Primary tabs

हुतात्मा शिरीषकुमार

share on:

इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून आपल्या देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली आहे. नंदुरबारचे असेच पाच क्रांतिकारक बाल वयातच शहीद झाले. त्यांच्यातील शिरीषकुमार मेहता यांचा आज जन्मदिवस.  त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या शौर्याची गाथा...

व्यापाऱ्यांची वसाहत म्हणून ओळख असणाऱ्या नंदुरबार मध्ये २८ डिसेंबर १९२६ रोजी एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. या काळात देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील वातावरण देखील स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारले होते. सर्वसामान्य लोकही यात मागे नव्हते. त्यांनी हाती तिरंगा घेवून प्रभात फेऱ्या, मशाल मोर्चे काढायला सुरुवात केली होती. यात लहान मुले देखील मागे नव्हती. बाल शिरीषकुमारांवर महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव होता. १९२४ साली महात्मा गांधीजींनी इग्रजांना ‘चलेजाव’चा आदेश दिला. तेव्हापासून गावोगावी इंग्रजांविरुद्ध प्रभातफेऱ्या निघू लागल्या. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात 'वंदेमातरम् आणि 'भारत माता कि जय' अशा घोषणा देणाऱ्या कोणालाही पोलीस ताब्यात घेत होते.

याचदरम्यान नंदुरबार मध्ये ९ सप्टेंबर १९४२ रोजी इग्रजांना ‘चले जाव'चा आदेश देणारी प्रभात फेरी निघाली होती. या फेरीत आठवीत शिकणारा शिरीषकुमार मेहता आणि त्यांच्या मित्रांनी सहभाग घेतला होता. गुजराती मातृभाषा असणाऱ्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरु केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. अशाच भारत मातेचा जयघोष करणाऱ्या घोषणा देत फेरी गावातील मुख्य चौकात पोहोचली असता, पोलिसांनी फेरी अडवली. शिरीषकुमार हातात झेंडा घेऊन सर्वात पुढे उभा होते. पोलिसांनी त्याच क्षणी फेरी विसर्जित करायला सांगितली. पण सर्व बालमित्रांनी पोलिसांचे आवाहन झुगारून देत, भारत माता की जय, वंदे मातरम् सारख्या घोषणा चालूच ठेवल्या. शेवटी पोलिसांनी गोळीबार सुरु केला. सहभागी मुलींच्या गटातील एका मुलीवर बंदूक ताणली असता, एक चुणचुणीत मुलाने पुढे येत पोलिसांना सुनावले, "गोळी मारायची असेल, तर मला मारा". देशभक्तीने भारावलेला तो मुलगा होता ‘शिरीषकुमार’. एक छोटासा मुलगा आपल्याला एवढ सुनावतो आहे, या रागाने संतापलेल्या पोलीस अधिकाऱ्याने शिरीषकुमारच्या छातीत एक, दोन नव्हे तर सलग तीन गोळ्या झाडल्या. शिरीषकुमार जागेवरच कोसळला, मात्र हातातला झेंडा त्यानी सोडला नाही. त्याच्यासोबत लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे चारजणही शहीद झाले. शिरीषकुमार आणि त्याच्या चार मित्रांनी न घाबरता इंग्रजांच्या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळ्यांचा सामना केला. यात त्यांचे प्राण गेले पण शेवटपर्यंत ते इंग्रजांविरुद्ध घोषणा देतंच होते. 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या बाल शहीद शिरीषकुमार आणि त्याच्या चार साथीदार शहीद मित्रांना विनम्र अभिवादन!

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response