गोस्वामी तुलसीदास

युवा विवेक    07-Aug-2025
Total Views |

गोस्वामी तुलसीदास 
गोस्वामी तुळशीदास हे हिंदी साहित्यातील एक महान संत, कवी, आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म इ.स. १५३२ साली उत्तर प्रदेशातील राजापूर गावात झाला. त्यांच्या बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांचे बालपण खूप हालाखीचे गेले. पण त्यांनी आपल्या दुःखांतून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला आणि आपल्या आयुष्याला एक दिव्य दिशा दिली. तुळशीदास हे श्रीरामाचे परमभक्त होते. त्यांच्या लेखणीतून रामभक्तीचा सागरच अवतरला. त्यांनी "रामचरितमानस" हे महाकाव्य अवधी भाषेत लिहिले, जे आजही उत्तर भारतातील लोकांच्या हृदयात स्थान करून आहे. वाल्मिकी रामायणावर आधारित हे काव्य रामाच्या जीवनाचा सार आहे. त्यामध्ये भक्ती, धर्म, नीती आणि मानवता यांचा सुंदर संगम दिसतो. तुळशीदासांनी केवळ रामचरितमानसच नाही तर हनुमान चालिसा, विनयपत्रिका, कवितावली, दोहावली, रामललानहचू आणि अनेक भक्तिगीतांची रचना केली. त्यांच्या रचनांमध्ये साधेपणा, आत्मिक भाव असलेला अर्थ दिसतो. सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी उच्च तत्त्वज्ञान मांडले, हे त्यांचे विशेष गुण आहेत.
 
तुळशीदासांचा काळ समाजात अंधश्रद्धा, जातीभेद आणि आडपडदा यांचा होता. पण त्यांनी आपल्या लिखाणातून समाजाला प्रेम,भक्ती यांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या रचनांनी लोकांना सत्कर्म आणि सद्विचारांकडे वळवले. त्यांनी राम आणि हनुमानाच्या माध्यमातून आदर्श जीवनाचे मार्गदर्शन दिले. गोस्वामी तुळशीदास यांनी "राम" या शब्दाला फक्त एक देव न मानता, जीवनमूल्यांचे प्रतीक मानले. त्यांचा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीच्या मनात राम असतो आणि त्याला जागवण्याची गरज आहे. त्यांची कविता आजही लोकांमध्ये श्रद्धेने वाचली जाते, आणि भक्तिभावनेने गायली जाते. इ.स. १६२३ मध्ये तुळशीदासांचे निधन झाले. पण त्यांच्या रचनांमधून ते आजही आपल्या मनात, मंदिरात आणि प्रत्येक रामभक्ताच्या ओठांवर जिवंत आहेत.
 
गुरुप्रसाद सुरवसे