Primary tabs

साहसी कल्पना चावला

share on:

प्रत्येक भारतीय व्यक्तीला अभिमान वाटेल असा तो क्षण होता, जेव्हा भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांनी पहिल्यांदा अंतरीक्षात भरारी घेतली होती. आज त्यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा... 

कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी हरियाणातल्या करनाल येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन शाळेत झाले. कल्पना या अभ्यासात तर हुशार होत्याच, पण त्याचबरोबर खूप साहसीही होत्या.  त्यांचा मोठा भाऊ करनालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात असे, तेव्हा त्यांनी देखील फ्लाईंग क्लबमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या वडिलांनी केलेला अर्ज तेथील अधिकाऱ्यांनी, कल्पना एक स्त्री असल्याने, ती वैमानिक होणे शक्य वाटत नाही, हे कारण देत नाकारला. पण कल्पना यांनी हार मानली नाही.

पंजाब इंजिनिअरींग महाविद्यालयातून १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकीची पदवी मिळवली. तर १९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च-अभियांत्रिकी शिक्षण घेतले.

शैक्षणिक काळातच त्यांचा जीन पियरे टॅरिसनयांच्याशी संपर्क आला. ते जेपी या नावाने ओळखले जात. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांनीच कल्पना यांना विमान चालवायला शिकवले. जेपी आणि कल्पना यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांनी १९८४ साली विवाह केला. 

कल्पना यांनी १९८८ साली कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली आणि लगेचच १९८८ सालीच नासामधून त्यांच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी, नासा एम्स रिसर्च सेंटर मध्ये Vertical/Short Takeoff and Landing वर संगणकीय द्रव प्रेरक शक्तीComputational fluid dynamics (CFD)चे संशोधन केले. १९९३ मध्ये त्या ओवरसेट मेथड्स येथे व्हाईस प्रेसिडेंट आणि संशोधक म्हणून रुजू झाल्या. १९९१ मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले, त्यांनतर नासा ऍस्ट्रोनात कॅम्प मध्ये भरती होण्याचा अर्ज केला. १९९५ मध्ये त्यांची कॉर्पस मध्ये निवड होऊन १९९६ मध्ये त्या १५ व्या अंतराळवीर समूहात निवडल्या गेल्या.   

अवकाशात त्यांनी १०६.७ लाख किमी, ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. भारतासाठी ती एक अभिमानाची गोष्ट ठरली होती. १ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर येणा-या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला, या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले, या अवकाश यानामध्ये असलेल्या कल्पना चावला आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

कल्पना चावला यांच्या स्मरणार्थ कराड येथील टिळक महाविद्यालयातील संजय पुजारी या विज्ञान शिक्षकाने १ जुलै २००६ रोजी कल्पना चावला विज्ञान केंद्र  रोजी सुरु केले.  विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि   विज्ञानाच्या निकषावर विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शोधता  यावीत हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे या केंद्राचे काम पाहण्यासाठी कल्पना चावला यांचे वडील,बनारसीलाल चावला यांनी स्वत: केंद्राला भेट तर दिलीच शिवाय काम उत्तम प्रकारे चालल्याचे पाहून देणगी देखील दिली. 

आज कल्पना चावला आपल्यात नसल्या तरीदेखील त्यांची ही प्रेरक कथा येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. आपल्या ध्येयासाठीच जगायचे आणि ते पूर्ण करत असताना मृत्यू जरी समोर आला तरी मागे हटायचे नाही हेच आपण त्यांच्या जगण्यातून शिकतो. त्यांचं जीवन तर आदर्श आहेच पण त्यांचा मृत्युसुद्धा आपल्याला प्रेरणा देऊन जातो. ज्येष्ठ कवी बोरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर-

देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा 

- ज्योती बागल

content@yuvavivek.com

संदर्भ – इंटरनेट

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response