पाऊस

युवा विवेक    22-Jul-2025
Total Views |

पाऊस
 
'पाऊस' हा शब्द जरी उच्चारला तरी मनात शेकडो आठवणी जाग्या होतात. तो केवळ पाण्याचा स्रोत नाही, तर तो जीवनाचा, प्रेमाचा, आशेचा आणि सृष्टीच्या पुनर्जन्माचा उत्सव आहे. पावसाने नटलेले आभाळ, चिंब भिजलेली माती, झाडांवरून टपकणारे थेंब आणि मातीचा दरवळ हे सगळं मनात एक अद्वितीय शांतता निर्माण करतं. म्हणूनच पावसाला "भावनांचा ऋतू" असं म्हटलं जातं.
भारतासारख्या कृषिप्रधान देशात पावसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी पावसाचे आगमन म्हणजे नवजीवन. ज्वारी, बाजरी, भात, तूर अशा अनेक खरीप पिकांच्या बियाण्यांचे भाग्य हे मान्सूनवर अवलंबून असते. जेव्हा जून महिन्यात आकाशात काळे ढग दाटू लागतात, तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत नवी चमक दिसते. पहिल्या सरी पडतात आणि ओल्या मातीत राबणाऱ्या हातांना आशेचा नवा हात मिळतो. पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनाचा श्वास. परंतु पाऊस केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. तो आपल्या दैनंदिन जीवनातही महत्त्वाचा ठरतो. नद्या, धरणं, तलाव, विहिरी हे सगळं पावसाच्या कृपाशिर्वादावर उभं आहे. पावसामुळे भूजल पातळी वाढते. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा साठा होतो. विद्युत उत्पादनास मदत होते. म्हणून पावसाचे प्रत्येक थेंब मोलाचे आहेत. त्याच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन, साठवणूक आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.
 पावसाचे एक सांस्कृतिक आणि भावनिक अंगही आहे. तो कधी प्रेमाच्या कविता घेऊन येतो तर कधी विरहाचे गाणे. मराठी साहित्यात, लोकगीतांमध्ये, चित्रपटांमध्ये पावसाचे वर्णन हे नेहमीच हळुवार आणि भावनांनी ओथंबलेले असते. "ये रे ये रे पावसा", "निळ्या निळ्या आभाळात" अशा गाण्यांनी अनेक पिढ्यांचे बालपण आणि तरुणपण रंगवले आहे. लहानग्यांच्या चिखलात उड्या, छत्र्यांचे रंग, गरम भजी आणि वाफाळलेला चहा ही सगळी दृश्ये पावसाच्या आठवणींना जिवंत ठेवतात, पण पावसाचे दुसरे एक कठोर रूपही आहे; अनियमित पाऊस, अतिवृष्टी, पूर, दरडी कोसळणे, शेतीचे नुकसान, घरांची हानी यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. मुंबईसारख्या शहरांमध्ये जलनिकासीची समस्या भीषण बनते. पाणी साचते, वाहतूक ठप्प होते. अशा वेळी पावसाचे रूप संकटमय ठरते. म्हणूनच हवामान बदलाचे गांभीर्य ओळखून आपल्याला पावसाशी संबंधित आपत्ती व्यवस्थापनाचीही तयारी ठेवावी लागते. आजच्या काळात पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. जंगलतोड, जलस्रोतांचे प्रदूषण, प्लास्टिकचा वापर यामुळे पावसाची लय बिघडली आहे. काही ठिकाणी दुष्काळ, तर काही ठिकाणी महापुराचा सामना करावा लागतो. अशा वेळी आपण सर्वांनी पावसाचा योग्य सन्मान केला पाहिजे. जलसंधारण, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण हे केवळ सरकारी उपक्रम नाहीत, तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे.
शेवटी एवढेच म्हणता येईल की, पाऊस हा निसर्गाचा आशीर्वाद आहे; तो काळजीपूर्वक जपावा लागतो. त्याच्या प्रत्येक थेंबामध्ये जीवन आहे आणि त्या जीवनाची रोपं फुलवण्यासाठी आपल्यालाच मेहनत घ्यावी लागणार आहे. पाऊस येतो आणि आपल्याला पुन्हा एक नवी आशा देऊन जातो. तो कधी भिजवतो शरीर, तर कधी मन.
 
गुरुप्रसाद सुरवसे