जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर भारतीय संघाने T-20 विश्वचषक जिंकला! एकेवेळी साऊथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी ३० चेंडूंमध्ये फक्त ३० धावा हव्या होत्या. सर्व समर्थकांनी आशा सोडून दिल्या होत्या. पण तिथून भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत ७ धावांनी विजय मिळवला. १३ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ रोहित शर्मा आणि त्याच्या टीमनी संपवला.
ज्याप्रमाणे १३ वर्षांनंतर ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पूर्ण झाले त्याचप्रमाणे अशाही बऱ्याच खेळाडूंचे स्वप्न पूर्ण झाले ज्यांना या वर्ल्डकपआधी प्रचंड भलेबुरे ऐकावे लागले होते. बीसीसीआयच्या करारानुसार २०२३ चा वर्ल्डकप हा राहूल द्रविडचा कोच म्हणून शेवटचा वर्ल्डकप होता. पण काही कारणांमुळे त्याचा करार T-20 विश्वचषकापर्यंत वाढविण्यात आला. राहूल द्रविड २००७ मधल्या वन डे विश्वचषकात भारताचा कर्णधार होता. तो वर्ल्डकपदेखील वेस्ट इंडिजमध्येच होता. यात भारतीय संघ अंतिम ८ मध्येही पोहोचू शकला नव्हता. त्यावेळी झालेला विरोध राहूल द्रविडसह सर्वांनीच झेलला होता. आणि आत्ता २०२४ मध्ये राहूल द्रविड भारतीय संघाचा कोच होता. वर्ल्डकप वेस्ट इंडिजमध्येच होता; पण यावेळी एक गोष्ट वेगळी होती ती म्हणजे राहूल द्रविडच्या हातात ट्रॉफी होती, त्याच्या चेहऱ्यावर कधीही न दिसणारं aggression होतं!
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा जो २०२३ च्या वर्ल्डकपमध्येही भारताचा कर्णधार होता, तोही अनेक प्रकारचे विरोध सहन करून इथपर्यंत आला होता. २०२३ च्या वर्ल्डकपची फायनल हरल्यानंतर जेवढे दु:ख संघ हरला म्हणून झाले नव्हते तेवढे दु:ख रोहित शर्माच्या चेहऱ्याकडे बघून होत होते. २०२४ च्या आयपीएलमध्ये तो त्याच्या संघाचा कर्णधारही नव्हता. त्याच्या कर्णधारपदापासून ते त्याच्या संघातील स्थानापर्यंत प्रश्नचिन्ह उठवले जात होते. पण या वर्ल्डकपनंतर रोहित शर्माचे नाव अशा एका यादीत आले आहे ज्यात आत्तापर्यंत फक्त दोन भारतीयांची नावे होती. कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनी! रोहित शर्माची धूमधडाक्यातली फलंदाजी हेही भारताच्या विजयाचे प्रमुख कारण आहे.
भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणजेच हार्दिक पंड्यासाठी मागचे ३ ते ४ महिने जितके अवघड गेले आहेत तेवढे क्वचितच कुणासाठी गेले असतील. आयपीएलमध्ये हार्दिकने त्याची गुजरातची टीम सोडून त्याच्या जुन्या टीममध्ये म्हणजेच मुंबईच्या टीममध्ये प्रवेश केला. तिथे रोहित शर्माला काढून हार्दिक पंड्याला कर्णधार करण्यात आले. यामुळे एकंदर सगळेच चाहक संतापले. हार्दिक जिथे जिथे खेळायला गेला तिथे तिथे त्याच्यावर टीका करण्यात आली. या माणसाचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे हे लक्षात येत होते. जेव्हा भारतीय संघाची निवड झाली आणि हार्दिक उपकर्णधार आहे हे कळले तेव्हा हार्दिकची आलोचना करण्याचे प्रमाण अजून वाढले. पण हार्दिक पंड्याने भारतीय संघाला जिथे जिथे म्हणून गरज होती तिथे तिथे योगदान दिले. अंतिम सामन्यात जेव्हा साऊथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी २४ चेंडूंमध्ये फक्त २६ धावा हव्या होत्या तेव्हा हार्दिकने त्यांच्या सर्वात महत्त्वाच्या फलंदाजाची विकेट घेऊन भारताची सामन्यात वापसी केली.
