Primary tabs

महापरिनिर्वाण!!

share on:

आज आपण वेगवेगळ्या समुदायाची माणसे एकत्र राहत आहोत ते फक्त आणि फक्त संविधानाच्या आधाराने. संविधानाने सर्वांना लोकशाहीचा हक्क बहाल केला आहे. संविधानाच्या रूपाने आपल्याला हा हक्क बहाल करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आज स्मृतिदिन! त्यांच्याविषयी चार शब्द जाणून घेणे हीच त्यांना वाहिलेली आदरांजली होईल...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण म्हणजेच निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबई येथील राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये दि. ७ डिसेंबर १९५६ रोजी लाखो लोकांच्या साक्षीने आणि बौद्ध पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिंदू स्मशानभूमी अशी ओळख असलेल्या त्याठिकाणी, बाबासाहेबांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आणि तेव्हापासूनच आपल्या माय-बापाला निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय तेव्हाही एकत्र आला होता, आणि आजही, दरवर्षी याच दिवशी बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो आंबेडकर अनुयायी आणि बौद्ध धर्मीय बांधव चैत्य भूमीवर जमा होतात.

१ ते ७ तारखेच्या दरम्यान चैत्यभूमीवर म्हणजेच आंबेडकरांच्या समाधीस्थळी लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असतात. ५ तारखेला आंबेडकरांच्या स्मरकास समता सैनिक दलाकडून सलामी दिली जाते आणि नंतर त्यांचे दर्शन सर्वांसाठी खुले केले जाते. सर्व प्रांतातून येणाऱ्या या जनसमुदयाची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आंबेडकरवादी स्वयंसेवक घेत असतात. साधारण २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येतात. या सर्वांसाठी हे श्रद्धास्थान तर आहेच शिवाय प्रेरणास्थान देखील आहे.

अनेक छोट्या मोठ्या संस्था, संघटना या ठिकाणी येऊन त्यांच्या संस्थेच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांना देतात, बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करणारी गाणी गातात, बाबासाहेबांच्या पुस्तकांचे वाटप करतात, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात. जे लोक चैत्यभूमीवर प्रत्यक्ष जाऊ शकतं नाहीत ते लोकं स्थानिक बौद्धविहारामध्ये किंवा राहत्या घरीच बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा करतात. तसेच बऱ्याच ठिकाणी १ ते ७ डिसेंबर असा पूर्ण सप्ताह वेगवगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

बाबासाहेबांनी अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. वेळप्रसंगी स्वतः दिव्याच्या उजेडाखाली अभ्यास केला, उच्च वर्गीयांची हीन वागणूक सहन केली, पण आपल्या ध्येयाचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही.

शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा सर्वसामान्यांना संदेश देणारे आणि बहुजनांचे श्रद्धास्थान असलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 'युवाविवेक' तर्फे विनम्र अभिवादन!

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response