एक आदर्श गाव

16 Jan 2026 15:42:43
 
एक इनाम
सुंदरनगरी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं. अवतीभवती सुंदर अशी निसर्गसृष्टी, प्राणी, पक्षी, नदी अगदी निसर्गाची किमयाच भासायची. चहू बाजूला निसर्ग आपल्या विविध अंगांनी त्या गावाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवत असे, म्हणूनच का की त्या नगरीचे नाव 'सुंदरनगरी' असावं. त्या गावची सारी माणसे देखील सोन्यासारखी, त्यांच्या माणुसकीची दाद द्यावी तेवढी कमी. एखाद्याच्या घरी काही अडचण असेल तर अख्खा गाव त्या व्यक्तीला विविध स्वरूपात मदतीचा हात पुढे करत असत. गावचा गाव-गाडा एकदम सुरळीत व एकमताने चालत असे. एखादी समस्या असेल तर सर्वांचा त्यास सोडवण्याचा प्रयत्न असे. त्या सुंदर नगरीचा दिवस सकाळी पहाटे पाच ला सुरू होत असे. जसा दिवस सुरू होत असे लगेच कोंबडा आरवत असे मग अंगणात झोपलेली वयस्क मंडळी तांबडे फुटलं पहाट झाली आता उठूया आंघोळ करून देवदर्शनासाठी निघावं असा त्यांचा सकाळचा नित्यक्रम पूर्ण करीत असत.  हळूहळू तरुण मंडळी कामाच्या व शेतात म्हणून गडबडीने उठायची. घरातील लहान मुले शाळेला जायचं म्हणून गडबड करायची. तव्यावर सकाळी पहिली भाकरी पडते तोच गावातील प्रत्येक घरात शाळेत सकाळच्या न्याहारी साठी सारी शाळकरी मुल एकत्र जमायची एकदा का मुलं शाळेत गेली आणि घरचे पुरुष आपापल्या कामाला गेले की मग घरातील बायका दळण, कांडप, आवरा-आवर करीत. सायंकाळ झाली की पक्षी आपल्या पिंजऱ्यात, गाई आपल्या गोठ्यात, व शाळकरी मुलं व कामासाठी बाहेर पडलेली मंडळी घरी परतायची. मग थोड्या वेळाने वडील घरी यायच्या आत मुलं धाकांनं अभ्यासाला बसायची. जो काही शाळेतल्या बाईंनी गृहपाठ दिला असेल तो पूर्ण करायची कधी 'अ' ,'आ', 'इ ' ', ई' तर कधी अंकगणित किंवा मग पाढे बे एके बे असा काहीतरी गृहपाठ असे. जसं जसं वरच्या वर्गात प्रवेश होत असायचा तसा तसा गृहपाठ वाढत जात असे असे. संपूर्ण सुंदर नगर या गावात एकच शाळा होती ज्यात बालवाडी मग पहिली ते पाचवी आणि उच्च माध्यमिक सहावी ते दहावी याच शाळेत संपूर्ण शाळेतील मुलं शिकत असत रात्री घरातील पुरुष मंडळी घरी आली की घरातील सर्वजण एकत्र जेवायला बसत. जेवत असताना प्रत्येक घरात प्रत्येक जण आपापल्या दिवसभराच्या मेहनतीचे सुखाचे दोन घास अगदी साधं जेवण पण तेही समाधानाने व आनंदाने खात असत. रात्री कधी कधी सर्व गावकरी मंडळी सुंदरनगरीत असलेल्या गावच्या वडाच्या पारावर तिथे अनेक चर्चा सर्व गावकरी मिळून करायचे. गावाबाबतचे अनेक निर्णय तिथेच घेतले जायचे, गावचे ज्येष्ठमंडळी, लहान-मोठे सुशिक्षित सर्वजणांना आपलं मत मांडण्याची संधी व उपाय सुचवण्याचे स्वातंत्र्य