Primary tabs

मराठी चित्रपटाचे बदलते स्वरूप!!

share on:

बदल हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमाच्या या प्रवाहासोबत आपण बदललो नाही, तर आपला दगड होईल. याउलट या प्रवाहासोबत आपणही बदललो, तर आपली ओळख टिकून राहील. मराठी चित्रपटसृष्टीनेदेखील हे ओळखले आणि प्रवाहात राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग चोखाळून पाहिले. या वाटचालीत यश आले तसे काही अपयशाचे घोट सुद्धा गिळावे लागले पण त्याने निराश न होता आपल्या अनुभवांचं दालन समृद्ध करत मराठी चित्रपटसृष्टी मार्गक्रमणा करत राहिली आणि आजही करत आहे.

इतर कलांप्रमाणे चित्रपट निर्मिती ही देखील एक कलाच आहे. दादासाहेब फाळके या कलेला भारतात घेऊन आले. सुरुवातीच्या काळातील चित्रपट हे पौराणिक कथांवर आधारित होते. राजा हरिश्चंद्र, सत्यवान सावित्री,भक्त प्रल्हाद यासारखे चित्रपट धार्मिकतेवर आधारलेले होते. मध्यंतरीच्या काळात काही मोजकी नावे सोडली, तर मनोरंजनात्मक चित्रपटाची चलती होती. सचिन–लक्ष्या, अशोक–सचिन यांच राज्य चित्रपटसृष्टीवर चालू होतं.

अगदी अलीकडच्या काळात मराठी चित्रपटांचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण फक्त संख्येनेच नाही तर विषयाने देखील वाढले आहे. हे नवीन चित्रपट समाजातील छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या विषयांना हात घालत आहेत. त्यात नाविन्यता आहे, वैविध्यता आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता आहे. एक प्रकारे सामाजिकतेवर भाष्य करणारे चित्रपट निघू लागले आहेत. ‘श्वास’सारखा चित्रपट आला आणि मराठी चित्रपटसृष्टीने कात टाकली असं नक्कीच म्हणता येईल. त्यानंतर उत्तमोत्तम चित्रपट येत गेले. यामध्ये वळू, जोगवा, ताऱ्यांचे बेट, एलिझाबेथ एकादशी, सैराट ते न्यूड पर्यंत अनेक वेगवेगळे विषय हाताळले गेले. ही सुद्धा काही मोजकीच नावे झाली. अर्थात याच दरम्यान काही फक्त आणि फक्त मनोरंजन करतील असे चित्रपटही बऱ्यापैकी येऊन गेले किंवा येत आहे. हो, पण यामध्ये देखील चित्रपटाची मांडणी, त्यातील गाण्यांची मांडणी पूर्णपणे बदललेली दिसते. पूर्वी मराठी चित्रपटात आयटम नंबर्स कधी पाहिल्याचे आठवतेय का? नाही ना. पण हल्ली हे प्रमाण हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांमध्येही वाढले आहे. अर्थात आजच्या पिढीला ते आवडते आणि रुचते देखील.  

खरं तर चित्रपट हे समाजाचा आरसा म्हणता येईल. समाजात जे सुरु असतं, तेच चित्रपटात कमी अधिक रंगवून दाखवलं जात. ‘श्वास’नंतर मुलांचे भावविश्व उलगडणारे शाळा, किल्ला यासारखे चित्रपट आले. बालक - पालक सारखा अतिशय वेगळ्या विषयावर आधारित सिनेमा आपल्याला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही.  मोकळा श्वास, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, गुलाबजाम, ती सध्या काय करते, दगडी चाळ, दुनियादारी, पोस्टर गर्ल, पोस्टर बॉयीज, दशक्रिया, बकेट लिस्ट, आम्ही दोघी, वजनदार, कासव या सर्व चित्रपटांनी मनोरंजनाबरोबरच काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सध्या मराठीमध्ये ‘बायोपिक’ची लाट आली आहे. बालगंधर्व ते भाईपर्यंत ‘बायोपिक’चित्रपट थिएटरवर गर्दी करताना दिसतात. नुकताच दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट आला आहे. 

चित्रपट सृष्टीत होणारा हा बदल तरुण पिढीला आपलासा वाटतो. त्यातले डायलॉग आपलेसे वाटून अल्पावधीतच लोकप्रिय होताना दिसतात. गेल्यावर्षी आलेल्या ‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ व ‘नाळ’ या चित्रपटांनी ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या हिंदी चित्रपटाला मागे टाकत उत्तम कमाई करून दाखवून दिले आहे की, मराठी चित्रपटांमध्येही प्रेक्षकांना खेचून आणण्याची क्षमता आहे. आणि हेच मराठी चित्रपटाचे यश आहे. आज मराठी चित्रपट सृष्टी आशयसंपन्न, तंत्रसंपन्न आणि प्रयोगसंपन्न होत आहे असे म्हटल्यास चूक वाटायला नको...

- उत्कर्षा सुमित 

content@yuvavivek.com

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response