Primary tabs

रूपकुंड सफरनामा - 2

share on:

रूपकुंड हा गिर्यारोहकांचा आवडता आणि अत्यंत कठीण ट्रेक आहे. या ट्रेकमध्ये पठार नाचणी, कालू विनायक मंदिरासह भगवाबासाचा कधीही न विसरला जाणारा सूर्यास्त ही रूपकुंड ट्रेकची वैशिष्टये आहेत. रूपकुंडाच्या मार्गातील सौंदर्य टिपताना...

पुढचा टप्पा आहे बेदिनी बुग्याल ते पठार/पथार/पत्थर नाचणी/नाचाणी - (6 कि.मी., उंची 3965 मी./13008 फूट. पथार/पठार/पत्थर नाचाणी/नाचणी/नाचौणी/नाचुणि  ते भगवाबासा/भगुवाबासा.

बेदिनी बुग्यालला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी निघायचं पथार नाचाणीकडे. बेदिनी कुंड ओलांडून पुढे गेल्यावर पुन्हा चढाईला सुरुवात होते. पर्वताच्या माथ्यापर्यंत असणाऱ्या रस्त्यावरून पत्थर नाचणीपर्यंत हा चढ आहे. हे अंतर ट्रेक करून जाण्यासाठी 3-4 तास (साधारणपणे) लागतात, कारण रस्ता चढत जातो. या रस्त्यावरून चढत पुढे जाऊन पाठीमागे वळून पाहिल्यावर दिसतं ते बेदिनी बुग्याल, अगदी ठळकपणे.

हा रस्ता जवळजवळ 4000 मीटर उंचीवर नेतो. विरळ हवामान अन रस्त्यात यानंतर झाडं नाहीत, अन ऊन असलं तर शरीरातलं पाणी कमी होत जातं, घामावाटे, त्यासाठी पाणी पीत राहणं हा सर्वोत्तम उपाय. कारण या भागात पाणी नाही. ते मिळतं पाच-सहा कि.मी.नंतर, कालू विनायकजवळ.

पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदू काम करेनासा होतो, पायातला जोर कमी होतो. आधी चक्कर, डोकेदुखी, पाय लटपटणं हे सगळं दिसायला लागतं. यासाठी शरीराला सतत hydrate करत राहणं चांगलं.

रूपकुंड यात्रा ही कठीण नक्कीच नाही, पण काही गोष्टी या ट्रेकला इतर ट्रेक्सपेक्षा मुश्कील बनवतात. याची उंची 4800 मी. जर पिंडारी ग्लेशिअर (3800) बघितला असेल, तर सुरुवातीला आपल्याला धाकुरी धार (2900 मी. धार म्हणजे असा मार्ग, ज्याच्या दोन्ही बाजूंना तीव्र उतार असतो) चढून उतरावी लागते. धाकुरी धार पार केल्यावर 8-10 कि.मी. खाली उतरत यावं लागतं. मग पिंडारीची चढण सुरू होते. धाकुरीची चढण चढल्यानंतर एक अनुभव गाठी असतो चढण व उतरणीचा अन त्यामुळे पिंडारीची चढण ही त्या मानाने कठीण जात नाही, कारण शरीर आधीच यासाठी तयार झालेलं असतं.

रूपकुंड करताना अशा प्रकारची धाकुरी धार नाहीये. इथे फक्त चढत जायचंय, चढत जायचंय तीव्र चढणीवर.

दुसरी कठीण गोष्ट ही, की बेदिनीनंतर संपूर्ण रस्ता निमुळता व दोन्ही बाजूंना उतरण असणारा, एखाद्या तलवारीच्या पात्यावरून चालावं तसा (Mountain Edge) - पथार नाचणीपर्यंत एकसारखा अन पथार नाचणीनंतर अचानक तीव्र चढाईत रूपांतरित होतो.

बेदिनीपासून काही अंतरावर आहे घोरा लौटानी. घोडा, लौटानी - परत येणे. ज्या ठिकाणाहून पुढे घोडे प्रवास करू शकत नाहीत, असं ठिकाण. या ठिकाणापर्यंतच पूर्वी घोडयांवरून प्रवास केला जात असे.

