क्रिकेटने मला काय शिकवले..(७)

08 Jul 2024 14:34:20


क्रिकेटने मला काय शिकवले.. ७. Doesn’t matter how you start, Finish like Dhoni..

 
 क्रिकेटने मला काय शिकवले..
७. Doesn’t matter how you start, Finish like Dhoni..

 

७ जुलै म्हणजेच महेंद्रसिंह धोनीचा जन्मदिवस. धोनी या नावाशी माझ्या संबंध आला तो २०१६ मध्ये! जेव्हा भारत विरुद्ध बांग्लादेश T-20 विश्वाचाशाकातील सामना या नावानी स्टंप्सच्या मागून पलटवला होता. माझ्या कळत्या वयात मी बघितलेला हा दुसराच सामना! या सामन्यानंतर धोनीशी आतूनच एक कनेक्शन निर्माण झालं. आयपीएलमधील त्यावेळचा पुण्याचा संघ असो वा चेन्नईचा. धोनी त्या संघात असल्यावर मी पण त्याच संघाला सपोर्ट करायचो (अजूनही करतोच). नंतर जसजसे क्रिकेटबद्दल अधिक कळायला लागले तेव्हा हा खेळ फक्त बॅट, बॉल, स्टंप्सचाच नसून डोक्याचाही आहे हे लक्षात आले. क्रिकेटमध्ये धोनीपेक्षा डोक्याचा चांगला वापर करणारा खेळाडू मी अजून तरी बघितलेला नाही. मग तो वापर यष्टिरक्षणाच्या वेळी असो किंवा नेतृत्व करताना असो वा फलंदाजी करताना.

 

धोनीने त्याच्या एकट्याच्या जोरावर कित्तीतरी सामने संघाला जिंकवून दिले आहेत. असे म्हणता म्हणता माझ्या डोळ्यासमोर तीन सामने तर सहज उभे राहतात. पहिला म्हणजे भारत विरुद्ध श्रीलंका, २०११ विश्वचषक, अंतिम सामना. या सामन्यात त्याने केलेल्या ९१ धावांमुळे त्याला Man of the match सुद्धा मिळाला होता. दूसरा सामना म्हणजे चेन्नई विरुद्ध बेंगलोर, २०१८. या सामन्यात विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने सुरुवातीलाच काही फलंदाज गमावल्यामुळे प्रेशर चेन्नईवर होते. अशा वेळी धोनीने येऊन फक्त 34 चेंडू खेळून 70 धावा मारल्या. धोनीने स्वतःच्या जोरावर हा संपूर्ण सामना पलटवला होता. आणि तिसरा सामना म्हणजे चेन्नई विरुद्ध मुंबई, २०२२. यावेळी धोनीच्या स्वतःच्या पुढील करकीर्दीबाबत प्रश्नचिन्ह उमटवले जात होते. या सामन्यात चेन्नईला शेवटच्या ४ चेंडूंमध्ये १६ धावा हव्या होत्या. आणि धोनीने अनुक्रमे पुढील चेंडूंवर ६, ४, २ आणि ४ धावा मारून हा सामना जिंकवला.

 

पण धोनी फक्त हारलेले सामने जिंकवतो म्हणून तो माझा आदर्श नाहीये तर त्याच्यामधल्या इतर अनेक चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण सर्वच त्याच्याकडून घेऊ शकतो. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे Calmness. मी वर ज्या सामन्यांचा उल्लेख केला त्या सर्व सामन्यांमध्ये त्याने कधीच स्वतःवर प्रेशर येऊ दिले नाही. स्वतः Cool राहून समोरच्यांना प्रेशरमध्ये टाकण्याची कला धोनीला पूर्णपणे अवगत आहे. मॅच जिंकूदे किंवा हरू दे त्याच्या चेहऱ्यावरील भाव सारखेच असतात. यावर तो म्हणतो की, I have three dogs at home. Even after losing a series or winning a series, they treat me the same way.

