Primary tabs

'...घाणेकर' आणि 'नाळ' ठरत आहेत वरचढ

share on:

मुंबई : हिंदी चित्रपटांना नेहमी मराठी चित्रपटांपेक्षा जास्त स्क्रीन्स मिळतात. या दिवाळीनंतर मात्र काहीसे उलटे चित्र पहायला मिळाले. दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या अमिताभ बच्चन आणि आमिर खानच्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ला देशभरात १०००हून जास्त स्क्रीन मिळाल्या होत्या. पण दिवाळीचे ४ दिवस संपल्यानंतर मात्र या चित्रपटाला गर्दी कमी होताना दिसली. या सोबत प्रदर्शित झालेला '... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा प्रेक्षकांच्या पसंतीस खरा उतरला.

एरवी मराठी चित्रपटांना प्रेक्षक येतच नाहीत अशी बोंब करणाऱ्यांना सिनेमागृहांबाहेर लागलेल्या 'हाऊसफुल्ल'च्या बोर्डने चांगलेच उत्तर दिले. त्यानंतर आलेल्या 'नाळ'ने सध्या महाराष्ट्रातील सर्व सिनेमागृह मराठीमय करून टाकले आहे. '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' आणि 'नाळ'या चित्रपटांमुळे मराठी सिनेमाला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणाले तर वावगे ठरणार नाही.

कमाईतही सरस '... घाणेकर'

'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' प्रदर्शित झाला तेव्हा त्याचे तिकीट बारीवरचे दर हजारोंच्या घरात होते. त्यावर त्यांनी पहिल्या दिवसात ५० कोटींचा एकदा गाठला पण नंतर 'ठग्ज..' प्रेक्षकांच्या मनात जास्त तग धरू शकला नाही. ३०० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट आत्तापर्यंत जेमतेम १०० कोटींपर्यंत पोहचला असेल. त्याउलट खरी कमाल केली ती '... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'नी. चित्रपटाचे बजेट ५० लाख एवढे असताना पहिल्याच दिवसात त्यांनी ४० लाखांची कमाई केली आणि तेही १००-३००च्या तिकीट दरांमध्ये. मराठी प्रेक्षकांसोबतच अमराठी प्रेक्षकांनीदेखील '... आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' पाहणे पसंत केले. १० दिवसांनंतर या चित्रपटाने ५ कोटींचा आकडा पार केला आहे.

सुबोधने मानले प्रेक्षकांचे आभार

'...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'ची वाढती लोकप्रियता आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद यामुळे या चित्रपटाला महाराष्ट्रसहीत देशभरात ६००० शो मिळाले आहेत अशी माहिती सुबोध भावेने ट्विटरवरून दिली. याचे श्रेय त्याने प्रेक्षकांना दिले. 

'नाळ'ने चालवला '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर'चा वारसा

१६ नोव्हेंबर रोजी नागराज मंजुळेंचा 'नाळ' ही प्रदर्शित झाला. सुरुवातीला त्याला ३०० स्क्रीन्स मिळाले. हा चित्रपटही लोकांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर या चित्रपटाला ४०० स्क्रीन्स मिळाल्या. ३ दिवसात या चित्रपटाने २.५ कोटींचा आकडा पार केला आहे. पहिल्या आठवड्यात हाही चित्रपट चांगली कामे करेल अशी आशा आहे.

- content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response