असे. असं हे गाव आदर्श होतं 'सुंदरनगर.' सर्व काही अलबेल असताना एक दिवस अचानक गावात एक समस्या उद्भवली. आता एवढ्या आदर्श आणि सर्वच दृष्टीने परिपूर्ण अशा गावात काय बरं नेमकी समस्या उद्भवली असेल? तर एके दिवशी अचानक गावभर एक बातमी पसरू लागली की, "आपल्या गावाला इनाम मिळणार", "आपल्या गावाला इनाम मिळणार". गावातील एका वृद्ध आजोबा यांचे नाव कोंडीबा त्यांना कोंडीबा तात्या म्हणून अख्खा गाव ओळखत असे व गावातला एक खबरी ज्याला गावातलं सगळं काही माहित असायचं, गावच्या प्रत्येक छोट्या न छोट्या गोष्टीत त्याचा सहभाग असायचा त्याचं नाव 'रामू'. रामूला तात्यानं विचारलं "काय रे रामू ,कसला इनाम" ? रामूनं सांगितलं "अरे तात्या ते आपलं गाव लय आदर्श आणि सर्वगुण संपन्न हाय ना म्हणून आपल्या गावाला इनाम देणारे म्हणे ". तात्या व रामू दोघेही खुश होते आणि गावात सर्वत्र चर्चा करत होते. या चर्चेला उधाण आल्याने सरपंचांनी लगेच सर्व गावकऱ्यांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच वडापाशी बोलावलं व लगेच हा इनाम नक्की आहे तरी काय व कशासाठी मिळणार ते सांगणार होते. पाहता-पाहता अख्खा गाव वडाच्या झाडापाशी आला सरपंचांनी माहिती सांगण्यास सुरुवात केली, तर गावातील सर्व मंडळी ही जवळपास 80 टक्के लोक अशिक्षित व फारफार तर क्वचितच लोक चौथी ते पाचवी पर्यंत शिक्षित होते . गावातील 20% जी तरुण मंडळी होती ती दहावीपर्यंत शिक्षित होती. यासाठी सरपंचांनी इनाम कशासाठी देणार आहेत व अट काय आहे हे सांगायला सुरुवात केली. "गावकऱ्यांनो आपलं गाव जरी सर्वार्थाने परिपूर्ण असलं तरी, हा जो इनाम आहे त्यात एक अट आहे की आपल्या सर्व गावकरी मंडळींनी किमान मराठी वाचता, लिहिता, आपलं नाव आणि स्वाक्षरी करता येईल एवढे तरी शिक्षण घेतलेलं असावं ". सरपंचांचं बोलणं संपताच सर्व गावकरी चर्चा करू लागले सर्वत्र गोंधळ उडाला. आता काय बरं करावं? आपल्यापैकी तर कोणालाच धड बाराखडीची पुसटशी ओळख पण नाहीये. असा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला. सरपंचांना देखील कळेना की आता उद्या जर आदर्श गावच्या यादीत आपलं गाव तर, पहिल्या क्रमांकावर आहे पण जर का त्यांनी येऊन तपासणी केली तर आपला इनाम जातोय की काय असा मोठा प्रश्न समोर उभा होता. मग इनाम नाही मिळाला तर गावचा विकास होणार नाही अशा सगळ्या प्रश्नांनी सरपंच ज्येष्ठ मंडळी सर्वजण भांबावून गेले. कुणाला काहीच कळेना अशी परिस्थिती निर्माण झाली असताच मग अचानक एक तरुण उठला त्याचे नाव 'शंकर'.  