
एक वर्षाच्या लहान कुमारिकेपासून ते वयस्कर महिलेपर्यंत प्रत्येक स्त्रीला वंदन करणारं हे नवरात्र. हे सर्व करण्यासाठी, अमलात आणण्यासाठी घरोघरी लेकी सुना काटेकोर नियम पाळणे, अहोरात्र मेहनत घेणे, देवीच्या कृपेने, आशीर्वादाने तरी आपल्या आयुष्यातील दुःख कमी होतील या भाबड्या अपेक्षेने स्वतःची प्रचंड धावपळ, दगदग करीत असतात. आपल्या प्रापंचिक प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी, मुलाबाळांसाठी, अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी अत्यंत मनोभावे स्वतःला दहा दिवस देवीच्या सेवेत झोकून देतात.घरोघरी अतीव आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा सण. खासकरून स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा, स्त्रीशक्तीचा महिमा वर्णन करणारा आणि स्त्रीला देवीचं रूप समजून तिचा आदर, पूजाअर्चना करण्याचे दिवस. नवरात्र म्हणजे घरगुती स्वरूपातच नाही तर सामाजिक स्तरावरदेखील मंडळांमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा, दांडिया, होमहवन, पूजापाठ यामुळे वातावरण चैतन्यमय झालेले असते. या नऊ दिवसांत प्रत्येकाला जाणीव होते की, स्त्री शक्ती आहे, स्त्री भक्ती आहे, स्त्रीला नाना उपमा, उपाध्या देऊन तिला विविध पुरस्कार, विविध सन्मान बहाल केले जातात.अतिउत्साहाने, हसतमुखाने महिलादेखील सर्व कार्यक्रमांत हजेरी लावतात. स्वतःमधील आत्मविश्वास पुन्हा रिचार्ज होतो. पुन्हा नव्याने स्त्री कामाला लागते. याबरोबरच घरोघरी घटस्थापना, त्यामधील शास्त्रीय विधी, विविध रंगांच्या साड्या, दागदागिने परिधान करणे, गरबा खेळणे, त्यात फोटो सेशन, सेल्फीचा आनंद घेणे, उपवास करणे, यथाशक्ती देवींची साधना करणे यातदेखील ती स्वतःला गुंतवून घेते. कुठेतरी खोलवर विचार केला तर नवरात्रात बहुतांश जणी हाच विचार करीत असतात की निदान आता तरी आपल्या प्रापंचिक परिस्थितीमध्ये काही चांगला, सकारात्मक बदल होईल. आपल्या अडचणी दूर होतील. आपल्या घरात आपल्याला मान-सन्मान मिळेल. गृहकलह थांबतील, वाद मिटतील. आपल्या नवर्याला, सासरच्यांना आपली जाणीव होईल. एक स्त्री म्हणून तिच्या आत्मसन्मानाची किंमत कोण ठेवतं? तिच्या मतांना, निर्णयांना, भावनांना न्याय कोण देतं? तिचा घरात अपमान होणार नाही, ती दुखावली जाणार नाही याची जबाबदारी कोण घेतं? या प्रश्नांची जर अनेक महिलांनी मनापासून खरीखरी उत्तरे द्यायची ठरवली तर उत्तर कोणीच नाही हेच येणार यात शंका नाही.. या नवरात्रीमध्ये स्वतःपासून आपल्या घरात असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा सन्मान आपण फक्त नवरात्र काळात नाही तर कायम आयुष्यभर केला पाहिजे आणि तीच खरंतर देवीची मनापासून सेवा होऊ शकेल विचार करून बघा.
नेहा कुलकर्णी-जोशी
नाशिक