रक्षाबंधन!

युवा विवेक    11-Aug-2025
Total Views |

रक्षाबंधन! 
भारतीय सणांमध्ये रक्षाबंधन या सणाला एक वेगळंच स्थान आहे. हा सण म्हणजे केवळ एक औपचारिकता नाही, तर भावनिक नात्यांची उब देणारा एक सुंदर प्रसंग असतो. श्रावण महिन्यात येणारा रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आहे. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि तो तिचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो. बालपणात अनेकांनी अनुभवलेला रक्षाबंधन हा दिवस म्हणजे घरातल्या उत्साहाने भरलेला क्षण असतो. आई लवकर उठून स्वयंपाकघरात गोडधोड करत असते. बहिणी राखी सजवतात, एखादी ती स्वतः तयारही करते. छोट्या छोट्या गोष्टीतून या सणातली आपुलकी जाणवते. भावंडांमधलं खेळणं, खोड्या करणं आणि त्यातही राखीचा धागा बांधतानाचा भावनिक क्षण. तो काही शब्दात सांगता येत नाही. राखी म्हणजे फक्त एक दोरा नाही; तो असतो प्रेम, विश्वास आणि नात्याचा एक अमूल्य धागा. बहिण भावाच्या आरोग्यासाठी, यशासाठी, सुखासाठी प्रार्थना करते आणि भाऊही आपल्या बहिणीचं रक्षण करायला कायम सज्ज असतो. काही वेळा भाऊ लांब असतो, बहिण त्याच्यासाठी राखी पोस्टानं पाठवते. पण अंतर या नात्यातल्या प्रेमाला कधीच कमी करू शकत नाही. आज अनेक घरांत भावाला बहिण नसते, बहिणीला भाऊ नसतो. पण अशाही घरांमध्ये रक्षाबंधन साजरं केलं जातं. त्यामुळे हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो माणुसकीचं आणि जिव्हाळ्याचं प्रतीक बनतो.
रक्षाबंधनाला धार्मिक आणि ऐतिहासिक मुळं आहेत. महाभारतात द्रौपदीने श्रीकृष्णाला राखी बांधली होती. कृष्णानेही तिचं संकटात रक्षण केलं. असंच नातं आज आपल्याही घरात पाहायला मिळतं. अनेक भावंडं एकमेकांसाठी संकटात उभी राहतात आणि त्या क्षणांत राखीचा खरा अर्थ समजतो. आजच्या या धकाधकीच्या जगात रक्षाबंधन आपल्या नात्यांना थांबून बघण्याची संधी देतो. व्यस्त आयुष्यात आपण किती वेळा भावंडांशी मनापासून संवाद करतो? किती वेळा त्यांच्या वाट्याला येतो? रक्षाबंधन आपल्याला हे सगळं आठवून देतं. एक दिवस तरी प्रेमाने, आठवणीने, आणि हसतमुखाने एकत्र येण्याचा प्रसंग घडवतो. आधुनिक काळात राख्याही बदलल्या आहेत. साध्या दोऱ्यांपासून ते ब्रासलेट, इको-फ्रेंडली राख्या, फॅन्सी राख्या अशी विविध रूपं आली आहेत. पण त्या मागचं प्रेम मात्र तसंच आहे निरागस, निस्वार्थ आणि प्रेमळ भाव. या दिवशी अनेक ठिकाणी घरात गोड पदार्थ बनतात पुरणपोळी, खीर, लाडू इ. गोडी फक्त तोंडात नाही, तर नात्यांतही भरते. बहिण भावासाठी गिफ्ट आणते, भाऊही तिला एखादं खास गिफ्ट देतो. पण खरी देणगी असते ती एकमेकांच्या आयुष्यात सतत असण्याची. रक्षाबंधन म्हणजे एकमेकांना सांगण्याची वेळ तू आहेस म्हणून मी आहे आणि हे नातं केवळ एका दिवसापुरतं मर्यादित न ठेवता वर्षभर जपणं हाच या सणाचा खरा हेतू. आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं, विशेषतः आपल्या भावंडांचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांचं अस्तित्व हीच एक सुंदर भेट आहे.
रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा!
गुरुप्रसाद सुरवसे