Primary tabs

शिखरा पलीकडची जिद्द

share on:

प्रेतांचा खच पडलेला असताना, त्यातून एक-एक पाऊल पुढे ती टाकत होती. शिखराच्या जवळ असताना तिचा ऑक्सिजन संपला...पण तिने जिद्द सोडली नाही आणि तिने एव्हरेस्टवर भारताचा झेंडा रोवला.

अभी तो इस बाज की असली

उड़ान बाकी है,

अभी तो इस परिंदे का

इम्तिहान बाकी है।

अभी अभी तो मैंने लांघा है समंदरों को,

अभी तो पुरा आसमान बाकी है!

या ओळी कोण्या कवी किंवा लेखकाच्या असाव्यात असं वाटेल किंवा ही केवळ चारोळी आहे असे वाटेल पण, भारतातल्या एका जिद्दी मुलीची ही कहाणी आहे. ही मुलगी म्हणजे अरुणिमा सिन्हा. उत्तर प्रदेशच्या आंबेडकर नगरमध्ये राहणारी सर्वसामान्य मुलगी. व्हॉलिबॉल या खेळात देशाचं प्रतिनिधीत्व करावं, अशी स्वप्नं उराशी बाळगलेल्या अरुणिमाचं संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदललं. जागतिक स्तरावर व्हॉलिबॉल खेळाडू होण्याचं स्वप्न पाहणारी अरुणिमा आज एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला दिव्यांग खेळाडू ठरली आहे आणि या तिच्या पराक्रमासाठी तिला शासनाकडून पद्मश्री पुरस्कारही देण्यात आला. अरुणिमाचा इथवरचा प्रवास ही खरंतर एक साहसकथा आहे. २०११ सालची ही गोष्ट. एका परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी दिल्लीला अरुणिमा निघाली होती. लखनऊ स्थानकावर मुंबईसारखीच खचाखच गर्दी, त्यात पद्मावती एक्सप्रेसनं प्रवास करणारी अरुणिमा. पण त्या दिवशी असं काही घडलं की, तिचं आयुष्य बदललं. ११ एप्रिल, २०११ रोजी महाविद्यालयातून घरी जात असताना तिच्यावर चार-पाच तरुणांनी हल्ला केला. तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरण्याच्या ते प्रयत्नात होते पण, अरुणिमाने झटापट करण्यास सुरुवात केली. “एक स्त्री प्रतिकार करते, हे कदाचित त्या पुरुषी अहंकाराला मान्य नसावे, म्हणून त्यांनी तिला थेट रेल्वेमधून फेकून दिले,” हे ऐकताना खरंतर राग आणि कीव दोन्ही येते. कारण, अरुणिमाने आपल्या अंगी असलेली खिलाडू वृत्ती दाखवत शेवटपर्यंत त्या चोरट्यांचा सामना केला. मात्र, त्यांनी अखेर तिच्यापुढे हारच पत्करली आणि तिला चालत्या रेल्वेमधून फेकून दिले. पण नशिबाची साथ अरुणिमालाही लाभली नाही. तिचा पाय रूळामध्ये अडकल्यामुळे ती हलू शकत नव्हती आणि काही मिनिटांत समोरून येणाऱ्या दुसऱ्या रेल्वेने तिच्या पायाचा लचकाच तोडला. सात तास तशीच त्या ट्रॅकवर निपचित प्रेतासारखी ती पडून होती. अखेर पोलिसांनी तिला उचलले आणि रुग्णालयात दाखल केले. ही केस गेली आहे, असं जणू डॉक्टर जाहीर करणारच होते पण तिच्या शरीरातून खूप रक्तस्राव झाल्यामुळे नंतर तिचा पाय काढण्याचा निर्णय घेतला गेला. परिणामी तिचा एक पाय कायमचा निकामी झाला. दुसऱ्या पायात सळी आणि कंबर मोडून पडली होती. या सगळ्यामुळे तिचं आयुष्य ३६० अंशात फिरलं. एवढं सगळं झाल्यानंतर सगळं हरून फक्त मृत्यूची वाट बघत बसणं, हे सामान्य विचार तिच्याही मनात आले पण, ती तरी असामान्य होती. दिल्लीतील एका कंपनीने तिच्या कृत्रिम पायाकरिता तिला अर्थसाहाय्य दिले. पण पुन्हा तिचा प्रवास वेगळ्याच ट्रॅकवर गेला. उत्तर प्रदेश पोलिसांनी तेव्हा ही आत्महत्या आहे अपघात नाही, असं जाहीर केलं. आणि अरुणिमाचीच उलट तपासणी सुरू झाली. “आयुष्यात कठीण प्रसंग येतात पण, माझं आयुष्यच कठीण झालं होतं. पण त्यावेळी माझ्या आई-वडिलांनी मला खूप साथ दिली, म्हणून मी माऊंटेनिअरिंगच्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदवलं. कदाचित मी इतिहास नोंदवावा, म्हणूनच देवानं मला जिवंत ठेवलं असावं.”

अरुणिमाच्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी तिला सर्व स्तरांतून प्रोत्साहन मिळण्यास सुरुवात झाली आणि तिचा एव्हरेस्ट प्रवास २०१३ साली सुरू झाला. ५२ दिवसांच्या या प्रवासात तिने अगणित गोष्टींचा सामना केला. प्रेतांचा खच पडलेला असताना, त्यातून एक-एक पाऊल पुढे ती टाकत होती. त्यातच शिखराच्या अगदी जवळ असताना तिचा ऑक्सिजन संपला...पण तिने जिद्द सोडली नाही आणि २१ मे, २०१३ रोजी तिने एव्हरेस्ट शिखरावर भारताचा झेंडा रोवला आणि तिच्या दिव्यांगपणाचा तिला अभिमान वाटू लागला. “शरीर काय असतं, जे असतं ते सगळं जिद्दीवर असतं,” असं म्हणत आज अरुणिमा अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. २०१५ साली अरुणिमाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आज ती केवळ भारतासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी प्रेरणेचा एक स्रोत बनली आहे. म्हणूनच काही दिवसांपूर्वी तिला अमेरिकेच्या एका नावाजलेल्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी देण्यात आली. २०१४ साली अरुणिमाने आपली कहाणी सर्वांपर्यंत पोहोचावी, याकरिता ‘एव्हरेस्ट की बेटी’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आणि आज त्या पुस्तकाच्या चार आवृत्त्या निघाल्या असून अरुणिमाला घेऊन संयुक्त राष्ट्रांकडून तरुणांकरिता प्रोत्साहनात्मक व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेश ते संयुक्त राष्ट्र असा एका पायावरचा अरुणिमाचा हा प्रवास लाजवाब आहे. ती नेहमी म्हणते, “आपली जिद्द ही नेहमी शिखरापलीकडील असावी... कारण, हासिल कर एैसा शिखर की, पर्वत की भी नजरे जुखे!”

- प्रियांका गावडे

content@yuvavivek.com

 

लेखक: 

No comment

Leave a Response