क्रिकेट आणि पाऊस..

29 Jul 2024 17:20:12


क्रिकेट आणि पाऊस..

 

क्रिकेट आणि पाऊस या तशा भिन्न गोष्टी आहेत. पण एकंदर सध्याचे वातावरण बघता या दोन गोष्टींचा मिलाप का होऊ नये असा एक विचार माझ्या मनात आला. क्रिकेटचा खेळ सुरु असताना जर पावसाचा व्यत्यय आला तर खेळाची लय भंग होऊन प्रेक्षकांच्या मनात प्रलय निर्माण होतो. एकंदरच क्रिकेटचे चाहते आणि पाऊस यांचा छत्तीसचा आकडा आहे असे म्हणायला हरकत नाही. पावसामुळे खेळ काही कालावधीसाठी स्थगित होतो. जसा वेळ वाढत जातो तसा खेळाचा वेळ कमी होत जातो. पावसासाठी क्रिकेटमध्ये DLS पद्धती वापरली जाते. खेळाचा वेळ कमी झाला तर ओवर्स आणि लक्ष्य किती कमी करायचे हे ही पद्धत वापरून ठरवले जाते. असो! या झाल्या पुस्तकातल्या गोष्टी. या लेखात मी अश्या काही अश्या सामन्यांचा उल्लेख करणार आहे, जे सामने म्हणून सर्वांच्या लक्ष्यात आहेतच पण त्या सामन्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती.

 

असं म्हणता म्हणता पहिला सामना मला आठवतो तो म्हणजे २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातला पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड. हा सामना बेंगलुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालं होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडनी ४०१ धावांचे विशाल लक्ष्य पाकिस्तानच्या पुढे ठेवले. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानला कोणतातरी चमत्कारच हवा होता. पुढे जायच्या आधी मी तुम्हाला या सामन्याचा निकाल सांगतो. या सामन्यांती पाकिस्तान २१ धावांनी विजयी ठरला. खरं तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ हा नेहमी बळी राखून जिंकतो पण या सामन्यात मात्र पाकिस्तान संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करत असूनही धावांनी जिंकला. ही पावसाचीच कृपा..!

 

झालं असं की पाकिस्तानने धुव्वाधार फलंदाजीस सुरुवात केली. त्यांचा सलामी फलंदाज फक़र झमान त्याच्या आक्रमक लयीत खेळत होता. आणि कर्णधार बाबर आझम टिकून त्याला साथ देत होता. २५.३ ओवर्स मध्ये पाकिस्तानने फक्त एक बळी गमावून २०० धावा केल्या होत्या ज्यात झमानच्या ११ षटकारांसोबत १२६ धावा होत्या. यावेळेस पावसाने वेग धरला. DLS नुसार पाकिस्तानचा संघ २१ धावांनी पुढे होता. नंतर पावसाने इतका जोर धरला की सामना परत सुरु करताच आला नाही. यामुळे पाकिस्तानच्या संघाला विजयी घोषित करण्यात आले.

 

पाऊस आणि क्रिकेट या दोन गोष्टी जोडायच्या म्हणल्या की एक सामना मला आवर्जून आठवतो तो म्हणजे चेन्नई विरुद्ध गुजरात, आयपीएल फायनल २०२३. या सामन्यात गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करून २१४ धावा फलकावर लावल्या. चेन्नईची फलंदाजी सुरु होऊन फक्त ३ बॉल झाले असताना पाऊस मैदानात आला. खेळ बराच वेळ थांबला होता. साधारण २ तासांनंतर खेळ पुन्हा सुरु करण्यात आला. २० ओवर्स मध्ये चेन्नईला २१५ धावा करायच्या होत्या त्याऐवजी खेळ १५ ओवर्सचा करून १७१ धावांचे नवे लक्ष्य चेन्नई संघासमोर ठेवण्यात आले. ऋतुराज गायकवाड, Devon Conway, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायडू आणि रवींद्र जडेजा यांच्या मदतीते चेन्नई या लक्ष्याचा यशस्वी पद्धतीने पाठलाग केला.

 

पावसाने काहींचे खेळ अगदी मोडलेले आहेत. १९९२ साली साउथ आफ्रिकेसोबत असं काही झालं की ‘This is death of the Cricket’ हे वाक्य सर्वांच्या तोंडी आलं. क्रिकेटमधील सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे एकदिवसीय विश्वचषक खेळला जात होता ज्यात साउथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंडची उपांत्य फेरी सुरु होती. साउथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी १३ चेंडूंमध्ये २२ धावा हव्या होत्या. यावेळी मैदानावर पाऊस पडायला सुरुवात झाली. खेळ थांबला. त्यावेळी broadcaster कडे एक डेडलाईन होती ज्याच्या आत हा खेळ संपणे अपेक्षित होते. शेवटी जेव्हा पाऊस थांबला तेव्हा ती वेळ अगदी जवळ आलेली होती. नुकसान होऊ नये म्हणून क्रिकेटमधल्या सर्वात मोठ्या स्पर्धेत म्हणजेच एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जिथे १३ चेंडूंमध्ये २२ धावा हव्या होत्या तिथे फक्त चेंडूंची संख्या कमी करून ती एकवर आणण्यात आली. १ चेंडू आणि २२ धावा असे समीकरण उरले! दोन्ही संघ या निर्णयावर नाराज होते; पण नियामांसमोर कुणालाच बोलता आले नाही. तो एक चेंडू टाकून खेळ वेळेच्या २ मिनिटे आधी संपवण्यात आला. क्रिकेटच्या इतिहासात या दिवसाची नोंद एक काळा दिवस म्हणून करण्यात आली.

 

पाऊस आणि क्रिकेटचे नाते हे असेच आहे. कधी पाऊस पडल्याने तुमच्या संघाला फायदा होतो तर कधी नुकसान! अर्थात यात क्रिकेटची चूक नाही आणि पावसाचीही नाही. शेवटी पाऊस काय आणि क्रिकेट काय, आपल्याला क्रिकेटमध्ये धावांचा आणि विकेट्सचा पाऊस आणि पावसात निसर्गाचे क्रिकेट अनुभवण्याची मजाच वेगळी आहे.

 

- देवव्रत वाघ




Powered By Sangraha 9.0