Primary tabs

ऑस्कर वाईल्ड स्मृतिदिन विशेष...

share on:

ऑस्कर वाईल्ड हे व्हिक्टोरियन काळातील एक प्रख्यात आयरिश कवी, नाटककार आणि लेखक होते. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १८५४ साली डब्लिन येथे झाला. विल्यम शेक्सपिअरच्या नंतर कोणाच्या नावाची आणि लेखनाची जास्त चर्चा झाली असेल, तर ती ऑस्कर वाईल्ड यांची. त्यांचे पूर्ण नाव ‘ऑस्कर फिंगाल ओं फ्लाहर्टी विल्स वाईल्ड’ असे होते, परंतु ऑस्कर वाईल्ड या नावाने ते प्रसिद्ध होते. ते उत्तम लेखकाबरोबरच एक संवेदनशील व्यक्ती होते. ऑस्कर वाईल्ड यांचे वडील सर्जन होते तर आई कवयित्री होती. त्यांच्या आईकडूनच त्यांना कविता लिहिण्याची देणगी मिळाली.

१८८० ते १८९० दशकात अनेक लेखक लिहीत होते, परंतु या लेखकांचे लिखाण ठराविक लोकांनाच विकत घेऊन वाचता येत असे. त्याच काळात ऑस्कर वाईल्डने अनेक लघुकथा लिहिल्या, ज्या सर्वसामान्य लोकांना देखील विकत घेवून वाचता येत होत्या. ऑस्कर वाईल्ड यांनी आपल्या लेखनात त्यांच्या आयुष्यात त्यांना आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांबद्दल, झालेल्या अपमानाबद्दल देखील लिहिले आहे. त्यांनी आपले लेखन एकाच फॉर्ममध्ये बंदिस्त न ठेवता वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहून १८९० चे दशक गाजवले होते. १८९५ च्या दरम्यान त्यांचे ‘The importance of being earnest’ हे नाटक खूप गाजले होते. लंडनमध्ये आजही या नाटकाचे प्रयोग केले जातात. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी ‘The House Of Pomegranate’, ‘Lady Windermere’s Fan’, ‘A Woman Of No Importance’, ‘The Ballad of reading goal’ या काही गाजलेल्या साहित्यकृती आहेत. The Ballad of reading goal ही त्यांनी लिहिलेली शेवटची दीर्घ कविता. या कवितेत त्यांनी तुरुंगवासात त्यांना आलेल्या अनुभवाचे कथन केले होते. ऑस्कर वाईल्ड यांचे लग्न २९ मे १८८४ ला कोस्तांस लोयड यांच्यासोबत झाले. कोस्तांस या ऑस्कर वाईल्ड यांच्याप्रमाणे हुशार तर होत्याच शिवाय त्यांना अनेक युरोपियन भाषा अवगत होत्या. ऑस्कर आणि कोस्तांस यांना दोन मुलगे होते. ऑस्कर यांच्यावर जेव्हा अनैतिकतेचा आरोप झाला तेव्हा कोस्तांस आपल्या दोनही मुलांना घेवून स्वित्झर्लंडला निघून गेल्या. आणि ऑस्कर वाईल्ड यांच्यावर एकटे राहण्याची वेळ आली.

असे म्हणतात की, ऑस्कर वाईल्ड यांचे समकालीन ज्योतिष ‘कीरो’ यांनी ऑस्कर वाईल्ड यांच्याबाबतीत एक भविष्यवाणी केली होती की, ऑस्कर यांच्याकडून काही अनैतिक गोष्टी घडून त्यांना आपला देश सोडवा लागेल. आणि ही भविष्यवाणी खरी देखील ठरली. १८९५ मध्ये ऑस्कर वाईल्ड यांना समलैंगिकता आणि अनैतिकतेच्या नावाखाली गुन्हेगार ठरवण्यात आले. यासाठी त्यांना २ वर्षे तुरुंगवासाची शिक्षादेखील झाली. याकाळात त्यांनी समाजात मिळवलेली प्रतिष्ठा, मान-सन्मान सगळं धुळीस मिळाले. हा धक्का त्यांना सहन झाला नाही आणि त्यांनी पॅॅरीसला जायचे ठरवले. तिथे काही दिवस त्यांनी एकांतात आयुष्य घालवले. त्यांना फक्त ४६ वर्षांचे आयुष्य लाभले. आणि ३० नोव्हेंबर १९०० ला पॅॅरीसमध्येच त्यांचे निधन झाले.

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

लेखक: 

No comment

Leave a Response