माझ्या आठवणी असे म्हटले की, त्या क्षणाची जणू यादीत असते. माझ्या आठवणीतील पहिला पाऊस, कॉलेजचा तो पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस, नोकरीचा पहिला दिवस, वगैरे वगैरे अशा बऱ्याच आठवणी असतात. माझ्या आठवणी या 'उन्हाळी सुट्टीत आजी बरोबर घालवलेल्या संस्कारक्षम क्षणात आहेत'. वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर झाला की त्याच संध्याकाळी आजीच्या घरी जायचं. आता आजोळ म्हटलं आणि त्यात उन्हाळी सुट्टी म्हणजे आमरस पुरी हे कॉमन झाले. पण माझ्या आठवणी आजीने संस्काराचे गिरवलेले धडे,अनुभवाच्या सांगितलेल्या गोष्टी यात दडल्या आहे. आजही त्या प्रसंगात किंवा क्षणात आजीने सांगितले ते शब्द आठवतात. एक प्रकारे मनाला आधार मिळतो आणि सकारात्मक ऊर्जा कार्यरत होते. संध्याकाळी दिवे लागणीला शुभंकरोती म्हणणे यातून घरात सकारात्मकता निर्माण होते. तसेच रात्री जेवताना घरातील सर्व मंडळींनी एकत्र जेवणे. दिवसभराच्या घडलेल्या घडामोडींची चर्चा करत जेवणे हे आजही मला आठवते. अजून एक प्रसंग म्हणजे रात्री झोपायच्या आधी सर्व घर एकदम व्यवस्थित आवरून झोपणे, हे माझी आजी मला आवर्जून सांगायची.
असेच एकदा आजीकडे रहायला गेले असताना रात्रीचे साधारण अकरा वाजले असतील, बेडरूम मधील टेबलावर असणारा पसारा त्याच वेळेला मला आजीने लगेच आवरायला सांगितला. ए...आजी आता नाही ग, उशीर झाला आहे मला झोप येते आहे, मी आत्ता नाही आवरणार. मी माझ्या अल्लड वयात ते उत्तर आजीला दिले. मग आजीने मला त्या मागील कारण व्यवस्थित समजून सांगितले. रात्री आपण झोपायच्या आधी आपले संपूर्ण घर आवरून झोपल्यावर रात्री लक्ष्मी घरात वास करते आणि ज्या घरात स्वच्छता आहे, त्याच घरात लक्ष्मी राहते. ज्या घरात स्वच्छता नाही त्या घरात लक्ष्मीला यायला आवडत नाही. आजीने सांगितलेले हे मला इतके मनापासून पटले की, आज इतकी वर्षे झाली या गोष्टीला परंतु कितीही झोपायला उशीर झाला तरी संपूर्ण घर आवरल्याशिवाय मी झोपत नाही. आता आजीने लावलेल्या या संस्कारक्षम आठवणी अंगवळणी पडल्या आहेत. अशा बऱ्याच आठवणी आहेत. आज हातात कागद पेन घेतला आणि सरसर त्या कागदावर उमटल्या. आणि माझ्या आजीच्या या बटव्यातील गोड गोड आठवणी सांगताना मन परत एकदा प्रफुल्लित झाले. आजीची पुढील पिढी; आम्ही त्यांनी दिलेले संस्कार, त्याच्याशी संबंधित आठवणी आम्ही जपल्या, स्वतःमध्ये रुजवल्या. आता आमच्या पुढील पिढीपर्यंत त्या पोहोचवणे व त्यांनी त्या जतन करून त्यांच्या पुढील पिढीला सांगणे. यामुळेच आठवणी रूपी संस्कारांची ही माळ तयार होईल आणि अधिकाधिक घट्ट होत जाईल यात शंका नाही.
नेहा कुलकर्णी जोशी