भारतीय संघाच्या फलंदाजीतील सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजेच विराट कोहलीचा आयपीएल सीजन फलदायी गेला होता. त्याने तिथे सर्वात जास्त धावा केल्या होत्या. पण वर्ल्डकप सुरू झाल्यापासून उपांत्य फेरीपर्यंत कोहलीचे चांगले प्रदर्शन आले नव्हते. विराट T-20 च्या दृष्टीने योग्य खेळाडू नाही अश्या चर्चांना उधाण आले होते. या बाबतीत जेव्हा रोहित शर्माला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, “त्याने (विराटने) त्याची बेस्ट इंनिंग अंतिम सामन्यासाठी वाचवून ठेवली असेल.” आणि झालेही तसेच! जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा विराट मैदानात उभा होता. त्याच्या ७६ धावांमुळेच भारतीय संघाला मोठे लक्ष्य ठेवता आले.
संघाचा विकेट कीपर म्हणजेच ऋषभ पंत ज्या परिस्थितीतून वर्ल्डकप खेळायला आलं तेही उल्लेखनीय आहे. ३० डिसेंबर २०२२ रोजी पंतचा भीषण अपघात झाला. तो जिवंत वाचला हेच आश्चर्य होते. यानंतर त्याने स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला तंदुरुस्त करून घेतले आणि क्रिकेटमध्ये वापसी केली. रिषभ पंतच्या बॅटने ज्या धावा आल्या त्या संघासाठी महत्वपूर्ण ठरल्या.
याचप्रमाणे सूर्यकुमार यादव ज्याला Minnow basher म्हणजेच छोट्या संघांच्या विरुद्ध खेळी करणारा म्हणले जात होते त्याने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला अडचणीतून बाहेर आणले. शिवम दुबे ज्याला टीममधून काढण्याची मागणी वारंवार होत होती त्यांनी विराटच्या साथीला फायनलमध्ये एक महत्त्वपूर्ण खेळी केली. जसप्रीत बूमराह ज्याला त्याच्या दुखपतींवरून चिडवण्यात यायचे त्याने प्रत्येक सामन्यात आपल्या ४ ओवर्स अश्या टाकल्या की समोरच्या संघाला खेळ फक्त १६ ओवर्सचा वाटायचा. बूमराह या वर्ल्डकपचा ‘Man of the Tournament’ झाला. अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांचाही विजयात मोलाचा वाट होता.
अंतिम सामना जिंकल्यानंतर विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी T-20 मधून आपली निवृत्ती जाहीर केली. नियतीच्या न्यायालयात महेंद्रसिंग धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली, युवराज सिंग, गौतम गंभीर अश्या मोठ्या मोठ्या खेळाडूंना त्यांच्या करियरचा शेवट चांगल्या पद्धतीने मिळाला नाही; पण रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना त्यांच्या T-20 करियरचा शेवट स्वप्नवत मिळाला. यांनी भारतीय संघासाठी जे केले आहे ते केवळ अविस्मरणीय आहे. जेव्हा ही बातमी कळली तेव्हा अक्षरश: अंगावर काटे आणि डोळ्यात नकळत अश्रु उभे राहिले. एका डोळ्यातले अश्रु हे दु:खाचे होते कारण हे तिघे आता पुन्हा T-20 खेळताना दिसणार नव्हते; पण दुसऱ्या डोळ्यातले अश्रु हे आनंदाश्रू होते कारण या तिन्ही महान खेळाडूंना जो निरोप मिळाला तो सुखद आणि पूर्णपणे deserving होता.
भारतीय संघासाठी आणि मुख्यतः या तीन खेळाडूंसाठी खालील ओळींनी लेखाची सांगता करतो –
तू ऐकत असता जयघोषाचे नारे,
या कालगतीचे नकोस विसरू वारे,
पटकार अचूक तो चेंडू या काळाचा,
आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा,
निरंत राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला..!
हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला..!
- देवव्रत वाघ