पथार नाचणीबद्दल एक कथा सांगितली जाते. त्या कथेनुसार एक राजा नंदादेवीच्या यात्रेसाठी स्वत:बरोबर सैन्य व काही नर्तक, नर्तकी बरोबर घेऊन आला. पथार नाचणीजवळ रात्री नृत्य-गायनात तो इतका रमला की त्याने यात्रा रहित केली. यावर नंदादेवी क्रोधित होऊन तिने त्या नर्तक-नर्तिकांचं रूपांतर दगडांमध्ये केलं, म्हणून याचं नाव पत्थर नाचणी. पत्थर - दगड, नाचणी - नर्तक.

नंदादेवी ही लगेच कोपाविष्ट होणारी, जराशी मत्सरी अशी देवता आहे असं मानतात. तिच्या या परिसरात कोणी वावगं वागलं, तर ती शिक्षा करते, असं स्थानिकांचं मानणं आहे, अनेकांनी अनुभवही घेतलाय.

याच्या वरच्या टोकाला कालू विनायक, गणेश मंदिर आहे. काळया रंगाची गणेशमूर्ती, म्हणून कालू विनायक. नावाप्रमाणेच हा विनायक, सिध्दिविनायक. याचं दर्शन घेऊनच पुढच्या प्रवासाला जायचं.

कालू/केलवा विनायकपर्यंत पोहोचल्यावर लक्षात येतं की या अरुंद धारेसारख्या मार्गाला तीन बाजूंना उतरण आहे अन चौथ्या बाजूला उंच होत जाणारा. पण इथून या धारेवरून न चालता खाली उतरत जाणाऱ्या मार्गाने आपण भगवाबासाला जातो..

भगवाबासा, जिथे बेदिनीनंतर पाणी उपलब्ध आहे.

तर (साधारणपणे) 3-4 तासांच्या वाटचालीनंतर आपण येऊन पोहोचतो पथार/पत्थर/पठार नाचणी/नाचाणीला. इथे मुक्काम करायचा.

यानंतर जायचंय ते भगवाबासाला. पथार नाचाणी 3965 मी./ 13008 फूट. पथार/पठार/पत्थर नाचाणी/नाचणी/नाचौणी/ नाचुणी ते भगवाबासा 4298 मी. /14100 फूट. अंतर साधारण 5-6 कि.मी., 5-6 तास साधारणपणे लागतात.

पथार नाचणीनंतर हळूहळू समुद्रसपाटीपासूनची उंची वाढत जाते. समोर कालू विनायकला जाणारा रस्ता दिसतो. कालू विनायक मंदिर 14500 फूट उंचीवर अन कालू विनायकपासून भगवाबासाला येण्यासाठी उतरत जावं लागतं. या उंचीचा काही जणांना त्रास होऊ शकतो. डोकेदुखी वगैरेचा त्रास होऊ  शकतो.

पथार नाचणी ते कालू विनायक हा टप्पा या मार्गावरचा सर्वात कठीण टप्पा मानला जातो, कारण 2 कि.मी. अंतरात 1420 फूट चढण.

कालू विनायक मंदिर - रूपकुंडाच्या वाटेवरचा महत्त्वाचा टप्पा. याचं दर्शन घेतल्याशिवाय रूपकुंडाची यात्रा सफल होत नाही. एक प्रथा, याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे रूपकुंडाला जायचं नाही अशी. नावाप्रमाणेच काळया दगडाची गणेशमूर्ती.

कालू विनायक मंदिरानंतर सर्वात पहिल्यांदा आपण ज्याची वाट बघत असतो, तो Snow patch आपल्याला दिसतो. इथपर्यंत कुरणं, ग्रॅनाइटच्या फरशा, दगड, गवत, झाडं हे बघत येतो. यानंतर बर्फ दिसायला लागतो. जून-जुलै महिन्यात हा फ्रेश व मऊसर असा. पाय आत धसत जातात, त्यामुळे काळजीपूर्वक वाटचाल करणं गरजेचं.

भगवाबासाला पोहोचलं की काही अंतरावर टेंट्स रोवण्यासाठी कॅम्पसाइट दिसते. हिचं नाव 'हुनिया थाल'. भगवाबासा हे खडकाळ असं. इथे मोजकेच तंबू पिच करता येतात, कारण सगळंच खडकाळ असं. या ठिकाणी कॅम्पिंग करताना खालच्या खडकाळ जमिनीपासून जपावं लागतं.

