Primary tabs

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

share on:

समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ज्ञायाधीश महादेव गोविंद रानडे यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा या लेखातून घेतला आहे...  

महादेव गोविंद रानडे हे माधवराव रानडे या नावाने प्रसिद्ध होते. तीव्र स्मरणशक्ती व सामाजिक भान ही त्यांची गुणवैशिष्ट्ये. अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती. इतिहास आणि अर्थशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. अध्यापन, परीक्षण, अनुवाद, न्यायदान अशी अनेक कामे त्यांनी केली. इतिहास या विषयात एम.ए. केल्यानंतर १८६६ साली त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. मुंबई विद्यापीठातून पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली होती.  

वयाच्या १२व्या वर्षी महादेव गोविंद रानडे यांचा पहिला विवाह वाईतील दांडेकरांच्या रमा या मुलीशी झाला. मात्र रमा आजारी पडल्या आणि त्यांचे १८७३ साली निधन झाले. समाज सुधारणेने प्रेरित झालेल्या माधवराव रानडेंचे विधवा पुर्नविवाहविषयीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग वाढत होता. हे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आल्यावर,  माधवराव हे देखील एखाद्या विधवेशीच लग्न करतील की काय, म्हणून ३० नोव्हेंबर १८७३ सालीच आण्णासाहेब कुर्लेकर यांच्या मुलीशी माधवरावांचा विवाह करून दिला. विधवेशी विवाह करण्याची संधी दवडल्यामुळे माधवरावांना स्वत:ला फार वाईट वाटले; शिवाय या घटनेमुळे त्यांना सनातन्यांकडूनही 'बोलके सुधारक' असे टोमणे देखील ऐकावे लागले. लग्नानंतर त्यांनी दुसऱ्या पत्नीचे नाव देखील रमा असेच ठेवले आणि तिला शिक्षण देखील दिले. 

महादेव गोविंद रानडे यांना महाराष्ट्राच्या प्रबोधनाचे जनक म्हंटले जाते. ते आर्थिक राष्ट्रवादी होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीय समाजात जातीभेदाचे पालन, संकुचित वृत्ती, भौतिक सुखे, व्यावसायिकता व व्यावहारीकता यांच्याविषयीचे गैरसमज यासारखे दोष निर्माण झाल्यामुळे समाजाची मोठ्याप्रमाणावर हानी झाली असून समाजाची प्रगती करायची असेल, तर हे सर्व दोष दूर करायला पाहिजेत. समाजाची राजकीय व आर्थिक प्रगती करायची असेल तर सामाजिक सुधारणा होणे आवश्यक आहेत, या मताचे ते होते. 

परमहंस सभा, सार्वजनिक सभा, भारतीय सामाजिक परिषद, ज्ञानप्रसारक सभा इत्यादी समाज सुधारक संस्था स्थापनेत आणि त्यांच्या विस्तारात माधवरावांचा प्रमुख सहभाग होता. माधव रानडे यांच्या प्रयत्नांमुळेच मराठी ग्रंथकार संमेलन सर्वप्रथम यशस्वी ठरले होते. त्याकाळी अशा अनेक क्षेत्रातील संस्था स्थापन करून त्यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला. माधवराव रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी कायम घटनात्मक व सनदशीर मार्गाचा पुरस्कार केला. काही काळ शिक्षक, संस्थाचे  सचिव व जिल्हा न्यायाधीश म्हणून विविध ठिकाणी काम केले. त्यानंतर १८९३ साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची निवड करण्यात आली.       

अलेक्झांडर ग्रॅन्ट, सर बार्टल फ्रियर, बेडरबर्न यांच्या काळातील सरकारचा माधवरावांच्या समाजकारणावर विश्वास होता. पण त्यानंतरच्या सरकारला संशय आला की, माधवरावांचा सरकारविरोधी घटनांमध्ये हात आहे. या संशयावरून १८७९ साली त्यांची धुळे येथे बदली करून त्यांच्या प्रत्येक टपालावर नजर ठेवली जावू लागली होती. सततच्या सरकारी हस्तक्षेपामुळे काम करता येत नव्हते. त्यामुळे गणेशशास्त्री लेले या मित्राने माधवरावांना नोकरीतून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. माधवरावांनी तो सल्ला स्वीकारला आणि काही काळाने सरकारचा संशय दूर झाला. 

१६ जानेवारी १९०१ रोजी माधवराव रानडे यांचा मृत्यू झाला. समाज सुधारणेचे काम करत असताना त्यांना अनेक लोकांच्या टीकेला, रोषाला सामोरे जावे लागले, पण त्यांनी आपले काम थांबवले नाही.

- युवाविवेक 

content@yuvavivek.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response