Primary tabs

नाती समजून घेताना – भाग २

share on:

मैत्रीचं नातं तरुण मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्याला बरं किंवा वाईट वळण मिळत असतं. या नात्यात आपल्याला हे ओळखता यायला हवं की, आपला मित्र नेहमी आपल्या पाठीशी असतो मात्र चुकलं, तर स्पष्ट शब्दांत सुनावतोही. गोडगोड बोलून चापलुसी करणारा किंवा पाठीमागे भलंबुरं बोलणारा मित्र हा धोकादायकच असतो. मदत आणि प्रेम या दोन गोष्टींच्या पायावरच मैत्रीच्या विश्वासाची इमारत उभी राहू शकते. मला माझ्या मित्राकडून चांगलं काय शिकता येईल हा प्रश्न पडायला हवा. आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र येतील पण जे टिकून राहतील ते खरे मित्र. त्यांच्या बरोबर असताना तुम्हाला नव्या ऊर्जेची जाणीव  होईल. प्रॉब्लेम्स आल्यावर तुम्हाला एकटं सोडून न देता ते बरोबरीने उभे राहतील.

पूर्वा शिक्षणासाठी मुंबईत आली आणि रमोलाशी तिची मैत्री कधी झाली हे तिलाही समजलं नाही. आई-दादांच्या प्रेमळ सावलीतून ती या महानगरात आली खरी, पण इथे सर्वस्वी अपरिचित लोकांत, नव्या वातावरणात जुळवून घेणं सोपं नाही, हे तिला कळलं आणि त्याचवेळी शेअरिंग फ्लॅटमध्ये आणि कॉलेजलाही असणारी रमोला भेटली. मैत्रीचं नातं जुळलं, घट्ट होत गेलं. ते तिच्या जीवनातला एक अनमोल दागिना झालं. दागिन्याचं सोनसळी तेज, त्यावरची कलाकुसर, त्याचं देखणेपण, त्यातली फॅशन, तर कधी त्यातलं पावित्र्य! ‘अगदी तशीच आहे रमोला’ असं पूर्वाला वाटायचं. फक्त ४-५ महिन्यांत पूर्वाने तिच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी रमोलाबरोबर शेअर केल्या होत्या. रमोला मात्र स्वतःविषयी कधी काही बोलली नाही. त्यात पूर्वा अंशुलच्या प्रेमात पडली. आपल्या मनातलं सारं तिने रमोलाला सांगितलं होतं. दुर्दैवाने काही महिन्यांतच त्यांचं ब्रेकअप झालं आणि त्याला कारण ठरली रमोला. जिच्या वागण्याने भुरळ पडून अंशुल आणि रमोला यांच्यात नातं निर्माण झालं. या प्रकाराने पूर्वाचा मैत्रीवरचा, या नात्यावरचा विश्वास उडाला.

तरुणांच्या आयुष्यात मित्र-मैत्रिणी, मैत्रीचं नातं या गोष्टीला फार महत्त्व असतं, कारण या वयात कुटुंबियांची जागा मित्र घेतात. मैत्रीचं आपलं असं एक विश्व असतं. ज्यात असतो विश्वास. दोन व्यक्तींमधील हे नातं त्या विश्वासावर उभं राहतं, फुलतं बहरतं आणि म्हणूनच मैत्री करताना ज्याच्याशी आपण मैत्री करतो त्याच्यावर विश्वास ठेवताना या गोष्टीचं भान ठेवायला हवं की, खरंच तो मित्र आपल्या आयुष्याचं पुस्तक, त्यातलं प्रत्येक पान नि पान, शब्द नि शब्द सांगण्याइतका विश्वासार्ह आहे का?  असं म्हणतात की, तुम्ही ज्या मित्र मैत्रिणींबरोबर असता, वेळ घालवता त्यावरून लोक तुम्हाला ओळखतात. तुमची योग्यता, पात्रता ठरवतात. तुमचं ‘सोशल स्टेटसही’ त्यावरून ठरतं. जात, धर्म, रंग, आर्थिक स्थिती या बाबी मैत्रीत महत्त्वाच्या नसतात. पण तुमची वैचारिक पातळी, भावनिक समज, आयुष्यातली ध्येयं, स्वप्नं या गोष्टी जुळणं फार आवश्यक आहे.

मैत्रीचं नातं तरुण मुलांसाठी खूप महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्याला बरं किंवा वाईट वळण मिळत असतं. या नात्यात आपल्याला हे ओळखता यायला हवं की, आपला मित्र नेहमी आपल्या पाठीशी असतो मात्र चुकलं, तर स्पष्ट शब्दांत सुनावतोही. गोडगोड बोलून चापलुसी करणारा किंवा पाठीमागे भलंबुरं बोलणारा मित्र हा धोकादायकच असतो. मदत आणि प्रेम या दोन गोष्टींच्या पायावरच मैत्रीच्या विश्वासाची इमारत उभी राहू शकते. मला माझ्या मित्राकडून चांगलं काय शिकता येईल हा प्रश्न पडायला हवा. आयुष्याच्या प्रवासात अनेक मित्र येतील पण जे टिकून राहतील ते खरे मित्र. त्यांच्या बरोबर असताना तुम्हाला नव्या ऊर्जेची जाणीव  होईल. प्रॉब्लेम्स आल्यावर तुम्हाला एकटं सोडून न देता ते बरोबरीने उभे राहतील.

हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे की, तुमचा आनंद, तुमची ख़ुशी, तुमची आशा, तुमची हिंमत शोधण्यासाठी जो तुम्हाला मदत करेल तो तुमचा मित्र असतो. मैत्रीचं नातं तयार होताना, त्याला पुढे नेताना हळुवारपणे त्याला जपायचं असतं. अलगद आपल्या मनाच्या पुस्तकात पिंपळपानासारखं ठेवायचं असतं. आपण स्पेशल माणसांशी मैत्री करतो असं नाही, तर मैत्रीनंतर ती माणसं आपल्यासाठी स्पेशल होतात. आपल्याला योग्य सल्ला देणारे, कटू असलं तरी खरं बोलणारे, मोहाचे अनेक क्षण आले तरी तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दाखवणारे खरे मित्र हे लक्षात घेऊन मैत्रीच्या नात्यात इनव्हेस्टमेंट करायची असते. हेलन केलरचं हे वाक्य मैत्रीच्या नात्याला समजून घेण्यासाठी मार्गदर्शक आहे. “I would rather walk with a friend in the dark than alone in the light.” हे लक्षात ठेवा.                                                                                                       

डॉ. स्वाती विनय गानू

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response