क्रिकेटने मला काय शिकवले..(८)

15 Jul 2024 14:55:58

 
क्रिकेटनी मला काय शिकवले..

 
क्रिकेटने मला काय शिकवले..
. विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल..!

 

विश्वास हा ज्याप्रमाणे आयुष्यात महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे तो क्रिकेटमध्येदेखील फार महत्त्वाचा असतो. कारण क्रिकेटमध्ये परिणामासाठी जेवढा मैदानावरील खेळ प्रभाव टाकतो तेवढाच किंबहुना त्याहून जास्त प्रभाव मैदानाबाहेरील खेळ टाकतो. या मैदानाच्या बाहेरील खेळात फक्त खेळाचा सराव नसून मानसिक आरोग्याची काळजी हीदेखील फार महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढे आपले मानसिक आरोग्य चांगले असते तेवढाच आपला विश्वास हा वाढत जातो.

 

आता या विषयासाठी वैयक्तिक आत्मविश्वासाचे एखादेच उदाहरण घेऊन चालणार नाही. त्यामुळे शक्य तेवढी जास्त उदाहरणे द्यायचा मी प्रयत्न करेल. पहिले उदाहरण आहे भारतीय संघाचा पूर्व कसोटी कप्तान अजिंक्य रहाणेचे. रहाणे एकेकाळी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कणा होता पण त्याला २० ओवर्सच्या क्रिकेटमध्ये म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. रहाणे IPL मध्ये बराच काळ राजस्थान संघाचा कर्णधार होता; पण त्याचा वैयक्तिक खेळ हा आधुनिक युगाच्या विरुद्ध होता. त्यामुळे राजस्थान संघाने त्याला सोडल्यानंतर त्याला म्हणावी तशी संधी कुठे मिळाली नाही. याच दरम्यान त्याचे कसोटी क्रिकेटमधील उपकर्णधाराचे पदही गेले आणि त्याची टीममधील जागाही धोक्यात आली.

 

अश्यावेळी २०२३ IPL च्या लिलावामध्ये चेन्नईच्या संघाने रहाणेला आपल्या संघात घेतले. त्यानंतर बऱ्याच विश्लेषकांनी या निर्णयाची आलोचना केली. सध्याचे क्रिकेट हे रहाणेच्या शैलीच्या विरुद्ध आहे असे सर्वांचे म्हणणे होते. यावेळी चेन्नईच्या संघाने आणि अजिंक्य रहाणेने स्वतःवर विश्वास ठेवला. ज्यावेळी रहाणे चेन्नईकडून त्याचा पहिला सामना खेळला त्यावेळी त्यांनी त्याच्या क्रिकेटच्या शैलीमध्ये आक्रमक २७ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या. त्याच्या सर्व आलोचाकांना हे एक उत्तर होते. पण फक्त एका खेळीने चालणार नव्हते. अजिंक्याने यानंतर कोलकत्तामध्ये अजून एक आक्रमक २९ चेंडूंमध्ये ७१ धावांची खेळी केली. रहाणेचा 2.0 सर्वांना नवीन तर होताच पण तो हवाहवा वाटायचा. २०२३ IPL च्या अंतिम सामन्यात एका विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना रहाणेने खेळलेल्या १३ चेंडूंमध्ये २७ धावांच्या खेळीने चेन्नईच्या विजयात एक मोलाची भूमिका बजावली. रहाणेने केलेल्या या अविस्मरणीय आणि अविश्वसनीय पुनरागमनामुळे या उदाहरणांमध्ये तो अग्रणी आहे.

 

अजिंक्य रहाणेसोबत चेन्नईच्याच संघात आणखी खेळाडू स्वतःवर विश्वास ठेवून त्याचे क्रिकेटच्या जगात पुनरागमन करत होता. त्याचे नाव शिवम दुबे. शिवम याआधी बेंगलुरू आणि राजस्थानच्या संघात होता. त्याचसोबत काही काळ तो भारतीय संघाकडूनही खेळला होता. बेंगलुरू आणि राजस्थानच्या संघांमध्ये त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. चेन्नईने त्याला २०२२ मध्ये संघात सामील करून घेतले. त्या सीझन मध्ये चेन्नईचा संघ अंतिम ४ मध्ये पोहचू शकला नव्हता. एका नकारात्मक सीझनमध्ये शिवम दुबे ही एक सकारात्मक बाब संघाला मिळाली होती.

