लो.बाळ गंगाधर टिळक

युवा विवेक    23-Jul-2025
Total Views |

लो.बाळ गंगाधर टिळक 
 
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील पहिल्या टप्प्यात ज्यांनी भारतीय जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची मशाल पेटवली असे व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळ गंगाधर टिळक ज्यांना लोकमान्य टिळक ही उपाधी जनतेनेच बहाल केली. टिळक हे केवळ एक राजकारणी नेते नव्हते, तर एक महान शिक्षक,पत्रकार, समाजसुधारक आणि राष्ट्राभिमानाचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांचा राष्ट्रवाद हा प्रखर, प्रेरणादायी आणि क्रांतिकारक होता. त्यांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" असे जाहीर करत जनतेच्या मनात स्वराज्याची जाणीव निर्माण केली. टिळकांचे शिक्षण पुण्यातील येरवडा येथील डेक्कन कॉलेज येथे झाले. गणित व संस्कृत हे त्यांचे विशेष विषय. ते एक बुद्धिवादी शिक्षक होते, पण शिक्षणाच्या मर्यादित चौकटीवर त्यांचा विश्वास नव्हता. "Education is the manifestation of perfection already in man" या विवेकानंदांच्या विचारांशी जुळते असे त्यांचे शिक्षणदर्शन होते.
त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती,आत्मगौरव आणि सामाजिक जबाबदारीची भावना जागवली. टिळकांचा राष्ट्रवाद हा पाश्चात्त्य मूल्यांवर आधारलेला नव्हता, तर ते भारतीय संस्कृती, इतिहास आणि धर्म यांच्याशी जोडलेले होते. त्यांनी गीता रहस्य या ग्रंथाच्या माध्यमातून भगवद्गीतेतील निष्काम कर्मयोगाचा राष्ट्रनिर्मितीसाठी उपयोग करून दिला. त्यांचा धर्म हा कर्मप्रधान होता, केवळ कर्मकांडप्रधान नव्हता. धर्म आणि राजकारण यांचा त्यांनी सामंजस्यपूर्वक मेळ घातला. त्यांनी समाजात जागृती जागवण्यासाठी माध्यम म्हणून केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश सरकारविरोधात निःसंकोचपणे लिहिले. त्यांची लेखणी झणझणीत होती. ती जनतेला जिवंत ठेवणारी प्रेरणा देणारी होती. त्यांनी १८९७ मध्ये चापेकर बंधूंना प्रेरणा देणारे लेख लिहिले आणि त्यामुळे त्यांना कारावासही भोगावा लागला. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव सामाजिक एकता व राष्ट्रप्रेम जागवण्यासाठी सुरू केले. हे उत्सव म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हते, तर ते इंग्रजांविरुद्ध जनजागृतीचे हत्यार होते. यामुळे सर्व स्तरातील जनता एकत्र आली, एकत्र गाणे गाऊ लागली आणि एकत्र लढण्यास सज्ज झाली.
टिळकांचा राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक होता. त्यांचा राष्ट्रवाद केवळ भाषेवर, प्रांतावर, जातीवर आधारित नव्हता. स्वराज्य हे फक्त राजकीय ध्येय नव्हते, ते समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक होते. शिक्षण, उद्योग, न्यायव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी राष्ट्रनिर्मितीचा विचार रुजवला. ब्रिटिशांनी त्यांना तीन वेळा तुरुंगात टाकले, पण त्यांनी कधीही झुकून याचना केली नाही. मंडालेच्या तुरुंगात त्यांनी गीता रहस्य लिहिले. त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण हा मातृभूमीसाठी समर्पित होता. टिळकांच्या विचारांनी पुढे महात्मा गांधींसह अनेक स्वातंत्र्यवीरांना स्फूर्ती दिली. गांधीजी म्हणाले होते, "टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते होते. १ ऑगस्ट १९२० मध्ये त्यांचे निधन झाले, तेव्हा संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला. टिळक हे एक युगप्रवर्तक होते. त्यांनी भारतीय मनात असलेली गुलामगिरीची भावना मोडून काढली आणि आत्मगौरव, स्वाभिमान आणि स्वराज्याची ज्योत पेटवली. आजही टिळकांचा राष्ट्रवाद हे नवभारताच्या उभारणीसाठी प्रेरणादायी तत्त्व आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग हा स्वाभिमान आणि संस्कृतीच्या मूल्यांवर आधारित राष्ट्रनिर्मितीचा मार्ग आहे.
 
गुरुप्रसाद सुरवसे