श्रावण महिना आला की, मन नकळतच प्रसन्न होतं. आकाशात पांढरे ढग, वातावरणात गारवा आणि मनात सणांची चाहूल. याच श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी येणारा एक खास सण म्हणजे नारळी पौर्णिमा. कोकणात, समुद्रकिनारी आणि कोळी समाजात हा सण मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने आणि प्रेमाने साजरा होतो. लहानपणी आजीच्या हातून केलेल्या नारळाच्या वड्या, अंगणात झालेली पूजा आणि समुद्रावर आणलेले नारळ या आठवणी अजूनही अनेकांच्या मनात कोवळ्या आहेत.
नारळी पौर्णिमा म्हणजे केवळ एक सण नाही, ती एक भावना आहे निसर्गाशी, समुद्राशी आणि आपल्या माणसांशी जपलेलं नातं आहे. या दिवशी सकाळपासूनच समुद्रकिनाऱ्यांवर गडबड सुरू होते. कोळी बांधव पारंपरिक पोशाखात, ढोल-ताशांच्या गजरात, आपली बोट सजवतात. स्त्रिया सुंदर पारंपरिक साड्यांमध्ये गाणी गातात. प्रत्येक नावेसमोर समुद्राची पूजा होते. हे सागरराजा, आम्हाला भरपूर मासळी मिळू दे, तू शांत राहा, आणि आम्हाला सुरक्षित ठेव. अशा मनोभावे प्रार्थना केल्या जातात. ही पूजा म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही तर समुद्राशी बांधलेली आपुलकीची एक गाठ असते.
समुद्र कोळी समाजाचा जीवनसाथी आहे. तो त्यांच्या पोटापाण्याचा आधार आहे. त्यामुळे वर्षातून एकदा तरी त्याचं आभार मानणं, त्याचं स्मरण करणं, हीच नारळी पौर्णिमेची खरी भावना आणि म्हणूनच नारळ जो एक शुद्ध आणि संपूर्ण फळ आहे तो समुद्राला अर्पण केला जातो. तो नारळ म्हणजे कृतज्ञतेचं प्रतीक आहे. नारळी पौर्णिमेचं आणखी एक रूप म्हणजे बंधुभाव आणि कुटुंबाची एकजूट. अनेक घरांत या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं. बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि भावंडांमधले प्रेम नवी उजाळी घेते. या सणात विशेष आकर्षण असतं ते म्हणजे चविष्ट जेवण. घराघरांत नारळाच्या गोड वड्या, लाडू आणि कोकणातील खास पदार्थ बनवले जातात. सण म्हणजे गोड आठवणी, आणि त्या आठवणी या चविष्ट जेवणातून आयुष्यभर टिकून राहतात. नारळी पौर्णिमा आपल्याला एक साधा पण महत्त्वाचा संदेश देते निसर्गाशी आपुलकीने वागा. समुद्र, पावसाळा, मासे, वारे हे सर्व आपल्याला जगायला मदत करतात. त्यांचा आपण आदरसत्कार केला पाहिजे. फक्त पूजेतून नाही तर मनातूनही. आज जेव्हा माणूस निसर्गापासून दूर जातो आहे, तेव्हा असे सण आपल्याला थांबवतात, विचार करायला लावतात आणि म्हणतात संपत्तीपेक्षा नाती मोठी आहेत व त्या नात्यांमध्ये निसर्गही एक आहे. नारळी पौर्णिमा म्हणजे परंपरा, श्रद्धा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम. तो आपण प्रत्येक वर्षी साजरा करूया, नव्या उमेदीनं, नव्या जाणीवेनं.
नारळी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
गुरुप्रसाद सुरवसे