 

यानंतर २०२३ च्या मोसमात संघाला जेतेपदाकडे नेण्यात शिवम दुबेचा मोठा हात होता. त्याच्या इतक्या ताकदीने फिरकी गोलंदाजांना त्या मोसमात कुणीच मारू शकले नव्हते. एके काळी प्रदर्शन खराब असल्यामुळे शिवम दुबेला भारतीय संघातून बाहेर काढण्यात आले होते. पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवून, मेहनत घेऊन पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले.

 

यानंतरचे उदाहरण हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आहे. खेळाडूचे नाव आहे के एल राहुल. राहुल हा अश्या ५ भारतीय खेळाडूंपैकी आहे ज्यांनी कसोटी, ५० ओवर्स आणि २० ओवर्सच्या सामन्यांत शतक झळकावले आहेत. पण त्याच्या आयुष्यात साधारण २०२२ पासून IPL २०२३ पर्यंतचा काळ हा वाईट होता. त्याला त्याच्या फलंदाजीतील संथगतीमुळे ट्रोल केले जात होते. त्यात तो २०२३ च्या IPL दुखापतग्रस्त झाला. त्याला ट्रोल करणे अजून वाढले.

 

दुखापतीतून सावरल्यानंतर त्याचे नाव Asia Cup च्या संघात विकेटकीपर म्हणून आले. काहींच्या म्हणण्यानुसार त्याची निवड व्हायला नको होती तर काहींच्या म्हणण्यानुसार त्याला विकेटकीपर म्हणून घ्यायला नको होते. अर्थातच राहुलचे लक्ष्य या टीकाकारांवर नसून त्याच्या खेळावर होते. त्याने या सगळ्यांच्या टीकेला स्वतःच्या प्रदर्शनाने द्यायचे ठरवले. Asia Cup मध्ये त्याने चांगले प्रदर्शन केले. पण तरीही त्याने विश्वचषकात perform केल्याशिवाय त्याच्यावरील टीका थांबणार नाही हे त्याला माहित होते.

 

विश्वचषक २०२३! भारताचा पहिलाच सामना होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध. भारताने ऑस्ट्रेलियाला कमी धावांमध्ये रोखले होते; पण भारताच्या इंनिंगची सुरुवात अनपेक्षित झाली. फक्त २ धावा फलकावर असताना कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या तीन बहुमूल्य विकेट्स भारताने गमावल्या. दबाव पूर्णपणे भारतीय संघावर आला. त्यावेळी विराट कोहली आणि के एल राहुल हे दोघे खेळत होते. आणि या दोघांनी इतका दबाव असताना सहज हा सामना भारताला जिंकवून दिला. राहुलने या सामन्यात नाबाद ९५ धावा केल्या. राहुलवर टीका करणे हे खऱ्या अर्थात इथून बंद झाले. यानंतरही त्याने जिथे भारताला गरज होती तिथे चांगले प्रदर्शन करून दाखवले.

 
‘There is nothing as sweet as Comeback.’ हे वाक्य या तिघांनी खरे करून दाखवले आहे. स्वतःवर, सहकाऱ्यांवर, संघावर आणि मुख्य म्हणजे प्रकियेवर विश्वास ठेवणे हे फार महत्त्वाचे असते हे आपल्या या तिघांच्या आयुष्यातून कळून येते. या लेखात आपण काही वैयक्तिक आत्मविश्वासाची उदाहरणे पहिली. पण विश्वास हा असा विषय आहे की तो एका लेखात मावणार नाही. त्यामुळे पुढील लेखात आपण काही सांघिक आत्मविश्वासाची उदाहरणे पाहूया..!

 

- देवव्रत वाघ
Powered By Sangraha 9.0