Primary tabs

'केवडा': हृदयस्पर्शी लघुपट

share on:

अमेय बेकनाळकर दिग्दर्शित ‘केवडा’ हा लघुपट ज्येष्ठ नागरिकांच्या एकटेपणावर नेमकेपणाने भाष्य करतो. शिवाय या लघुपटात आजी आणि नातवामधलं प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचं नातं दाखवलं आहे. आजी नातुच्या हलक्या फुलक्या विनोदी संवादातून गंभीर विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

सासू-सुनेचं पटत नाही म्हणून बऱ्याचदा घरातील ज्येष्ठ लोकांवरती वेगळं राहण्याची वेळ येते. यामध्ये मोठी माणसे आपल्या सोयीनुसार वेगळी राहतात, पण मुले मात्र आपल्या आजी आजोबांपासून कायमचीच दुरावतात. ‘केवडा’ या लघुपटात हेच वास्तव मांडलंं आहे. सून आणि मुलासोबत पटत नाही म्हणून आजी एकटीच वेगळी राहत असते. तिच्या सोबतीला असतात त्या तिच्या काही जुन्या वस्तू आणि आयुष्यभराच्या आठवणी. ही म्हातारी माणसे आठवणीतच स्वत:ला शोधत असतात आणि आपला वेळ घालवत असतात. 

तसंच आताची तरुण पिढी इंटरनेट आणि मोबाईलशिवाय थोडावेळ सुद्धा शांत बसू शकत नाही. तंत्रज्ञानाने यांंचं विश्व व्यापून टाकलं आहे. तसं पाहायला गेलं, तर ती आजची गरज देखील झाली आहे म्हणा. पण अशातूनच हा नातू आपल्या आजीसाठी आठवड्यातून किंवा महिन्यातून वेळ काढून भेटायला नक्की येतो. तो येताना लॅपटॉप घेऊन येत असला आणि आहे तेवढावेळ त्यावर व्यस्त असला तरी किमान आपला नातू तरी आपल्याला भेटायला येतो आहे, यातच आजीला खूप समाधान मिळत असतं. एका दिवसातील तेवढेच काही तास ती दोघंंही आपापली कामे करत एकमेकांना सोबत करत असतात. 

आजी आजोबांना आपल्या नातवांना आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगायच्या असतात. इथही तेच आहे. नातवाला दाखवण्यासाठी आजी अडगळीत ठेवलेली पेटी किती कसरत करून काढते! त्यातल्या कितीतरी जुन्या वस्तू वरती काढते आणि त्याचं लक्ष नसताना देखील प्रत्येक वस्तू हातात घेवून बडबडत असते. शेवटी तो लक्ष देत नाही म्हणून डोळ्यात पाणीदेखील आणते, तेव्हा आजी काय म्हणतेय ते तो आवर्जून ऐकतो आणि तिला सावरतो.

आजीचा निरोप घेऊन जेव्हा नातू निघतो, तेव्हा त्याला आजी 'माणसा' म्हणून हाक मारते आणि पुन्हा लवकर यायला सांगते. आपण म्हणतो ना की एक माणूसच दुसऱ्या माणसाला समजून घेऊ शकतो आणि त्या आजीसाठी तिला समजून घेणारा तिचा नातू हा एकटाच तिच्यासाठी माणूस असतो. 

ज्योती सुभाष आणि आरोह वेलणकर यांनी छान, सुंदर अभिनय केला आहे. दोन पिढ्यांमध्ये वैचारिक मतभेद नक्कीच असू शकतात पण अशी प्रेमाची नाती मतभेदासहित स्वीकारायची असतात आणि एकमेकांना सोबत करायची असते, हाच संदेश देतो आपल्याला हा लघुपट! सोबत लघुपटाची लिंक दिली आहे. https://youtu.be/ZhhGkqjCNsM 

- ज्योती बागल 

content@yuvavivek.com

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response