तो नुकताच शहरातून पदवीचं शिक्षण घेऊन आलेला. तो गावात सर्वात अधिक शिक्षित आणि पहिला पदवीधर तरुण होता. त्याने सर्वांना शांत बसण्याची विनंती केली आणि म्हणाला, "थांबा माझ्याकडे आहे एक उपाय". असं म्हटल्याबरोबर सर्वजणांच्या चेहऱ्यावर कुतूहल आलं. " काय आहे सांग लवकर",  सर्वजण म्हणाले. तो म्हणाला "उपाय आहे रात्र -शाळा ". "रात्र -शाळा ते काय असतं?  कंदी ऐकलं नाही " सर्वजण म्हणाले. "थांबा सांगतो मी" शंकर म्हणाला, या "रात्रशाळेत आपल्या सुंदर नगर सारख्या ग्रामीण भागातील लोकांना साक्षरतेचे धडे देतात त्यांना साक्षर बनवतात, त्यांना त्यांची स्वतःची किमान सही तरी करता आली पाहिजे." "अरे, वा!" सरपंच म्हणाले "पण या शाळा घेईल तरी कोण ? " " गावातील सर्व पाचवी इयत्तेच्या पुढील वर्गातील असणारे विद्यार्थी''. "इतकं सोपं आहे होय? " सरपंच म्हणाले. "का नाही ? कारण पाचवीच्या पुढील कोणत्याही विद्यार्थ्याला लिहायला वाचायला नक्कीच येत असतं तेव्हा आपणही रात्र शाळा रात्री आठ ते दहा पर्यंत ठेवू आपल्या गावातील शाळेत सर्वांनी उद्यापासून त्या शाळेत काहीही कारण न देता यायचे". गावकऱ्यांनी शंकरच्या बोलण्याशी एकमत दर्शवलं. मग गावातील सरपंच आणि गावकऱ्यांनी हे प्रौढ शिक्षणाचे वर्ग राबविण्याचा वसा घेतला, गावातील विद्यार्थी आणि थोडेफार शिक्षित तरुण-तरुणी हे प्रौढ शिक्षणाचे धडे गावकऱ्यांना देऊ लागले. लोकांना शिक्षणाची खूपच गोडी लागली. रात्रीचे जेवण आटोपून सर्व गावकरी, प्रौढ मंडळी रात्र शाळेत शिक्षण घेण्यासाठी आवडीने येऊ लागली. गावातील लोक शिक्षित आणि साक्षर होऊ लागल्याने 'साक्षर जनता भूषण' या इनामाचे मानकरी सुंदरनगरकरच होतील असं वाटू लागलं. त्याबरोबर 'स्वच्छ गाव सुंदर गाव' ही संकल्पना देखील रात्र शाळेतूनच गावकऱ्यांनी अमलात आणली. गावातील लोक गाव स्वच्छ ठेवू लागली, आपापल्या गावाची जिम्मेदारी आपल्या गावकरी मंडळींचीच असते, म्हणून आपले गाव सुंदर व स्वच्छ बनवण्याचा प्रत्येक जण कसोशिने प्रयत्न करीत होता. हळूहळू सर्वांना वाचता व लिहिता येऊ लागलं. सर्वांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि स्वतःवरचा आत्मविश्वास वाढू लागला. अशा अनेक सकारात्मक गोष्टी या रात्र शाळेमुळे गावकऱ्यांना अनुभवायला मिळत होत्या. जवळपास एक महिना ही रात्र शाळा चालू होती. सर्वांनी शिक्षणाचा ध्यास घेतला होता जणू . अचानक गावातील वेशीपाशी असणाऱ्या वर्तमानपत्र विक्रेत्याकडे पाहता-पाहता वाचकांची गर्दी होऊ लागली. हे असे अनेक चांगले बदल होऊ लागले. या सर्व गोष्टींची नोंद 'साक्षर जनता भूषण' या संस्थेने घेतली व गावाची पाहणी तसेच तपासणी करण्याकरिता येणार असे पत्र पाठवले. गावातील सर्वजण अगदी उत्सुकतेने या दिवसाची वाट पाहू लागले. पाहता-पाहता तो दिवस आला. सर्व मंडळी अगदी उत्सुकतेने एकत्रित आले.
