Primary tabs

समाजस्वास्थ्य जपणारे राघुनाथ धोंडो कर्वे

share on:

स्वातंत्र्यपूर्व काळात दूरदृष्टी असणारे आणि समाज हिताचा विचार करणारे अनेक थोर विचारवंत होऊन गेले. त्यापैकीच एक म्हणजे, आपले संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी वाहून घेतलेले दृष्टे विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे! त्यांचा आज जन्मदिवस, त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची महती सांगणारा हा लेख...  

रघुनाथ यांचा जन्म १४ जानेवारी १८८२ रोजी मुरुड या गावी झाला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ते ज्येष्ठ पुत्र. रघुनाथ हे गणित विषयाचे प्राध्यापक होते. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए.ची पदवी मिळवल्यानंतर १९०६ मध्ये अध्यापनाची पदवी मिळवली. त्यानंतर गणित विषयात एम.ए. पॅरीस येथील फ्रेंच अकादमीची पदवी मिळवली. त्यांनी बऱ्याच महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचे काम केले. क्रांतिकारक विचार आणि बाणेदार स्वभाव यामुळे त्यांची बऱ्याचदा बदली केली गेली.

आपल्या वडिलांप्रमाणेच ते देखील बुद्धिवान होते. तेव्हाचे एकूणच समाजजीवन बघून त्यांनी भविष्यात लोकसंख्या वाढ ही मोठी समस्या होऊ शकते हे जाणले. आणि कुटुंब नियोजनाच्या प्रचाराचे कार्य हाती घेतले. त्यासाठी त्यांनी १५ जुलै १९२७ रोजी ‘समाजस्वास्थ्य’ नावाचे मासिक सुरु केले. त्याद्वारे लैंगिक शिक्षणाचा प्रसार केला. फक्त संततिनियमन याच विषयावर नाही तर सर्वच लैंगिक प्रश्नांवर निकोप व निर्भय चर्चा व्हावी असा आग्रह जेव्हा रघुनाथ कर्वेनी केला तेव्हा काही कर्मठ, सनातनी, रूढीवादी आणि जुनाट समजुतींना कवटाळणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना कडाडून विरोध केला. अनेकदा त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला. समाजस्वास्थ्यतील प्रचारामुळे त्यांच्यावर खटलेही भरले गेले. त्यात त्यांना शिक्षाही झाली. पण ते आपल्या मूळ कार्यापासून ढळले नाहीत. जवळजवळ २७ वर्षे त्यांनी हे मासिक चालवले.

समाजस्वास्थ्यबरोबर १९२३मध्ये ‘संतती नियमनाचा आचार व विचार’ आणि १९२७ मध्ये गुप्त रोगांपासून बचाव ही पुस्तके लिहिली. त्याचबरोबर ‘वेश्याव्यवसाय’, आधुनिक आहारशास्त्र, आधुनिक कामशास्त्र अशी शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके देखील त्यांनी लिहिली. ‘पॅरीसची परी’ आणि ‘तेरा गोष्टी’ हे त्यांचे ललित साहित्य.   

लोकांना विश्वास बसावा यासाठी त्यांनी स्वताला मूल नसतानाही केवळ लोकशिक्षणाचे मध्यम म्हणून स्वतावर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली होती. तसेच या विषयाच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी मुंबईमध्ये ‘राईट एजेन्सी’ हे कुटुंब कल्याण केंद्र सुरु केले. तेव्हा हे भारतातील पहिले कुटुंब कल्याण केंद्र होते.

कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून त्यावर स्वतंत्रपणे विचार करून आपली मते बनवणे व ती निर्भीडपणे मांडणे हे रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचे ठळक वैशिष्ट्य होते. आगरकरांनंतर प्रखर बुद्धिवादाचा निर्भयपणे व कोणतीही तडजोड न करता पुरस्कार करणारा मराठी विचारवंत म्हणून रघुनाथ धोंडो कर्वे यांचेच नाव घेतले जाते.

- युवाविवेक

content@yuvavivek.com

 

 

लेखक: 

No comment

Leave a Response