 

धोनीकडून शिकण्यासारखी दुसरी गोष्ट म्हणजे विजयात कॅप्टन असूनही स्वतः पुढेपुढे न करता आपल्या सहकाऱ्यांना पुढे करणे आणि हरल्यावर मात्र पराभवाची जबाबदारी स्वतः घेणे. जेव्हा धोनीचा संघ चेन्नई जेव्हा 2021 मध्ये आयपीएल जिंकली होती तेव्हा ट्रॉफीला नाममात्र हात लावून ती ट्रॉफी संघाच्या युवा खेळाडूकडे दिली होती. अगदी अलीकडे 2023 मध्ये चेन्नई आयपीएल जिंकली तेव्हा आपल्या आयपीएल कारकिर्दीची शेवटची मॅच खेळणाऱ्या अंबाती रायडूला आणि ती मॅच जिंकवणाऱ्या रवींद्र जडेजाला धोनीने ट्रॉफी घ्यायला बोलावले होते. स्वतः प्रकाशझोतात न राहता इतरांना प्रकाशझोतात आणणे हे संघाचा कर्णधार म्हणून करणे बऱ्याच जणांना जमले नाहीये.

 

तश्या धोनीकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत पण या लेखात आवर्जून मी एक गोष्ट ठेवतोय ती म्हणजे तुमची सुरुवात कशीही असू दे पण शेवट हा धोनीसारख असला पाहिजे. 2007 साली भारतीय संघाला एकदिवसीय विश्वचषकामध्ये बांग्लादेश आणि श्रीलंकेकडून पराभवाचा सामाना करावा लागला होता. भारतीय संघ group stage मधूनच बाहेर पडला. यानंतर भारतीय खेळाडूंची फार आलोचना झाली होती. धोनीच्या घरासमोर त्याचे पुतळे बनवून जाळण्यात आले होते. त्याच वर्षी T-20 चादेखील विश्वचषक होणार होता. धोनी त्या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा कर्णधार होता. भारताचा संपूर्ण संघ युवा होता. या संघाला सोबत घेऊन धोनीच्या कर्णधारपदाखाली भारतानी पहिला T-20 विश्वचषक जिंकला. भारतातील धोनी नावाचे सुवर्णपर्व हे तेव्हाच खऱ्या अर्थाने सुरू झाले.

 

2020 साल हे ज्याप्रमाणे जगाला अवघड गेले त्याचप्रमाणे धोनीच्या चेन्नई संघालादेखील गेले. यावेळी पहिल्यांदाच चेन्नईचा संघ अंतिम ४ मध्ये पोहोचण्यासाठी अपात्र ठरला. निश्चितच तो काळ धोनीसाठी, चेन्नईसाठी व चेन्नईच्या समर्थकांसाठी अवघड होता. पण चेन्नईच्या शेवटच्या सामन्यात ज्यावेळी हा तुझा अंतिम सामना आहे का या प्रश्नावर धोनीचे definitely not असे उत्तर आले तेव्हा सर्वांच्या मनात उत्साह प्रकट झाला कारण सर्वांना हा विश्वास होता की आपला ‘थाला’ निश्चित पुढील वेळी काही विशेष करेल; आणि असेच झाले. २०२१ च्या आयपीएलमध्ये चेन्नई संघ विजयी ठरला. जसे २०२० मध्ये झाले तसेच २०२२ मध्येदेखील झाले. चेन्नईचा संघ Qualify करू शकला नाही. पण धोनीने जे २०२१ मध्ये करून दाखवले होते तेच तो २०२३ मध्ये करण्यासाठी सज्ज होता. २०२३ च्या आयपीएलमध्ये ज्या मैदानावर चेन्नईचा संघ खेळायला गेला, ते पूर्ण मैदान पिवळ्या रंगाने भरलेले असायचे. मग ते मुंबईचे वानखेडे असो किंवा कोलकाताचे ईडन गार्डन. २०२३ ची आयपीएल जणू पूर्णपणे धोनीला आणि त्याच्या कर्तृत्त्वाला समर्पित केली होती. २०२३ ची आयपीएलदेखील चेन्नई संघाने जिंकली.

 

अर्थात मी हे जे काही धोनीबद्दल लिहिले आहे ते एक दशांश सुद्धा नाही. Ticket collector पासून trophy collector हा त्याचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायक आहे. महेंद्रसिंह धोनीला माझ्याकडून भरभरून जन्मदिवासच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या खोलीत लिहिलेल्या वाक्याने शेवट करतो –
Doesn’t matter how you start, Finish like Dhoni..

 

- देवव्रत वाघ
Powered By Sangraha 9.0