निसर्ग म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली सजीव–निर्जीव जगाची अद्भुत देणगी. माणूस, प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती या सर्वांची जीवन जगण्याची परिसंस्था. श्वासोच्छ्वास, अन्न, पाणी, आश्रय या गरजा निसर्गामुळेच पूर्ण होतात. निसर्ग हा माणसाचा पहिला गुरू आहे. त्यातूनच माणसाने जगणे, काम करणे आणि जग समजणे शिकले. झाडे आपल्याला शुद्ध हवा आणि फळे देतात. नद्या पाणी देतात. सूर्य आपल्याला प्रकाश आणि उष्णता देतो, तर चंद्र-तारे आपल्या रात्रीला शोभा आणतात. पक्ष्यांची किलबिल, फुलांचा सुगंध, हिरवळ या सगळ्यामुळे मन प्रसन्न होते. निसर्ग आपल्याला संतुलित जीवन जगण्याची शिकवण देतो. दिवस-रात्र, पाऊस-उन्हाळा, थंडी-उष्णता हे सगळं चक्र निसर्ग ठरवतो. आपण फक्त त्यात राहून त्याचा लाभ घेतो.
आजच्या आधुनिक युगात माणसाने निसर्गाचा जास्त वापर करून त्याची हानी केली आहे. जंगलतोड, प्रदूषण, पाण्याचा अपव्यय, प्लास्टिकचा वापर यामुळे निसर्ग रागावला आहे. हवामान बदल, दुष्काळ, पूर, चक्रीवादळं, प्रदूषित हवा ही त्याची उदाहरणे आहेत. जर आपण निसर्गाचा अपमान करत राहिलो, तर आपले अस्तित्व धोक्यात येईल. निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्रदूषण कमी करणे, पर्यावरणपूरक वस्तू वापरणे, प्राण्यांवर प्रेम करणे ही छोटी पावले घेतली तरी मोठा बदल घडू शकतो. निसर्ग आहे, म्हणून आपण आहोत हे लक्षात ठेवून त्याच्याशी नाते जपले पाहिजे.
गुरुप्रसाद सुरवसे