स्वातंत्र्य: माझा दृष्टिकोन

15 Sep 2025 14:52:18

स्वातंत्र्य: माझा दृष्टिकोन 
मानवजातीच्या इतिहासात स्वातंत्र्य या संकल्पनेला सर्वाधिक महत्त्व आहे. गुलामीत किंवा बंधनात अडकलेला मनुष्य कधीही आपल्या पूर्ण क्षमतेने फुलू शकत नाही. भारताने शतकानुशतके परकीय सत्तेविरुद्ध झगडून स्वातंत्र्य प्राप्त केले. आज आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ राजकीय मर्यादेतले नसून सामाजिक, वैचारिक आणि वैयक्तिक स्तरावर देखील किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येकाने जाणून घ्यायला हवे. माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तेपासून मुक्त होणे नाही, तर निर्भयपणे विचार मांडण्याचे, योग्य ते करण्याचे आणि आपली ओळख जपण्याचे सामर्थ्य आहे. खरी स्वातंत्र्यप्राप्ती म्हणजे जबाबदारीची जाणीव होय. आपण स्वतंत्र आहोत म्हणजे आपल्या कृतींवर कुणाचं बंधन नाही, पण त्याचवेळी आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागते. आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. आपण विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी अशा अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. पण अजूनही अनेक ठिकाणी अंधश्रद्धा, दारिद्र्य, अशिक्षितपणा, स्त्री-पुरुष असमानता ही सामाजिक बंधने आपल्याला जखडून ठेवतात. माझ्या मते या सगळ्यांतून मुक्त होणे म्हणजेच खरी स्वातंत्र्यप्राप्ती.
वैयक्तिक जीवनातही स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी आहे. आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता येणे, करिअर निवडता येणे, विचार मांडता येणे, तसेच स्वतःचा जीवनमार्ग ठरवता येणे हे सगळं माझ्या दृष्टीने स्वातंत्र्य आहे. परंतु हे स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे. माझ्या स्वातंत्र्याने दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू नये, ही जाणीव नेहमीच ठेवावी लागते. राजकीय स्तरावर स्वातंत्र्य म्हणजे लोकशाहीची फळे प्रत्येकापर्यंत पोहोचणे. मतदानाचा अधिकार वापरणे, शासनाविषयी मत व्यक्त करणे, तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे या सगळ्या गोष्टी लोकशाहीतल्या नागरिकाचे कर्तव्य आणि अधिकार आहेत. जर आपणच निष्क्रिय राहिलो तर स्वातंत्र्याचा खरा अर्थ हरवतो. माझ्या दृष्टिकोनातून, स्वातंत्र्य म्हणजे समतेची भावना. जात, धर्म, भाषा, प्रदेश यांच्या आधारे भेदभाव न होता प्रत्येकाला समान वागणूक मिळणे हेच खरे स्वातंत्र्य आहे. एखाद्या तरुणाला त्याच्या कुटुंबाची आणि समाजाची परवानगी न मागता आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य असणे महत्त्वाचे आहे. तसेच स्त्रियांना पुरुषांप्रमाणे सर्व क्षेत्रांत समान संधी मिळणे हीसुद्धा खरी स्वतंत्रतेची पायरी आहे. आजच्या पिढीसमोर माहितीचा महासागर आहे. सोशल मीडियावर आपले मत मांडणे, नव्या कल्पना राबवणे, जगाशी जोडलेले राहणे हे सगळं स्वतंत्रतेमुळेच शक्य झाले आहे. पण याच वेळी चुकीची माहिती, द्वेषपूर्ण विचार पसरवणे हेही त्याचे नकारात्मक रूप आहे. त्यामुळे जबाबदारीने स्वातंत्र्य वापरणे हाच योग्य मार्ग आहे.
 
गुरुप्रसाद सुरवसे 
Powered By Sangraha 9.0