आजचा युवा

युवा विवेक    29-Aug-2025
Total Views |

आजचा युवा
युवा म्हणजे तरुण हे आपल्या सर्वांना माहित आहेच. पण युवा म्हटलं म्हणजे त्या शब्दाचा अर्थ तरुण इतकेच म्हणून थांबता येत नाही. अनेक गोष्टींचा संबंध त्या शब्दाशी जोडला गेलेला आहे. स्वामी विवेकानंदांनी आदर्श तरुण कसा असावा याबाबत सखोल मार्गदर्शन केले आहे. 'युवाविवेक' हे नाव यावरुनच निर्माण झाले आहे. विवेक म्हणजे सकारात्मक किंवा नकारात्मक यात न अडकता प्रत्यक्ष कृतीकडे योग्य व विविध पोषक वातावरणातून जाणे.. साहित्य आणि विचार यांचा संगम घडविण्याचे आणि आधुनिक काळाला साजेसे कार्य तरुणांना हक्काचे वाटणारे युवाविवेक करीत आहे. आधुनिक साधने नव्हती तेव्हाचा युवावर्ग आणि आताचा युवावर्ग यात पुष्कळच फरक जाणवतो. बाल्य, तारुण्य, गृहस्थ आणि वृद्ध या माणसाच्या चार अवस्थांपैकी दोन अंतिम अवस्था दोन प्रथम अवस्थांवर अवलंबून आहेत. विशेषतः तारुण्य ही अवस्था यात अधिक महत्त्वाची आहे. ही ध्येयवादाची अवस्थादेखील म्हटली जाते.
लहानपणी आपल्याला हमखास प्रश्न विचारले जातात. त्यातील ठरलेला प्रश्न म्हणजे, "तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे?" तेव्हा आपण माहितीच्या आधारे किंवा पाठ्यपुस्तकात वाचलेल्या एखाद्या धड्याचा आधार घेत उतर देतो. पण युवावस्थेतच या प्रश्नाचे खरे उत्तर दडलेले आहे. आपल्याला अनेक वाटा तेव्हा दिसत असतात. मन द्विधा अवस्थेत असते. अशावेळी योग्य मार्गदर्शन मिळाले म्हणजे वाट निश्चित होते किंवा योग्य विचार केल्यास वाट ठरविता येते. पण मार्गदर्शनाबरोबरच संगतीलाही अधिक महत्त्व आहे. कारण, आपण परिपक्व नसतानाही आहोत, असेच या वयात आपल्याला वाटत असते. त्यामुळे माझी संगत, माझे वागणे, माझे वर्तन योग्यच आहे, असे वाटत असते. त्या योग्या-अयोग्याची ओळख व्हावी याकरिता कितीतरी मार्ग उपलब्ध असतात, कितीतरी गोष्टी करण्यासारख्या असतात. वाचन, चिंतन, मनन आणि श्रवण या गोष्टी युवावर्गाने रोज कराव्यात. व्यायाम , मैत्री, प्रेम, ध्येयवाद, आपले सामाजिक स्थान, महाविद्यालयीन शिक्षण, अभ्यास, अवांतर विषय, भावभावना या सर्वांची सांगड घालायची ती युवावस्थेतच!
पण आजचा युवा वेगळा आहे. शारीरिक गरजांबरोबरच त्याच्या बुद्धीशी संबंधित गरजा आणि मानसिक गरजा झपाट्याने वाढत आहेत. त्या गरजा पूर्ण होतील किंवा निदान त्या सर्वच गरजांची तीव्रता कमी होईल अशी साधने असूनही साधन निवडीच्या ज्ञानाचा आजच्या युवावर्गाकडे बऱ्यापैकी अभाव आढळतो. अगदी साधेच उदाहरण म्हणजे एखादा प्रश्न पडला की लगेचच इंटरनेटच्या माध्यमातून त्याचे उत्तर शोधले जाते. मिळालेले उत्तर संबंधित क्रियेस अनुसरून असले तर ते लागू पडते. पण उत्तर अयोग्य मिळाले तर त्याचे होणारे परिणाम अधिक नुकसान करणारे असतात. ते उत्तर योग्य आहे का याविषयी संवाद गरजेचा असतो. तो साधताना अनेक अडचणी युवावर्गाला येतात. फक्त रोज संदेश पाठविणाराच आपला मित्र आहे, असा समज झालेला आहे. प्रेमाच्या प्रांतात युवावर्ग आधुनिक किंवा अधिक पुरातन विचार अशा टोकाच्या अवस्थेकडे जात आहे.
यातूनच गुन्हेगारीकडे युवावर्ग ओढला जात आहे. कार्यवाह आणि कार्यकर्ता यातला फरक ओळखता न आल्याने समोरची व्यक्ती ही विरोधी नसून आपली शत्रू आहे अशीच धारणा राजकीय क्षेत्रातील युवावर्गाची झाली आहे. युवा पत्रकारितेचे क्षेत्र केवळ बातम्या मिळवण्यात व्यस्त असलेले तर युवा संपादक जाहिरातींचे धनादेश गोळा करण्यात व्यस्त आहेत. अर्थात सर्वच क्षेत्रांत वाढत्या स्पर्धेबरोबच वाढती घाई देखील असल्याचे जाणवते. या स्पर्धेपेक्षा घाईतच आजचा युवा सहभाग घेत आहे. याला सरसकट आधुनिक साधने जबाबदार नाहीत. तर, जबाबदार आहे समाज आणि युवा यातील खुंटलेला सहज संवाद ! या हरवलेल्या संवादामुळे आजचा युवा दिशाहीन होत असल्याचे जाणवते. त्यामुळे समाजाने युवावर्गाशी संवाद साधणे आणि युवावर्गाने समाजाशी जुळवून घेतले तरच तो समाजाचा एक घटक म्हणून अस्तित्वात राहील. व्यसन नव्हे तर वाचन, संस्कार, विवेक आणि मुख्य म्हणजे संवाद यांनी प्रश्न सहज सुटतात, हे एकदा समजून घेतले म्हणजे आजचा युवा सहज माणसात म्हणजेच समाजात मिसळू लागेल.
व्यक्तिमत्वाचा संबंध अंतर्बाह्य असतो, हे आजचा युवावर्ग विसरत आहे. केवळ बाह्य सौंदर्यात गुंतलेल्या आजच्या युवावर्गाने अंतर्मनातून विचार केला म्हणजे आपोआपच ध्येयवाद समजून घेणे सहज शक्य होईल. हे वय मौजमजा करण्याचे असते. त्यामुळे समाजाने काही गोष्टी समजून घेणे हे देखील गरजेचे आहे. समाजापासून तुटत चाललेली नाळ, तुटत चाललेले नाते पुन्हा जोडायला हवे. म्हणजे आपोआपच राष्ट्रीय प्रगतीत खऱ्या अर्थाने, प्रत्यक्ष कृतीतून आजचा युवा सहभाग घेईल...
- गौरव भिडे