The Morden Wall
“अरे तू कधीपासून खेळतोय, बोर होत नाहीस का?” हे ऑस्ट्रेलियाचा दिग्गज स्पिनर नेथन लायन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये म्हणला होता चेतेश्वर पुजाराला..! कारण गोलंदाजी करून लायनचे हात सुजले होते पण शरीरावर भिन्न-भिन्न ठिकाणी बॉल खाऊनदेखील चेतेश्वर पुजाराचे मनोधैर्य कुठेच खचले नव्हते. भारतीय संघासाठी आणि पुजारासाठी ही moral victory तर होतीच आणि याच एका क्षणाने चेतेश्वर पुजाराला सांगितले की, ‘तू एक कसोटी खेळाडू म्हणून यशस्वी झालास..!’
कसोटी क्रिकेट जिथे नंबर ३ ची जागा अत्यंत महत्त्वाची असते तिथे पुजाराने ‘The Wall’ म्हणजेच राहुल द्रविडला रिप्लेस केले होते. कोणत्याही ग्रेट खेळाडूच्या जागेवर खेळणे हे अवघड असते, पण चेतेश्वर पुजाराने त्याच्या करियरमध्ये ‘The Morden Wall’ ही उपाधी मिळवली. भारतीय संघ कधीही अडचणीत असला तर पुजारा तिथे उभा असायचा. पुजारा तसा मैदानावर अग्रेसिव नसायचा पण त्याचे डोळे बोलायचे! जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, मी माझ्या संघासाठी इथे उभा आहे हा निर्धार त्याच्या डोळ्यात दिसायचा.
‘The Voice of Cricket’ म्हणजेच हर्षा भोगले पुजारासाठी म्हणाला होतं की, “In the world of Pop music, Pujara is a classical musician!” पुजारा एखाद्या शृंखलेत १००० चेंडू खेळून काढायचा. जेव्हा पूर्ण जग धावा कश्या जलद काढता येतील याचा विचार करत होते तेव्हा पुजाराने त्याच्या defense वर विश्वास ठेवला. आपण लहानपणी कोणत्याही गोष्टीत एखाद्या अश्या सैनिकाबद्द्ल ऐकलं असेल जो कितीही आक्रमण झालं, कितीही मारा झाला तरी उभा असायचा. चेतेश्वर पुजारा खऱ्या अर्थाने तो सैनिक होता ज्या सैनिकावर विजय मिळवणं मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, नेथन लायन, जेम्स अॅंडरसन, स्टूअर्ट ब्रॉड यांच्यासारख्या दिग्गज गोलंदाजांना जमलं नाही. ‘गाबा’चे गर्वहरण झाले कारण पुजारा उभा होता, २०१८-१९ मध्ये इतिहास रचला गेला कारण पुजारा उभा होता, भारतीय संघ सलग १२ वर्षे घरी विजयी होत गेला कारण पुजारा उभा होता, समोरचा संघ हताश होत राहायचा कारण पुजारा उभा होता!
रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासोबतच आता चेतेश्वर पुजारानेही कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. जेव्हा क्रिकेट बघायला सुरुवात केली तेव्हाचे हे हिरो आता हळूहळू क्रिकेटपासून लांब जाताना पाहून मन भारावून येते. पण ‘Don’t cry because it’s over, Just smile because it happened’ हे वाक्य मनात ठेवून मी आणि माझ्यासारखेच हजारो-लाखो चाहते पुन्हा तो खेळ बघायला लागतो. आज पुजारा क्रिकेटमधून निवृत्त झाला पण पुजारा हा विचार क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही याची मला खात्री आहे. उद्या कोणत्याही युवा खेळाडूने पिचवर तेच धैर्य, तीच जिद्द, तीच लढायची मानसिकता दाखवली की आपल्या सगळ्यांनाच चेतेश्वर पुजाराची आठवण येईल हे नक्की!
Thank You चेतेश्वर पुजारा..!
- देवव्रत वाघ