अक्षय्य तृतीया!‌

23 Apr 2025 16:15:45



अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया!‌

साडे तीन मुहुर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा हा मुहुर्त. वर्षाचा असा काळ जेव्हा ऊनाच्या उष्णतेने अंगाची लाही लाही होत असते. पंखे, कूलर घरात एक आल्हाददायक थंडावा देत असतात. शाळांमध्ये परिक्षांची गडबड संपून मुलांच्या आणि शाळेच्या दिनचर्येत सुट्ट्यांमुळे निवांतपणा आला असतो. वाळा घातलेलं माठातलं सुवासिक पाणी आपली तहान भागवून एक ताजेपण प्रत्येक घोटासोबत आपल्याला देत असतं‌. दुपारच्या जेवणानंतर रामफळ, कलिंगड, टरबूज अशा फळांची रेलचेल आपल्या 'उन्हाळ्यातल्या दुपारींना' रंगतदार बनवत असतात आणि अशा सगळ्याच्या मध्ये येणारा एक सण म्हणजे 'अक्षय्यतृतीया'!

मी अक्षय्यतृतीयेची आतुरतेने वाट बघत असते. त्याला कारण हे दुसरं तिसरं काही नसून फळांच्या राजाचं म्हणजे 'आंब्यांचं' आगमन. अक्षय्यतृतीयेपासून दर उन्हाळ्यात आमच्या घरी आंबे खायला सुरूवात होते‌. त्यामुळे अक्षय्यतृतीया विशेष असते. पण त्यासोबत आणि एका कारणासाठी अक्षय्यतृतीया महत्वाची असते आणि ते कारण म्हणजे असं म्हणतात की अक्षय्यतृतीयेला एखादी गोष्ट सुरू केली तर ती अक्षय्य राहते. ज्याचा कधीच क्षय होत नाही ते म्हणजे अक्षय्य. आपल्याला काय हवं असतं तर अक्षय्य आनंद, सुखसमृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य आणि काही सुंदर विचार जे जीवन घडवायला मार्गदर्शक ठरतील आणि तेच मागणं आपण अक्षय्यतृतीयेच्या दिवशी ईश्वराकडे मागत असतो‌.

आणि ही प्रार्थना करून मग आमरस पूरी चा नैवेद्य देवाला अर्पण करून मग मी चाखते उन्हाळ्यातला माझा पहिला आमरस! आणि त्या आमरसाची गोडी औरच असते.

असा हा उन्हाळ्यातल्या निवांतपणातही एक चैतन्य भरणारा सण म्हणजे अक्षय्य तृतीया! आणि इतक्या ह्या महत्त्वपूर्ण सणाला आपण कसं बरं आणखी खास बनवू शकतो. कसं तर आमरसासोबतच एका नव्या पुस्तकाच्या नव्या प्रवासाची सुरूवात करून, नाही का? ज्या दिवसापासून एखाद्या शुभकार्याला सुरूवात केली की ते अक्षय्य राहतं असं म्हणतात त्या दिवशी जर आपण आपल्याला सुट्टीत ही ताजेपणा देईल असं एखादं पुस्तक वाचलं तर! पुस्तकं आपल्याला समृध्द करतात आणि अशा पुस्तकांशी आपण सुट्टीत जर मैत्री केली तर उन्हाळ्यात बाकी मजामस्ती बरोबर काहीतरी नवीन गोष्टी, कथा, कादंबऱ्या, चरित्र किंवा नवीन क्षेत्रांविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला मिळेल. चला तर मग ह्या अक्षय्य तृतीयेला नवीन पुस्तकांना आपलंसं करू आणि उन्हाळ्याची गोडी वाढवू !

-मनाली पुरूषोत्तम देशपांडे

Powered By Sangraha 9.0