मग सकाळी सुमारे नऊ वाजता दोन पांढऱ्याशुभ्र गाड्या गावाच्या दिशेने येताच, खालच्या अळीच्या 'यशाने' पाहिलं व सर्व गावात ती इनाम वाली मंडळी आली, असं म्हणत गावभर बातमी पसरवली. तसं-तसं हातात आहे ते काम सोडून सर्व वृद्ध, तरुण, बायका, मुले सर्वजण लगबगिने वडाच्या पाराजवळ येऊन थांबली. तोच गाडीतून सूट-बूट घातलेले अधिकारी, त्याचबरोबर त्यांचा सहकारी वृंद या सर्वांनी गावात हजेरी लावली होती. लगेच गावातील सरपंचांनी अगदी मनापासून त्यांचे स्वागत केले. अधिकारी आपल्या खुर्चीतून उठले व सर्वांशी बोलण्याकरिता समोर आले तोच सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले व त्यानंतर अधिकाऱ्यांनी इनाम किती आहे व एक आनंदाची बातमी सांगितली. माहिती सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले "आम्ही दर पाच वर्षांनी हा पुरस्कार व त्याचबरोबर मोठी अशी रक्कम आमच्या संस्थेतर्फे दर पाच वर्षात, प्रत्येक जिल्ह्यातील आदर्श गाव निवडत असतो. यंदा हा उपक्रम तुमच्या जिल्ह्यात करायचा असा निर्णय आमच्या संस्थेने घेतला आहे. तेव्हा मी आणि माझे सहकारी वर्ग सर्व गावाची पाहणी करण्याकरिता आलो आहोत . आम्ही पाच गावांपैकी फक्त एकाच गावाला ही रक्कम देत असतो. आमच्या सर्व नियम व अटीत जर हे गाव परिपूर्ण आदर्श असेल तरच आम्ही ही रक्कम हा इनाम त्या गावाला देत असतो. आणि आता आम्ही तुम्हा सर्वांची छोटीशी तपासणी घेणार आहोत. प्रत्येकानी आपापले नाव व सही एका कागदावर कोणाचीही मदत न घेता करायची आहे आणि प्रत्येकाने एक-एक वाक्य का होईना वाचून दाखवायचे आहे." अशी सर्व माहिती ऐकून गावातील मंडळी अगदी उत्साहाने आपापलं स्वतःची नावे दिलेल्या कागदावर लिहिली व प्रत्येकाने एकेक वाक्य वाचायला सुरुवात केली. हे पाहून अधिकाऱ्यांना व समस्त गावाला सर्वांचा अभिमान वाटू लागला. अगदी ज्येष्ठ आणि वृद्ध सुद्धा या अभियानात सहभागी झालेत हे पाहून अधिकारी मंडळी भलतीच खुश झाली होती. एकही व्यक्ती आता या गावातील निरक्षर म्हणून ओळखला जाणार नाही अशी सर्वांना ग्वाही होती. ह्या रात्र शाळेच्या उपक्रमाबद्दल सरपंचांनी जेव्हा अधिकाऱ्यांना सांगितलं तेव्हा शंकरचे त्यांनी अगदी मनापासून कौतुक केले. अख्या गावाला शंकर च्या उपायामुळे वाचता लिहिता आलं म्हणून त्याचा सत्कार देखील करण्यात आला. जेव्हा अधिकाऱ्यांना समजलं की हे गाव फक्त साक्षरच नाही तर स्वच्छता अभियान पण राबवतं, हे पाहून त्यांनी सर्व नियम व अटीनुसार हेच 'सुंदरनगर' यावर्षी इनाम देण्यास पात्र आहे ठरवलं व त्यांनी ही खुशखबर अख्या गावासमोर सांगितली .
गावातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरील आनंद अगदी ओसंडून वाहू लागला. अधिकाऱ्यांनी एक ते दीड कोटी चा इनाम गावाला देऊ केला आणि सर्व गावकऱ्यांनी आपल्या गावाच्या संपूर्ण विकास कामासाठी हा इनाम वापरायचा असे ठरवले. गावात अनेक सोयी-सुविधा, शाळा, पाणपोई अशा अनेक कामांसाठी हा इनाम वापरला गेला. गावच्या नावाप्रमाणे खरंच 'सुंदरनगर' आता सर्वार्थाने सुंदर गाव बनलं होतं!
 
शांभवी जगदीश
Powered By Sangraha 9.0