महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला असणारा अरबी समुद्र आणि पूर्वेकडचा सह्याद्री पर्वत ह्या दोघांच्या मध्ये असणारा भाग हा कोंकण म्हणून ओळखला जातो. हीच महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टी हि निसर्गसंपन्न आणि सांस्कृतिक आणि खाद्यासंस्कृतीने संपन्न अशी आहे. एकूण ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या भागात असणारे नितळ समुद्र किनारे, जंगलं, मंदिरे आणि इतर अनेक गोष्टींसोबतच ह्या भागाचा इतिहास सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. ऐतिहासिक कालखंडाबाबतचे विविध पुरावे आपल्याकडे शिवाजी महाराज्यांच्या काळात आणि त्याच्या आधी बांधले गेलेले अनेक किल्ले जसे कि सिंधुदुर्ग, मुरुड जंजिरा, सुवर्णदुर्ग, पूर्णगड इत्यादी आणि त्याच्याही आधी बांधल्या गेलेल्या विविध लेणी ज्या साधारणपणे इसवीसनाच्या ३ ऱ्या ते ७-८ व्या शतकापर्यंत अशा स्वरूपात दिसतात. परंतु त्याच्या आधीच्या कालखंडाचे कोणतेच पुरावे मोठ्या प्रमाणावर समोर आले नव्हते. पुरातत्वीय भाषेत त्याला dark age असे म्हणतात.
भौगोलिक दृष्ट्या जरी हा प्रदेश एक सारखा दिसत असला तरी भूशास्त्रीय जडणघडणीनुसार या भागाचे अजून ३-४ विभाग करता येतात. कोकणाची ओळख असलेला जांभा दगड प्रामुख्याने दक्षिण कोकणात किनाऱ्या जवळच्या पठारांच्या माथ्यावर आढळून येतो. ह्या जांभ्या दगडाच्या कमी उंचीच्या पठारांना स्थानिक भाषेत “सडा” असे म्हणतात. तर ही सगळी प्रस्तावना द्यायचे मुळ कारण म्हणजे हा जांभा दगड ज्याला भूगर्भीयभाषेत laterite असे म्हणतात तो गेली अनेक वर्ष पुरातत्वीयदृष्ट्या महत्वाची अशी अश्मयुगीन अनेक रहस्य दडवून बसला आहे.

अश्मयुगात शिकार करून पोट भरणारा माणूस हळूहळू एके ठिकाणी राहून साधारणपणे आतापासून १२,००० वर्षापूर्वी स्थिर जीवन जगू लागला होता. शिकार करण्यासाठी त्याच्याकडे असणारी दगडी हत्यारे आता जास्त विकसित झाल्यामुळे शिकार करण्यासाठी त्याला लागणारा वेळ खूप कमी झाला होता त्या उरलेल्या वेळेचा वापर त्याने व्यक्त होण्यासाठी केला म्हणजेच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, तो बघत असलेले प्राणी, त्याचं स्वतःच जीवन ह्या बाबतच्या गोष्टी तो चित्र रुपात दगडी भिंतींवर अथवा जमिनीवर कोरून किंवा रंगवून काढू लागला होता. ह्या कलेच्या प्रकाराला पुरातत्व शास्त्राच्या भाषेत rock art किंवा भित्ती चित्र/ खोद्चीत्र असे म्हटले जाते. रंगवलेल्या चित्रांना pictograph आणि खरवडून काढलेल्या चित्रांना petroglyph असे म्हटले जाते तसेच आडव्या जमिनीवर जी चित्र कोरली जातात त्यांना geoglyphs असे म्हटले जाते. कलेच्या इतिहासातील हा एक महत्वाचा टप्पा गणला जातो. ही अशा प्रकारची चित्र जगभरात अंटार्क्टिका खंड सोडल्यास सगळीकडे सापडतात.
आता ह्या तीन भागापैकी तिसरा भाग हा कोंकणात जांभ्या दगडाच्या सड्यावर आढळून येतो. २५०० हून अधिक चित्रांची नोंद करताना अनेक संदर्भांचा मागोवा घेत राहिलो होतो त्यानंतर मग ह्या एवढ्या चित्रांची चित्रांच्या आकारानुसार विभागणी केली. तेव्हा आढळून आले की ह्या मधे मानवी आकृती आहे, भौगोलिक आकृत्या आहेत तसेच सोबतीने अनेक प्राणी आणि पक्षांचे सुद्धा अंकन केलेले आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे ह्या मधे जे ही काही प्राणी कोरले आहेत ते एकतर आकाराने जेवढे असतात तेवढे आहेत किंवा त्याहून जास्त मोठे दाखवले गेले आहेत. आता ह्यात मध्ये एक शिंगी गेंडा, हत्ती, हरिण वर्गातील प्राणी, विविध पक्षी, जलचर उभयचर असे विविध प्रकार दिसून येतात. ह्या चित्रांसोबतच त्या काळी मानवाने शिकार करण्यासाठी बनवलेली हत्यारे सुद्धा आढळून येत आहेत. ह्याच्या कालखंडाबाबत जारी आता काही निश्चित माहिती हातात नसली तरी समोर येणारे पुरावे हेच सांगतात की ही चित्र कोंकणात राहणाऱ्या अश्मयुगीन माणसाने कोरलेली असावीत. ह्यातीलच ९ साइटस् आता जागतिक वारसा म्हणून यूनेस्को च्या प्रस्तावित यादीत नोंदवल्या गेल्या आहेत. त्यातील सात ह्या रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत, एक सिंधुदुर्गातील आणि एक गोव्यातील आहे.
कोंकणात ही चित्र सापडली आहेत हे खरं, अगदी ती चित्र ज्याने कोरली आहेत जशी कोरली आहेत त्यावरून वाटते कि ह्या प्राण्यांच्या सहवासात तो कलाकार असावा. पण ह्याच्या पल्याड पुरातत्वीय दृष्ट्या प्राथमिक म्हणता येतील असे पुरावे कोंकणात अजून आढळलेले नाहीत. कोंकणात सड्यावर फिरताना नैसर्गिक रित्या तयार झालेली अनेक छोटी मोठी तळी आता आम्ही अभ्यासत आहोत त्यात काही जुन्या मातीचे किंवा वनस्पतीजन्य जीवांचे किंवा पानांचे अवशेष मिळतात का ह्याचा शोध घेण चालू आहे. परंतु हा एवढा मोठा विषय अभ्यासायचा म्हणजे काही सोप्पे काम नव्हे. गोष्टी शोधायच्या गोळा करायच्या मग त्याचा अभ्यास करून निष्कर्ष काढायचा ही खूप लांब लचक, मोठी आणि थकवणारी प्रोसेस आहे. सोबतच कातळ चित्रांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे प्रत्येक नवीन साईटवरून नवीन माहिती समोर येते आहे.

कर्नाटक, केरळ मधून सुद्धा आता चित्र समोर येत आहेत. पुरातत्वाचा अभ्यास करताना अशा अनेक गोष्टी समोर येतात आणि भूतकाळ आपल्याला काय काय देऊन गेला आहे ह्याची जाणीव होते, सोबतच आपण आता वर्तमानातून काय काय हरवून बसत आहोत आणि भविष्यात काय काय दवडणार आहोत ह्याची जाणीव करून देतो. शेवटी आपण जे काही करतो ते आपल्या भविष्यासाठी पण तेच जर आता आपण चुकीच्या पद्धतीने करत असू तर त्यावर वेळीच निर्बंध घालायला हवेत एवढं नक्की.
ऋत्विज आपटे