आपण रात्री आकाशाकडे पाहतो, तेव्हा डोळ्यासमोर चमचमणारे असंख्य तारे दिसतात. त्या ताऱ्यांकडे बघताना मनात अनेक प्रश्न उभे राहतात हे तारे कोणते? इतकी चमक कशी निर्माण होते आपल्यासारखा कुणीतरी तिथे असेल का? माणसाचे आयुष्य मर्यादित असले तरी त्याची जिज्ञासा मात्र अमर्याद असते आणि हीच जिज्ञासा आपल्याला घेऊन जाते त्या अनंत आणि रहस्यमय जगात अंतराळात. अंतराळ म्हणजे फक्त काळोख नाही, तर ते विश्वाचे अखंड पुस्तक आहे. या पुस्तकात अब्जावधी आकाशगंगा, त्यात कोट्यवधी तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू आणि अद्भुत कृष्णविवरे लपलेली आहेत. आपली पृथ्वी, जी आपल्याला एवढी मोठी वाटते, ती या विशाल विश्वात फक्त एक कण आहे. हाच विचार केला तरी मन थक्क होऊन जाते.
माणूस सुरुवातीपासूनच आकाशाशी जोडलेला आहे. चंद्राकडे पाहून आख्यायिका तयार केल्या, ताऱ्यांच्या राशी मांडल्या आणि आकाशाला देवांचे स्थान दिले. पण काळ पुढे सरकला, विज्ञान प्रगत झाले आणि हळूहळू या रहस्यांचे उत्तर मिळू लागले. दुर्बिणीतून आकाश पाहणाऱ्या गॅलिलिओने, गुरुत्वाकर्षणाचा शोध घेणाऱ्या न्यूटनने, आणि सापेक्षतावाद सांगणाऱ्या आइन्स्टाईनने अंतराळाचे अनेक पडदे उलगडले. १९५७ मध्ये स्पुटनिक उपग्रहाने जेव्हा आकाश गाठले, तेव्हा संपूर्ण जगाने थरार अनुभवला. युरी गगारिनने प्रथमच अंतराळात पाऊल ठेवले आणि नील आर्मस्ट्राँगने जेव्हा चंद्रावर पहिले पाऊल टाकले, तेव्हा संपूर्ण मानवजातीचे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. त्या क्षणी केवळ अमेरिका नाही, तर पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अभिमानाने उभा राहिला.
आज अंतराळ फक्त वैज्ञानिकांचे क्षेत्र राहिलेले नाही, तर ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाले आहे. मोबाईलमधला जीपीएस, हवामानाचा अंदाज, टीव्हीवरील थेट सामने हे सगळे अंतराळातील उपग्रहांमुळेच शक्य झाले आहे. भारतानेही चांद्रयान, मंगळयानसारख्या मोहिमा यशस्वी करून दाखवल्या, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. पण अंतराळ केवळ यशकथा सांगत नाही; ते आपल्याला नम्रतेची जाणीव करून देते. कारण आपण अजूनही त्यातील फारच थोडे जाणतो. तिथे अजून किती रहस्ये दडलेली आहेत! कदाचित इतर ग्रहांवर जीवन असेल, कदाचित आपण कधी मंगळावर राहू अंतराळ म्हणजेच भविष्याच्या अनंत शक्यता. म्हणूनच अंतराळ हे फक्त वैज्ञानिक संशोधनाचे क्षेत्र नाही, तर ते माणसाच्या स्वप्नांचे आशांचे आणि जिज्ञासेचे प्रतीक आहे. प्रत्येक रात्री आकाशाकडे बघताना आपल्याला जाणवते की आपण किती लहान आहोत, पण त्याचवेळी आपली स्वप्ने किती मोठी असू शकतात. या गोष्टींचा विचार केला की मन अगदी भरून येते आणि मनाच्या संवेदनशिलातेला थंड झुळूक लागल्याचा भास होतो.
गुरुप्रसाद सुरवसे