क्रिकेटने मला काय शिकवले..(९)

23 Jul 2024 17:47:00

 

 

क्रिकेटने मला काय शिकवले..
 
 
क्रिकेटने मला काय शिकवले..
९. आत्मविश्वासाने जगाची मानसिकता बदलता येते.

 

क्रिकेटच्या दुनियेत पहिल्यापासूनच काही संघांना एकदम मजबूत तर काही संघांना एकदमच कमकुवत समजले जाते. ICC च्या किंवा अन्य ठिकाणच्या मुख्य स्पर्धांमध्ये अनेक संघ जरी खेळत असले तरी मुख्यतः स्पर्धा जिंकण्यासाठी ३-४ संघांमध्येच शर्यत असते असे मानले जाते. अर्थात हे पूर्णतः चुकीचे नाही पण यामुळे अन्य संघांच्या मानसिकतेवर परिणाम होत असेल का हा विचार मी नेहमी करत असतो. आज मी अशी काही उदाहरणे देणार आहे ज्यांमध्ये संघांना स्पर्धा जिंकण्याच्या शर्यतीत धरले नव्हते पण त्यांनी त्या स्पर्धेत करिष्मा करून दाखवला.

 

आयपीएल २०२२ च्या आधी २ नवे संघ वाढवायचे ठरले. यानुसार गुजरात आणि लखनौ हे दोन नवे संघ आयपीएलमध्ये आले. या दोन्ही संघांना लीलावाआधी काही खेळाडूंना संघात सामावण्याची संधी दिली होती. गोष्ट आहे गुजरातच्या संघाची. संघांनी हार्दिक पंड्या, रशीद खान आणि शुभमन गिल या तिघांना आपल्या संघात सामावून घेतले. आणि हार्दिक पंड्याला कर्णधार केले. इथे सर्व टीकाकरांनी आपापली तोंडे उघडली. ज्या खेळाडूला कर्णधारपदाचा काही अनुभव नाही अश्या खेळाडूला एकदम कर्णधार करणे हे त्यावेळी कुणालाच पटले नव्हते. लिलावात गुजरातच्या संघाने कोणत्याही एकदम मोठ्या नावाला संघात घेतले नाही त्यामुळे दिसताना गुजरातचा संघ अगदी कमकुवत दिसत होता. गुजरातच्या संघात वरील तीन नावांव्यतिरिक्त रिद्धीमान साहा, मोहम्मद शमी, विजय शंकर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, साई सुदर्शन, साई किशोर, यश दयाल हे खेळाडू होते. जवळपास सगळ्या विश्लेषकांनी गुजरातचा संघ अंतिम चारमध्ये जाणार नाही असे भाकीत केले होते.

 

पण इथूनच गुजरातच्या संघांनी स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची तयारी सुरु केली. प्रत्येक खेळाडूला त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार रोल देणे ही क्रिकेट या सांघिक खेळासाठी फार महत्त्वाची गोष्ट असते. गुजरातच्या संघांनी हे व्यवस्थित रित्या पाळले. २०२२ मधला प्रत्येक ताराजुवरील सामना गुजरातच्या संघांनी आपल्या बाजूला खेचला. प्रत्येक सामन्यात गुजरातला जिंकवण्यासाठी एक नवा सामनावीर येत असे. अश्या पद्धतीने पुढे जात जात गुजरातने २०२२ ची आयपीएल जिंकली! एवढेच नव्हे तर आयपीएल २०२३ मध्ये सुद्धा त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली. गुजरातच्या संघांनी सर्वांना चूक ठरवत स्पर्धेत केलेले आगमन अविस्मरणीय आहे.

 

दुसरे उदाहरण आहे नुकत्याच झालेल्या T-20 विश्वचषकातले. या स्पर्धेत एकूण २० संघांनी भाग घेतला होता ज्यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, साउथ आफ्रिका हे संघ प्रमुख दावेदार होते. यांमध्ये एक संघ असा होता जो चषक तर जिंकू शकला नाही पण स्पर्धेअंती या संघाने सर्वांच्या मनात आपली एक छाप सोडली. हा किस्सा आहे अफगानिस्तान संघाचा. मागील काही वर्षांपासून हा संघ सातत्याने प्रदर्शन करत आलेला आहे पण त्याला म्हणावा तसा आदर अजून मिळालेला नव्हता.

