Primary tabs

जागतिक ब्रेल दिवस विशेष

share on:

आज जागतिक ब्रेल दिवस. अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचता येईल अशी लिपी तयार करणाऱ्या  फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक आणि शिक्षक म्हणून ओळख असलेल्या लुई ब्रेल यांचा जन्मदिवस. त्यांच्या सन्मानार्थ ४ जानेवारी हा दिवस 'जागतिक ब्रेल दिवस' म्हणून साजरा केला जातो. ज्या ब्रेल लिपीने लुई यांना अजरामर केले त्या ब्रेल लिपीच्या आणि तिच्या जन्मदात्याच्या जीवनावर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी, फ्रान्समधील कुपव्रे या खेडे गावात एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील सायमन-रेने ब्रेल हे कातडी माल तयार करणारे कारागीर होते. त्यांच्या आईचे नाव मोनीक बॅरन. लुई यांच्या वडिलांची स्वत:ची कार्यशाळा होती. त्याठिकाणी ते दिवसभर काम करण्यात व्यस्त असत. लुई पूर्णवेळ वडिलांसोबत कार्यशाळेत असायचे. घरात सगळ्यात लहान असल्याने आणि एकटा मुलगा असल्याने ते सर्वांचे लाडके होते.

वडील काम करत असताना लुई आवर्जून लक्ष देवून त्यांच्या वडिलांचे काम बघायचे आणि तसं करण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे तीन वर्षाच्या लुईवर वडिलांना सतत लक्ष ठेवाव लागत असे. एक दिवस लुईचे वडील कोणाशीतरी बोलत बोलत कार्यशाळेबाहेर गेले असता, तेवढ्यात लुईने वडिलांचे अनुकरण करण्यासाठी एक आरी उचलली आणि चुकून ती आरी त्यांच्या एका डोळ्यात घुसली. ते जागेवरच चक्कर येवून पडले. बऱ्याच उपचारानंतर त्यांना थोडा आराम मिळाला. परंतु त्यातून त्यांच्या डोळ्याला संसर्ग झाला होता. आणि म्हणून एका वर्षात त्यांचे दोन्हीही डोळे निकामी होऊन त्यांना कायमचे अंधत्व आले.

लुई ब्रेल यांना त्यांच्या पालकांनी नेहमी प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांना जगण्यासाठी बळ मिळत होते. वास आणि स्पर्शाच्या आधारे ते अनेक गोष्टी ओळखू शकत होते आणि स्वत:ची कामे करू शकत होते.

१८१६ च्या सुमारास लुई ब्रेल यांच्या गावी ऍबे जाक पॅलुय नावाचे एक पाद्री आले होते. त्यांनी लुईला शिक्षण द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तूंचा परिचय करून दिला. तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरु केले. नंतर गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत लुईला पाठवण्यात आले. फक्त श्रवणाच्या जोरावर त्याने चांगलीच प्रगती केली होती. नंतर ऍबे जाक पॅलुय यांच्या मदतीने पॅरीस येथील इन्स्टिट्युशन रोयाल्स देस जून्स ऍव्युग्लेस या शाळेत लुईचे नाव घातले.

सहा वर्षातच लुईने सर्व अभ्यासक्रम पूर्ण करून त्याच शाळेत स्वयंसेवक शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ते शिकत असताना फ्रान्सच्या एका अधिकाऱ्याच्या व्याख्यानातून त्यांना 'नाईट रायटिंग आणि 'सोनोग्राफी' या लिपीबद्दल माहिती मिळाली. या लिपीमध्ये १२ बिंदूंचा वापर असून ते ६-६ करून दोन ओळीत ठेवलेले असायचे. परंतु यात कोणत्याही गणितीय संख्या  किंवा चिन्हांचा वापर नव्हता. याच लिपीवर आधारित लुई यांनी १२ ऐवजी ६ बिंदुंचा उपयोग करून ६४ अक्षरे आणि चिन्ह असलेली ब्रेल लिपी १८२१ मध्ये तयार केली. तेव्हा ते फक्त १५ वर्षाचे होते.वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी हे असामान्य काम करून लुई हे केवळ स्वतःचेच नव्हे तर जगातील सर्व अंधांचे कल्याणकर्ते झाले. त्यांच्या नावावरूनच त्या लिपीला ब्रेल असे नाव देण्यात आले. त्यांच्या या असामान्य कर्तृत्वाचे स्मरण कायम रहावे म्हणून आणि ४ जानेवारी हा दिवस ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो.

- युवाविवेक 

content@yuvavivek.com

 

      

लेखक: 

No comment

Leave a Response