कॅम्पिंगची जागा जी अक्षरश: ढग-धुक्यात वसलेली. इथे तुम्ही सप्तस्वर्गातच असत जणू - म्हणजे शब्दश: Up Above The Clouds...

या ठिकाणी तापमान खाली जातं. सप्टेंबर-ऑॅक्टोबरमध्ये अत्यंत थंड हवामान. उणे पाच अंशाखाली गेलेलं. इथे ग्रॅनाइटने, दगडांनी बांधलेली काही घरं दिसतात. पूर्वी राहण्यासाठी उपयोगात आणली जाणारी. आता पडझड झालेली.

भगवाबासा, भगुवाबासा... एक कथा यामागे सांगतात. बाघ -वाघ, वास/बास - रहिवास.

एक राजा व त्याची गर्भवती राणी पद्मावती या मार्गाने कैलास पर्वताच्या यात्रेसाठी निघाले होते. प्रसूती अगदी निकट आहे हे लक्षात आल्यावर राणीने पुढे जायचं नाकारलं. असं म्हणतात की राजाला महादेवांना ठरावीक वेळेतच भेटायचं होतं अन त्यासाठी तो निघून गेला. पद्मावती या ठिकाणी एका गुहेत राहिली. प्रसूतीनंतर पुढचे अकरा दिवस अन नंतर ती आपल्या बाळासह कैलासाला गेली. या काळात एका वाघाने ( तो बिबळया असावा, कारण या भागात हिमबिबळयांचा रहिवास आहे) तिचं रक्षण केलं. ज्या गुहेत ती राहिली, त्या गुहेबाहेर तो असायचा. जेव्हा ती कैलासाकडे निघून गेली, त्यानंतर तो दिसेनासा झाला. (मिथक मानलं, तरी देवी नंदाचा हा कैलासाला जाण्यासाठीचा मार्ग आहे अन नंदादेवी ही इथली इष्टदेवता आहे. ती इथल्या लोकांचं रक्षण करते, असा विश्वास आहे.)

भगवाबासाचा सूर्यास्त हा कधीही न विसरला जाणारा. सूर्यास्त होताना त्रिशूलवर पडणारे सूर्यकिरण हे त्रिशूलचं सौंदर्य वाढवत नेतात अन संधिप्रकाशात उजळणारी हिमालयीन शिखररांग.. ढग आपल्या पायांना हळूच गुदगुल्या करून जात असतात. आपण कधी नव्हे ते ढगांपेक्षा जास्त उंचीवर असतो अन हे अनुभवणं ही रूपकुंड ट्रेकची खासियत आहे.

तसंच शारीरिक व मानसिक फिटनेस, जिद्द, कणखरता या सगळया गोष्टींना निसर्गाकडून मिळालेलं हे बक्षीस आहे, इतक्या सुंदर नजाऱ्याचं.

रूपकुंड आपल्या शारीरिक व मानसिक सामर्थ्याची परीक्षा घेतं, पण त्याचबरोबर निसर्गाची ही देणगीही बहाल करतं, कधीही न विसरणारी.

पुढचा भाग आहे रूपकुंड बघण्याचा..

रूपकुंड हा शारीरिक व मानसिक सामर्थ्याची परीक्षा घेणारा ट्रेक. समुद्रसपाटीपासूनची उंची जास्त असल्यामुळे हवा विरळ होत जाते, हवेतल्या ऑॅक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं, त्यामुळे AMS होण्याची शक्यता असते. डोकेदुखी, चक्कर, उलटया, पायातला जोर कमी होणं, विचार करण्याची मेंदूची शक्ती कमी होणं, तसंच dehydration या सगळयांची शक्यता आहे. यासाठी Acclimatizationची सवय असणं गरजेचं. भरपूर पाणी प्यावं, उतरताना काळजी घ्यावी. घसरत जाण्याची शक्यता असते.

महत्त्वाचं - पर्यटन जबाबदारीने करावं. निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचू देता. पर्यावरणाला हानी पोहोचू न देता. बेजबाबदारपणे, स्वत:च्या फिटनेसबद्दल कोणत्याही गैरसमजात न राहता असे ट्रेक्स करावेत.

संपूर्ण माहिती घेऊन व निसर्गाप्रती कृतज्ञ राहून. तरच यातला आनंद घेता येईल.

- डॉ. अमिता कुलकर्णी

pourohitamita62@gmail.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response