 

अफगाणिस्तान संघाने त्याच्या विश्वचषकाची सुरुवात धडाक्यात केली. पहिल्याच लढतीत त्यांनी युगांडाला तब्बल १२५ धावांनी हरवले. यानंतरच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडच्या संघाला धोबीपछाड देत ८४ धावांनी विजय मिळवला. ज्या ग्रुपमधून न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज हे दोन संघ पुढे जाईल असे वाटत होते त्या ग्रुपमधून अफगाणिस्तानचा संघ अंतिम ८ मध्ये पोहोचला. पण त्यांची घौडदौड इथपर्यंतच थांबली नाही. अंतिम ८ मध्ये ४-४ संघांचे दोन ग्रुप केले होते आणि एका ग्रुपमधून २ संघ पुढे जातील अशी व्यवस्था होती. ज्या ग्रुपमध्ये अफगाणिस्तानचा संघ होता त्या ग्रुपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश होते. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ पुढे जातील हे जवळपास निश्चितच मानले जात होते. पण अफगाणिस्तान संघाने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश या दोन्ही संघांना हरवत इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत धडक मारली. नक्कीच उपांत्य फेरीत त्यांना लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला पण त्याचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी राहील.

 

आता आपण इतिहासात थेट ४१ वर्षे मागे म्हणजे १९८३ मध्ये जाऊया. १९८३ हे साल ऐकल्यावर क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांसमोर एकच चित्र येते ते म्हणजे लॉर्डस् च्या मैदानावर कपिल देव विश्वचषक उंचावतानाचे! पण हा विश्वचषक सुरु व्हायच्या मागील दोन स्पर्धांमध्ये मिळून भारताने फक्त एक सामना जिंकला होता. या स्पर्धेतसुद्धा भारतीय संघाकडून कुणालाच अपेक्षा नव्हती. भारताचा पहिलाच सामना होता मागील दोन्ही चषक जिंकलेल्या बलाढ्य वेस्ट इंडीजशी. या सामन्यात सर्व अनुमाने खोटी ठरवत भारताने वेस्ट इंडीजला हरवले. यशपाल शर्माची ८९ धावांची खेळी भारताला उपयोगी ठरली. यानंतर झिम्बाब्वेला हरवून भारताने अजेयता कायम ठेवली.

 

पण नंतर सलग ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. यापुढील झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारतासाठी महत्त्वाचा होता. भारताच्या फलंदाजीस सुरुवात झाली आणि एखाद्या वाईट स्वप्नासारखे सर्वकाही घडू लागले. भारताने केवळ १७ धावांवर ५ बळी गमावले. सर्वांनी आशा सोडून दिल्या होत्या. १०० धावांपर्यंत पोहोचणेसुद्धा अशक्य दिसत होते. अश्या वेळी कर्णधार कपिल देव मैदानावर उभा होता. त्याने पहिल्यांदा खेळ सांभाळला आणि त्यानंतर धावांची गती सांभाळली. कपिल देवने त्या सामन्यात ऐतिहासिक १७५ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारताने आपला विजयरथ पुन्हा रुळावर आणला. यानंतर ऑस्ट्रेलियाला हरवून भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात भारतीय संघाने यजमान इंग्लंडला धूळ चारली. आता अंतिम सामन्यात टक्कर होती गतविजेत्या वेस्ट इंडीजशी. पहिल्यांदा फलंदाजी करताना १८३ धावांवर भारत ऑल आउट झाला. निश्चितच धावा जास्त नव्हत्या पण भारतीय संघाकडे जिद्द होती, स्वतःवर विश्वास होता. संघाने प्रखर गोलंदाजीचा मारा करत वेस्ट इंडीजला १४० धावांवर ऑल आउट केले. सर्वांच्या धरणांना चुकीचे ठरवत भारताने विश्वचषक जिंकला.

 

या विषयात आणखी अनेक उदाहरणे येऊ शकतात पण जे या तीन संघांनी ज्या पूर्व परिस्थितीतून करून दाखवले आहे ते उल्लेखनीय आहे असे मला वाटते. शेवटी जग तुमच्या विरोधात असताना स्वतःला सिद्ध करून जगाची मानसिकता बदलण्याची मजा वेगळीच असेल ना?

 

- देवव्रत वाघ
Powered By Sangraha 9.0