सृष्टीचा शृंगार : श्रावण

युवा विवेक    28-Jul-2025
Total Views |

सृष्टीचा शृंगार : श्रावण
शृंगार हा स्त्रियांचा आवडीचा विषय.. कुणी आपल्या प्रियकरासाठी नटतं, तर कुणी आपल्या नवऱ्यासाठी.. हे नटणं किंवा सजणं साऱ्या स्त्रियांना आवडतं. विशेषतः तरुण मुलींना अधिक आवडतं. सृष्टीला म्हणजेच निसर्गाला देखील सुंदर दिसावंसं वाटतं. म्हणूनच कदाचित श्रावण महिन्याचा शोध लागला असावा! श्रावण महिनाच विलक्षण. सृष्टीला नवं रुप ल्यावंसं वाटतं ते या श्रावण महिन्यातच! हा शृंगार मोठा देखणा असतो. उन्हाचा क्षणार्धात पाऊस होतो, पावसाचं क्षणार्धात ऊन होतं. श्रावणातल्या या ऊन -पावसाच्या स्पर्शाने सृष्टी शहारते. तिच्या अंतरंगात तारुण्य आकार घेऊ लागतं. हिरवा, पिवळा, लाल, कधी तपकिरी, कधी पांढरा अशा रंगाची शृंगार पेटी अलगद उघडते. तेव्हा हळूच एखादी वाऱ्याची झुळूक येते आणि लाजेने आभाळातले सुरेख रंग पाण्यावर प्रतिबिंब होऊन तरंगायला लागतात. मग श्रावण अधिकच रंगारी होऊ लागतो. झाडे, वेली, नदी, झरे, पाऊलवाटा, पक्षी ह्या साऱ्यांचे रंग काहीसे ठळक होतात. त्या साऱ्यांचे मिळून एक निसर्गचित्र तयार होते. तुम्ही -आम्ही म्हणजे आपण सर्वच या चित्रात आपापल्या परीने आपल्या उत्साहाचे, प्रेमाचे, मांगल्याचे रंग सण नि उत्सवांच्या रुपाने भरु लागतो. माणूस आणि निसर्ग हातात हात गुंफून कविता आणि गाणी गात जणू नाचायला लागतात. कधी गोल फिरतात , अगदी मुली भोंडला खेळताना फिरतात तशा! भोंडल्यात मधोमध हत्तीचे चित्र असते. निसर्ग आणि माणूस यांच्या भोंडल्यात मधोमध उभा असतो रंगारी श्रावण...
खरेतर श्रावण हाच परिपूर्ण शब्द आहे. आपल्या आवडत्या माणसाचे नाव ओठावर येताच त्याचं बोलणं, हसणं , रागावणं वगैरे आपल्या डोळ्यासमोर येतं. तसंच श्रावण या शब्दाचं आहे. श्रावण या तीन अक्षरी शब्दांत दडलेलं सुख, आनंद, ऐश्वर्य, तारुण्य सारं काही डोळ्यासमोर उभं राहतं नि त्या श्रावणातच मग मन हरवून जातं. पण तरीदेखील नेमक्या शब्दांत श्रावणाचं वर्णन करताच येत नाही. कितीतरी कवींनी श्रावणाला आपल्या कवितेत गुंफलेलं आहे. पण प्रत्येक श्रावणाची कविता नवी असते अगदी त्याच्या कोवळ्या हिरव्या रंगांसारखी! श्रावणात घननीळा बरसला, ऋतू हिरवा, हसरा नाचरा जरासा लाजरा वगैरे गीते श्रावणाचे वर्णन करणारी आहेत. पण यातला प्रत्येक श्रावण किती सुंदर पद्धतीने कवींनी मांडला आहे. तरीही तो पुरा होत नाही. लहान बाळाला आपण हळूच उचलून कडेवर घेतो. त्याचे लाड करतो, त्याच्या नाजूक गालांवरुन हळूवार हात फिरवतो. कधी त्याचे गोड गोड पापेही घेतो. पण आणखी एखादा पापा घ्यायचा राहिला किंवा पुन्हा एकदा त्याच्या गालावरुन हात फिरवायला हवा असं आपल्याला वाटतं. श्रावणही त्या गोड बाळासारखाच असतो.. खोडकर असतो, लबाड असतो, निरागसही असतो..
श्रावण ज्याप्रमाणे नवजात अर्भकासारखा आहे, तरुणीच्या पहिल्या लाजेसारखा आहे तसाच एखाद्या गृहस्थासारखा तो परिपक्वही आहे. झाडाला फुटलेल्या पालवीतून फांदी तयार होते. तीच पुढे आणखी मोठी होऊन वाटसरुला सावलीही देते. गृहस्थाच्या वावरण्याने घरात जशी एक परिपक्वता जाणवते तशीच श्रावणाच्या सहवासातही जाणवते. एकेका फुलाला बऱ्याच पाकळ्या असतात. त्या गंधाची, सौंदर्याची आस पूर्ण करतात. एखाद्या फळाच्या रसाने माणूस तृप्त होतो. खिडकीतून दिसणाऱ्या हिरवाईने नटलेल्या डोंगराचीही आपण एकटे असतानाही सोबत वाटते, आधार वाटतो..अगदी घरातल्या वडिलधाऱ्या माणसासारखी! म्हणूनच श्रावण अबालवृद्धांना अमाप आनंद देत असतो.
असा वेगवेगळ्या रुपात भेटणारा श्रावण कृष्णासारखा आहे. सृष्टी म्हणजे कृष्णावर मनापासून प्रेम करणारी राधा आहे. कृष्णाच्या नुसत्या चाहूलेनेही राधा स्तब्ध होते. आपसूकच ती नटू लागते, सजू लागते.. शृंगार करु लागते. राधा- कृष्णासारखं असणारं हे नातं सृष्टीच्या शृंगारातून आपल्याला जाणवतं. त्यांचं प्रेम पाहून आपल्या मनाला सुखाचा, समाधानाचा स्पर्श होतो. आताही खिडकीतून मी हा सृष्टीचा शृंगार पाहतो आहे...
- गौरव भिडे
पुणे